[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मातीचे सुक्त अन् घावांचे आक्रंदन: ‘चांदवडी रुपय्या’च्या मंचावर ‘नांगराचा घाव’चा कृतज्ञ जागर

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

मातीचे सुक्त अन् घावांचे आक्रंदन: ‘चांदवडी रुपय्या’च्या मंचावर ‘नांगराचा घाव’चा कृतज्ञ जागर

नांगराचा घाव काव्यसंग्रहाचे स्वागत करताना मान्यवर

चांदवड: “साहित्य हे केवळ शब्दांचे वैभव नसते, तर ते काळजाच्या गर्भातून उमललेले समाजमनाचे जिवंत सत्य असते. जेव्हा मातीशी इमान राखणारी लेखणी जागी होते, तेव्हाच समाजपरिवर्तनाचा नवा सूर्योदय होतो.” या प्रगल्भ वैचारिक जाणिवांची प्रचिती देत, ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ’ आणि ‘सार्वजनिक वाचनालय चांदवड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात एका अभूतपूर्व वाङ्मयीन घटनेची नोंद घेण्यात आली. १७ मे रोजी चांदवड तालुक्यातील वाकी या गावचे भूमिपुत्र आणि कृषिनिष्ठ साहित्यिक कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. या कृषिसंस्कृतीचा हुंकार असणाऱ्या कलाकृतीचे ‘चांदवडी रुपय्या’च्या मंचावर समस्त सारस्वतांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहाचे पुनर्वाटप करत, तो रसिकांच्या गराड्यात पुन्हा उजेडात आणण्याचे मोलाचे कार्य मंडळाचे निमंत्रक व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी केले. कृषिसंस्कृती, माती आणि साहित्याचा धागा गुंफताना, कवी व बालसाहित्यिक जनार्दन देवरे या पुस्तकावर अतिशय मार्मिक भाष्य करताना म्हणाले, ” ‘नांगराचा घाव’ हा केवळ एक कवितासंग्रह नाही, तर तो काळ्या आईच्या छातीवर घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या वेदनेचा अर्क आहे. कृषिनिष्ठ संस्कृती जेव्हा साहित्याचे लेणे लेवून उभी राहते, तेव्हा शब्दांनाही घामाचा आणि मातीचा गंध येतो. दिगंबर देवढे यांनी शेती आणि कवितेचा हा धागा अत्यंत ताकदीने गुंफला आहे.”

या सोहळ्याचे निमंत्रक आणि सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी साहित्य, समाज, शेती आणि कवितेचा एक सुंदर कोलाज उभा करत अत्यंत प्रगल्भ वैचारिक शब्दांत आपले मत मांडले. ते म्हणाले, “शेती आणि कविता यांच्यात एक अतुट नातं आहे. शेतकरी जमिनीवर नांगराचा घाव घालून धान्य पिकवतो, तर कवी आपल्या काळजावर अनुभवांचे घाव झेलून शब्दांचे पीक घेतो. चांदवडची ही माती, हा समाज आणि शेतकऱ्यांचे हे दुःख आमच्या कवितेचा खरा प्राण आहे. ‘नांगराचा घाव’ हा संग्रह याच मातीशी नाळ जोडणारा आणि बदलत्या समाजव्यवस्थेला आरसा दाखवणारा अस्सल दस्तऐवज आहे. विस्मरणात जाणाऱ्या या मातीच्या वेदनेला पुन्हा उजेडात आणणे, हेच आमच्या चांदवडी रुपय्या चळवळीचे आद्यकर्तव्य आहे.”

या वाङ्मयीन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ कवी राजू देसले यांनी ग्रामीण भागातील या साहित्य चळवळीच्या सातत्याचे कौतुक केले; तर डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी बोलीभाषेतील शब्द जोपासत साहित्याचे क्षितिज रुंदावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी “लेखकांनी केवळ पुरस्कारांसाठी न लिहिता, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी लिहावे,” हा मोलाचा विचार मांडला.

या सोहळ्यात चंद्रपूरचे अविनाश पोइनकर, रत्नागिरीचे डॉ. अनिकेत मयेकर, सांगलीचे कवी चंद्रकांत बाबर, मालेगावचे कवी राजेंद्र दिघे आणि नाशिकचे फणींद्र मंडलिक या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मान्यवरांसह माया ठोके, संदीप गुजराथी, सविता दरेकर, ऋषिकेश दायमा, अक्षरा देवरे आणि स्वतः कवी दिगंबर देवढे यांनी आपली अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त करून सोहळ्याची वैचारिक उंची कमालीची वाढवली.

या अपूर्व सोहळ्याला गंगाधर सोनवणे, सुशीला संकलेचा, वंदना गांगुर्डे, सविता दिवटे-चव्हाण, बाळासाहेब शेळके, ग्रंथपाल नितीन शिंदे, डॉ. मेधा मलोसे, रमेश अहिरे, बंडू वडनेरे, सुहास गुजराथी, सोमनाथ जाधव, सनी कोतवाल आणि सुभाष कोल्हार यांच्यासह नाशिक व चांदवड परिसरातील असंख्य साहित्य रसिक, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार आणि काव्यात्मक सूत्रसंचालन कवी शांताराम हांडगे यांनी केले. शेवटी, कार्यक्रमाचे निमंत्रक व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि साहित्य रसिकांचे ऋण व्यक्त करत, सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्याची सांगता केली.

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या