ग्रामसभा घेण्यासाठी जनतेच्या मागणीला अखेर यश.
गावगाड्याच्या प्रलंबित कामांना मिळणार चालना
चांदवड – ग्रामसभेला परवानगी मिळाल्याने आता गावांच्या विकासाला मिळणार चालना. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार असल्याने ग्रामिण भागात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.गेल्या जवळपास दिड वर्षांपासून ग्रामसभांना स्थगिती असल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा झालेल्या नव्हत्या. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे 12 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभांना स्थगिती दिली होती. ग्रामसभांना गावातील ग्रामस्थांची गर्दी होतेच या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता होतीच शिवाय सर्वच कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली होती. त्याच प्रमाणे ग्रामसभांना ही बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी बंधनकारक असलेल्या चार ग्रामसभा ही झालेल्या नाहीत.
ग्रामसभांना स्थगिती असल्याने गावपातळीवरील अनेक विकासाची कामे सुरुवातीला रखडली होती.त्यानंतर ग्रामसभेच्या परवानगी शिवाय विकास आराखड्यांना मंजुरी घेण्यात आली होती. मात्र ग्रामसभेच्या मंजुरी अभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजना अंतर्गतच्या वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी, पुनर्रवसीत गावांचे प्रस्ताव, गौन खणीज परवानगी,थेट सरपंच विरोधातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्च यासारख्या बाबी प्रलंबित राहिलेल्या असल्याने अकरा फेब्रुवारीला ग्रामसभांच्या आयोजनाला अटी शर्ती लावून काही अंशी शिथिलता देण्यात आली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयावह असल्याने कुठेही ग्रामसभा झाल्या नाहीत. दुसऱ्या लाटेची तिव्रता कमी झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पंधरा ऑगस्टला ग्रामसभा घेण्यास काही अटी ठेवत परवानगी दिली होती. त्यात ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोवीड रुग्ण संख्या नाही तिथेच ग्रामसभा घेण्यात याव्यात.
ग्रामसभा आयोजित करताना ग्रामसभेसाठी आवश्यक व सुरक्षित जागा याबाबत दक्षता घेणे अनिवार्य , ग्रामसभा आयोजित करताना मास्क , सॅनिटायझर, सामाजिक अंतर याबाबत ची दक्षता, कोवीड व्यवस्थापन व प्रोटोकॉलचे पालन या अटी ठेवून जिल्ह्यातील ग्रामसभांना परवानगी दिली होती. त्यानुसार काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यातही आलेल्या आहेत. तरीसुद्धा बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना शासनाच्या स्थगिती च्या आडून खीळ बसली होती. काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ग्रामसेवक सरपंचांनी जाणीवपुर्वक लांबवल्या होत्या.
गावाच्या विकासासाठी ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी संपुर्ण राज्यभरातील ग्रामिण जनतेची मागणी होती.त्यामुळे शासनाच्या आजच्या आदेशाने दोन ऑक्टोबरला ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळाल्याने ग्रामिण भागातील जनता समाधानी झाली आहे. आता गावोगावी दोन ऑक्टोबरला ग्रामसभा होऊन अनेक प्रलंबित कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

