बालसाहित्यातून घडते नव्या पिढीच्या मूल्यांची जडणघडण: राजेंद्र सोमवंशी
नाशिक:
“बालकाव्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते लहान मुलांच्या संवेदनशील मनावर संस्कार करणारे प्रभावी माध्यम आहे. कवयित्री वंदना गांगुर्डे यांनी आपल्या बालकवितांमधून नात्यांचा आपुलकीचा ओलावा, सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव अत्यंत सहजतेने रुजवली आहे. त्यांचा ‘इंद्रधनूचा झुला’ हा काव्यसंग्रह म्हणजे केवळ शब्दरचना नसून, तो जीवनमूल्यांची समृद्ध मनोहारी अक्षरबाग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य राजेश शिंदे, कवी सागर जाधव-जोपूळकर, कवयित्री वंदना गांगुर्डे, प्रा. पी. बी. गांगुर्डे, दत्तात्रय शिंदे आणि कुसुम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दहाव्या मैलावरील प्रसिद्ध ‘पुस्तकांच्या हॉटेल’मध्ये पार पडलेल्या सोहळ्यात, ‘वैशाली प्रकाशन, पुणे’ प्रकाशित कवयित्री वंदना गांगुर्डे यांच्या ‘इंद्रधनूचा झुला’ या पहिल्या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या साहित्यिक उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. “मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या अनेक संकल्पना आणि संस्कार या संग्रहातील प्रत्येक कवितेतून आकारास आले आहेत. संदेशात्मकता आणि काव्यमूल्य यांचा सुंदर मिलाफ साधणारा हा संग्रह बालमनावर उत्तम संस्कार करेल.” असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिक व गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी केले.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ‘पुस्तकांची आजी’ म्हणून परिचित असलेल्या भीमाबाई जोंधळे यांनी भूषवले. “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती टिकवून ठेवणे आणि पुढच्या पिढीमध्ये संस्कार जोपासणे ही काळाची गरज आहे.” असे आपल्या अध्यक्षीय भाषणात भीमाबाई जोंधळे यांनी सांगितले
मंचावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी “वंदना गांगुर्डे यांची ही बालकविता केवळ लहानांचे मनोरंजन करणारी नाही, तर ती मोठ्यांच्याही मनात सामाजिक आणि नैतिक विचारांची पेरणी करणारी ठरेल.” मनोगतात भावना व्यक्त केल्या.
“बालपण समजून घेण्यासाठी आणि नव्या पिढीला समृद्ध करण्यासाठी प्रत्येक साहित्यिकाने आपल्या आयुष्यात किमान एकतरी बालसाहित्याची निर्मिती करायला हवी.” अशी साद कवयित्री वंदना गांगुर्डे यांनी रसिकांना घातली.
सोहळ्यात कवी सागर जाधव-जोपूळकर आणि प्रा. पी. बी. गांगुर्डे यांनीही बालसाहित्यातील समकालीन संदर्भांवर समायोचित आणि अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाला. उपक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेश शिंदे यांनी केले, तर प्रा. गंगा गवळी-पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी कारभारी गांगुर्डे, प्रवीण जोंधळे, रवींद्र मालुंजकर, किरण क्षीरसागर, सविता दरेकर, मुकुंद ताकाटे यांच्यासह नाशिक परिसरातील अनेक रसिक, साहित्यिक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

