नांदगावचा हिमांशू पाटोळे ‘सुर महाराष्ट्राचा-लिटल चॅम्प २०२१’ चा उपविजेता

चि.हिमांशू कैलास पाटोळे इयत्ता दुसरी हा स्पर्धक उपविजेता (द्वितीय क्रमांक) ठरला
राजेंद्र तळेकर- नांदगाव
मनभावे कलाविष्कार मुंबई आयोजित ‘सुर महाराष्ट्राचा-लिटल चॅम्प २०२१’ ही मराठी गाण्यांची मराठमोळी राज्यस्तरीय गायन स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बु.॥ ता.नांदगाव जि.नाशिक या विद्यालयाचे उपशिक्षक श्री. पाटोळे कैलास तुकाराम यांचा मुलगा चि.हिमांशू कैलास पाटोळे इयत्ता दुसरी हा स्पर्धक उपविजेता (द्वितीय क्रमांक) ठरला आहे.
मनभावे कलाविष्कार या संस्थेचे संचालक श्री.मनिषजी लोंढे व श्री.भावेशजी लोंढे या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त यू-ट्यूब ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा वय वर्षे ५ वर्षे ते १३ या वयोगटात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ऑनलाईन स्पर्धा असल्याने स्पर्धेचे परीक्षण लाईक्स व व्यूव्ज यांचे ५०% गुण आणि परीक्षकांचे ५०% गुण (सादरीकरण व इतर गुणवत्ता) यावर आधारित झाले. या स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्र गौरव भूषण शाहिर श्री.शंकर भारदे गुरूजी तसेच ख्यातनाम संगीतकार श्री.संदिप पाळेकर यांनी केले.
सदर स्पर्धेसाठी हिमांशूने संत चोखामेळा यांचा ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग निवडला होता. त्यासाठी त्याला आदरणीय गुरूवर्य श्री. विकास चव्हाण सर चाळीसगाव तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, चाळीसगाव केंद्राचे केंद्र-संचालक आदरणीय गुरूवर्य श्री.श्रीनिवास मोडक सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या अभंगासाठी साथसंगत श्री.पाटोळे कैलास तुकाराम-हार्मोनियम, चि.पाटोळे केतन कैलास-तबला आणि सौ.पाटोळे प्रिती कैलास-छायाचित्रण यांनी केली. हा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील तमाम रसिक माय-बाप प्रेक्षकांच्या शुभाशिर्वादाचे यश आहे. हिमांशूचे जिल्हाभरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

