[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद विशेष लेख हितगुज

नीलमोहर : मनाच्या महालातील अस्वस्थतेचे श्वास शब्दांत बांधलेल्या कविता ( रसग्रहण – रावसाहेब जाधव )

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

मनाच्या महालातील अस्वस्थतेचे श्वास शब्दांत बांधलेल्या कविता

कवयित्री जयश्री वाघ यांच्या काही कविता वाचनात आल्या. अस्वस्थता हे व्यक्ततेसाठीचे एक कारण असते. व्यक्तीचे मन खूपच गूढ असते. गुढतेतील अस्वस्थता शब्दांत व्यक्त होत असेल तर, अभिव्यक्त जगण्यातील अस्वस्थता मांडताना शब्दच जणू अस्वस्थ भासतात. मनासोबत शरीर असते. शरीर क्रियांचा संबंध मनाशी असतो. जसे त्यातही पोट भुकेले असताना एखाद्याच्या मनावर तत्वज्ञान रुजवण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो. (मला न रुचते…) जेव्हा मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना अस्वस्थ हुंकार होऊन शब्द रूप धारण करत प्रकटतात त्याचप्रमाणे कवयित्री जयश्री वाघ यांच्या कवितांतून अस्वस्थतेच्या जाणिवा लयबद्ध शब्द रूप धरून प्रकट होताना दिसतात. मनाविरुद्ध सर्व चाललेले असल्याच्या त्यांच्या जाणिवा शब्दात मांडताना त्या लिहितात..
नको सांगू मला मुलांच्या, पानाफुलांच्या गोष्टी…
किंवा
मला न रुचते बाड तुझे जे लिहिले भरल्या पोटी...

मनातील दुःख खिन्नता निराशा देवाला सांगण्याचा किंवा स्तुतीचाही उपयोग जेव्हा होत नाही. तेव्हा-
‘खिन्न मनाने झुलते आहे झुंबर गाभार्‍याचे..’
कवयित्रीचे मन अस्वस्थ होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे नात्यांतील विपर्यस्त घटना-
हळदीने झाल्या जखमा
मेंदीने करपले हात
नात्यांच्या गाभाऱ्यातील
स्वप्नाची विजली वात
नात्याकडून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळावी या हेतूने संवेदनशील मन नाती जपण्याचा निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते परंतु त्याच नात्यांनी दाखवलेली स्वप्ने भंग झाली तर खिन्नता येणारच. अशा विपर्यस्त घटनांचा मनावर परिणाम होऊन हतबल झालेले मन नियतीला सदोष ठरवून मोकळे होताना दिसते.
अर्ध्यातच वाळवणाची नियतीला भलती घाई…
‘मौनाचा धिंगाणा,’ ही अशीच एक अस्वस्थतेतून उतरलेली प्रतिमा. मौन म्हटले की शरीर आणि मनाने घेतलेला संपूर्ण शांतीचा अनुभव; परंतु येथे ‘धिंगाणा’ आहे. शरीर मौन धारण करते तर मग धिंगाणा घालतच राहते आणि तो धिंगाणा क्रोध, खिन्नता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे जाणवते.
शब्दांची रिमझिम जर का
तुज भिजवू शकली नाही…
येथे प्रेमाला केलेली दमबाजी आहे. शब्दांचा परिणाम प्रेमावर झालाच नाही तर मौनाने पकडण्याचा प्रयत्न हा देखील मनाची अस्वस्थ अवस्थाच दर्शवून जातो. आपली अस्वस्थता कमी व्हावी यासाठी कवयित्री स्वतःची समजूतही घालते.
टाकीचे घाव न चुकले दगडाच्या देवालाही…
कवयित्री जयश्री वाघ यांच्या प्रेमकवितांतून मनाची ही अस्वस्थता कुठे कधी राधिकेचे कुळ होते. तर कधी सप्तरंगी तळे मनाच्या मरूद्यानात निर्माण होते; तर कधी विरागी कळ्यांची कोमलांगी दळे फुलू लागतात; परंतु तरीही…
कशी सांग येऊ, कशी सांग लावू,
छताला तुझ्या प्रीतीची झुंबरे…
ही प्रश्नार्थक अस्वस्थता तशीच टिकून राहते. अज्ञाताचे आकर्षण हे मनाला असते. येथे ‘अज्ञातातून हाका येतात’ आणि ‘काट्यात रुतलेला रमणीचा पदर कोणी सोडवित असल्याची जाणीव’ घेऊन कवयित्रीला ‘गुढ गावच्या पाऊल वाटा’ नेणीवेतून प्रकटताना जाणवतात आणि ‘इथले सारे काही इथेच ठेवण्याची जाणीव होते. म्हणजे इथे हे अज्ञाताच्या प्रवासाचे आकर्षण आहे. अज्ञाताच्या गाभाऱ्यातील हा अस्वस्थतेचा झालेला निचरा म्हणावा लागेल कदाचित…
जगणे आनंददायी व्हावे यासाठी अस्वस्थतेचा तळ शांत करण्याचा प्रयत्न कवयित्रीने शब्दागणिक केलेला आहे. कवयित्रीचे हळवे मन भोवतालच्या जगास अज्ञ व सुज्ञ मनातील संवेदनशीलतेने टिकते. या कवितांमध्ये जगणे आहे. उत्कट जीवन संवाद आहे. नात्यांचे प्रेमबंध व निरामय सौंदर्य आहे. शब्द मांडणीतील हळुवारपण, सृजनाचे हुंकार याबरोबरच माणूसपण आहे. विशेष म्हणजे स्त्रीचे कोवळे प्रेमळ मन या कवितांमध्ये ओतप्रोत उतरले आहे.

रसग्रहण : रावसाहेब जाधव(चांदवड)

पुस्तक: नीलमोहर ( काव्यसंग्रह )

कवयित्री: जयश्री वाघ

प्रकाशन : ग्रंथाली 

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या