चांदवड – तालुक्यातील खडकजांबला स्मशानभुमीच्या वादामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळल्याची घटना घडली . गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न येथे चिघळला आहे . या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु असल्याने दोन स्मशानभुमी असून रस्ता नसल्याने हा वाद मिटत नाही . त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संतप्त होत मृतदेह शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळला . 
शुक्रवारी खडकजांब येथील आदिवासी तरुण अमोल अशोक कोकाटे ( २५ ) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . त्याचा मृतदेह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर जाळला . या प्रश्नावर अगोदर काही नागरीकांनी स्मशानभुमीला रस्ता नसल्याने उपोषण केले होते . तहसीलदार कार्यालय व वरिष्ठाकडे दाद मागितली होती . नंतर हा प्रश्न न्यायालयात गेला . पण , तो प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले . त्यानंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृतदेह जाळण्यात आला . . यावेळी सरपंच पुजा अहिरे , उपसरपंच नाना गुंजाळ , ग्रामसेवक अजय पुरकर व ग्रामपंचायत सदस्यांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळू नये अशी विनंती केली . मात्र संतप्त ग्रामस्थांनी अखेर मृतदेह ग्रामपंचायती समोरच जाळल्याने काही काळ वातावरण चांगले तापले होते .

