पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
चांदवड:- भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी, चांदवड व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच योगदर्शन फाउंडेशन व योग विद्या धाम, चांदवड यांच्या सहकार्याने चांदवड तालुक्यातील नागरिकांसाठी सामूहिक मोफत योग व जलनेती प्रशिक्षण शिबिरराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात योग प्रशिक्षक राहुल (अंबादास) बी. येवला यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ओंकार साधना, विविध योगासने व प्राणायाम तसेच जलनेतीचे प्रात्यक्षिकासह महत्त्व विशद केले व सर्व साधकांकडून त्याचा प्रात्यक्षिक अभ्यास करून घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी साधकांना शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम व सुदृढ ठेवण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित योगसाधना करण्याचे आवाहन केले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 साली भारतीय योगशास्त्र हेअखिल मानव कल्याणासाठी उपयुक्त असल्याचे संपूर्ण जगाला पटवून दिले व तेव्हापासून संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्यांच्या या महान कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी अशोक व्यवहारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग पुरुष असून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे सांगितले. तसेच सुनील डुंगरवाल यांनी योग प्रशिक्षक राहुल येवला यांनी पंचवीस वर्षांच्या उत्कृष्ट योगसेवा कार्य व जलनेती प्रशिक्षण कार्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात चांदवड तालुक्याला एक चांगले नावलौकिक मिळवून दिल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले तर आभार अंकुर कासलीवाल यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश बोराडे, किशोर क्षत्रिय, महेंद्र कर्डिले आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी भूषण कासलीवाल, सुनील डुंगरवाल अशोक व्यवहारे, मोहन शर्मा, नितीन फंगाळ, बाळा पाडवी, महेंद्र कर्डिले, प्रशांत वैद्य, महेश बोराडे, अंकुर कासलीवाल, किशोर क्षत्रिय, संजय चौबे,ओमकार कर्डीले, शुभम कर्डीले, निखिल मोरे, वेदांत खंदारे, श्रीहरी बोराडे, साई बोऱ्हाडे आदी योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

