[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद लेख विशेष लेख हितगुज

गीत नवे गाऊ : बालमनावर संस्कार करणारी कविता ( रसग्रहण – वंदना गांगुर्डे)

यांनी लिहिलेले वंदना गांगुर्डे

गीत नवे गाऊ : बालमनावर संस्कार करणारी कविता

विनवणी ……

जातील संपूनी दुःखे
हा सूर्य नव्याने पाहू
आधार आमचा तुम्ही
दादा…फास नका हो घेऊ ….

काळजी करा आईची
हंबरणा-या गाईची
धीराचे आजी-आजोबा
सोबतीस त्यांच्या राहू …..

येईल दिवाळी आता
गोडाच्या होतील बाता
तरी जुनेच कपडे घालू
मज नको फटाके-खाऊ ….

मी शिवले दप्तराला
फाटक्याच पुस्तकाला
जरी वाट आमची खडतर
पण शिकून मोठे होऊ …..

ही पहाड दुःखे झेलू
कष्टाचा डोंगर पेलू
काळाच्या छाताडावरती
पाय आमचा रोवू …..

ठेवू या थोडी हिंमत
अन् जगास दावू किंमत
आयुष्य असे मोलाचे
नका उगाच उधळून देऊ …

आधार आमुचा तुम्ही
दादा…फास नका हो घेऊ ….

-राजेंद्र सोमवंशी
९८२३०१७९७७

कवी “राजेंद्र सोमवंशी “यांची “विनवणी ” ही “गीत नवे गाऊ “या बालकाव्य संग्रहातील एक कविता अगदीच मनाला भिडते….
आजबाजूला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून एका शेतकरी बापाला त्याचा एक लहान पण तितकाच समजूतदार मुलगा आर्त विनवणी करतो की फास नका घेऊ दादा
तो म्हणतो की दुःख नक्कीच संपून जातील तुम्ही तर आधार आहात आमचा.
आईची, त्या हंबरणाऱ्या गाईची काळजी, विचार करा आजी आजोबांचा विचार करा आपण सारे सोबतीने राहुयात असं विनवणी तो मुलगा करतो.
दिवाळी जरी आली ना तरी जुनेच कपडे आम्ही घालू म्हणतो.मला फटाके अन खाऊही नको पण तुम्ही आम्हाला मात्र सोडून नका जाऊ.यात एक समजूतदार मुलगा दिसतो. त्याला बाकी काही नको फक्त बाबा सोबत हवे आहे कायम.
त्याने त्याचं जुनं दप्तर आणी फाटकं पुस्तकही शिवलं आहे. कितीही कठीण वाट म्हणजे बिकट पारिस्थिती असली तरी तो शिकून मोठा होईल म्हणतो .
पहाडासारखी मोठी दुःख झेलून अन कष्टाचा डोंगरही पेलूया म्हणतो अन या काळाच्या छाताडावर पाय रोवून खंबीर उभं राहू. पण हरायच नाही.थोडी हिंमत ठेऊन जगालाही किमत नक्कीच दाखवूनच देऊ म्हणतो.आयुष्य खूप मोलाचे आहे नका असं उधळून देऊ. अशी विनवणी तो मुलगा शेतकरी बापाला करतो.
खरंच खुप मनाला स्पर्शून गेली कविता. संकटाला घाबरून आत्महत्या करणं हा काही पर्याय नाहीच उलट त्यावर मात करावी.अशी “विनवणी “या कवितेत एका शेतकरी बापाला त्याच्या लेकाने केलेली आर्त विनवणी आपल्याला दिसते….

वंदना गांगुर्डे
नाशिक

 

पुस्तक: गीत नवे गाऊ  ( बाल काव्यसंग्रह )

कवी: राजेंद्र सोमवंशी 

प्रकाशन : चपराक

लेखकाबद्दल

वंदना गांगुर्डे

लेखका , कवयित्री

एक टिप्पणी द्या