चांदवड बाजार समिती जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरः
व 305 बाजार समितीमध्ये 20 वा क्रमांक व नाशिक विभागात 8 वा क्रमांक
चांदवड(विक्रम देवरे) – जागतिक बॅंक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पातंर्गत राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यात चांदवड बाजार समितीला जिल्ह्यातील 17 बाजार समितींपैकी पाचव्या क्रमांकाची रॅकिंग मिळालेली आहे.
बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी व माल विक्रीसाठी बाजार आवारात उभारणी केलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर सुविधांच्या गुणांकाच्या आधारावर बाजार समित्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाला जागतिक बॅंकेकडून आर्थिक सहकार्य करुन राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुधारणा घडवून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याकामी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत शेतीमाल विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, बाजार समितीने योजना /उपक्रम याकरीता 35 निकष तयार करण्यात आले आहेत. सदर निकषांप्रमाणे तालुका उपनिबंधकांकडून तपासणी करुन बाजार समित्यांना गुण देण्यात आले होते. त्याप्रमाणे चांदवड बाजार समितीतील विविध सुविधांची पाहणी करुन 136 गुण देण्यात आलेले असुन या क्रमवारीत चांदवड बाजार समिती राज्यात 20 व्या, नाशिक विभागात 8 व्या तर नाशिक जिल्ह्यात 5 व्या क्रमांकावर आहे. बाजार समित्यांनी केलेल्या कामकाजानुसार गुणांकन क्रमवारी देण्यात येत असुन सदरची गुणांकन क्रमवारी मागील वर्षापासुन प्रसिद्ध करण्यात येत आहे. मागील वर्षीच्या गुणांकन क्रमवारी यादीत चांदवड बाजार समितीस 129 गुण मिळालेले असुन राज्यात 34 वा क्रमांक व नाशिक विभागात 12 व्या क्रमांकावर चांदवड बाजार समितीची रॅकिंग होती. तसेच यावर्षी बाजार समितीच्या रॅकिंगमध्ये मोठ्याप्रमाणात सुधारणा झालेली आहे.
बाजार समित्यांच्या रॅकिंगमुळे शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्री करत असलेल्या बाजार समितीच्या कामकाजाविषयी माहिती मिळत आहे. तसेच स्पर्धेच्या दृष्टीने बाजार समित्यांना काय सुविधा उभारणी कराव्या, याबाबत देखील चालना मिळाली आहे. बाजार समितीच्या विकासामध्ये शेतकरी, व्यापारी, कर्मचारी वृंद, मापारी, हमाल व अन्य बाजार घटकांचा समावेश आहे. भविष्यात बाजार समित्यांमार्फत शेतकरी हितासाठी व त्यांच्या शेतमालाला अधिकाधिक भाव मिळण्याच्या दृष्टीकोनातुन स्पर्धाक्षम बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती / उभारणी होईल. त्याचबरोबर शेतकरी लाभाच्या आणखी योजना /उपक्रम राबविण्यासाठी सर्व बाजार समित्यांना प्रोत्साहन मिळेल. अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांनी दिली. तसेच बाजार समितीचे कामकाज नियमाप्रमाणे सुरु असल्याने बाजार समितीच्या क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चांदवड बाजार समितीत मोठ्याप्रमाणात शेतीमाल विक्रीस आणन्याचे आवाहन सभापती संजय दगुजी जाधव, , उपसभापती कारभारी आहेर, सचिव श्री. गोरक्षनाथ गांगुर्डे व सर्व संचालक मंडळ यांनी केले.
“यावर्षी बाजार समितीच्या क्रमवारीत सुधारणा होवून राज्यात, विभागात व जिल्ह्यात चांदवड बाजार समितीची रॅकिंग वर आलेली आहे. चांदवड बाजार समितीची नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडून नविन संचालक मंडळ कार्यान्वित झालेले आहे. संचालक मंडळ, बाजार समिती कर्मचारी, व्यापारी, मापारी, हमाल व सर्व बाजार घटकांना समवेत घेऊन शेतकरी प्राधान्य या धोरणाप्रमाणे बाजार समितीत विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात बाजार समितीची रॅकिंग वाढण्यास मदत होईल. तसेच उपबाजार आवारांचा विकास करुन त्या ठिकाणी शेतीमाल लिलाव सुरु करण्यात येणार आहे.”
श्री.संजय दगुजी जाधव-सभापती, कृउबास,चांदवड


“यावर्षी बाजार समितीच्या क्रमवारीत सुधारणा होवून राज्यात, विभागात व जिल्ह्यात चांदवड बाजार समितीची रॅकिंग वर आलेली आहे. चांदवड बाजार समितीची नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडून नविन संचालक मंडळ कार्यान्वित झालेले आहे. संचालक मंडळ, बाजार समिती कर्मचारी, व्यापारी, मापारी, हमाल व सर्व बाजार घटकांना समवेत घेऊन शेतकरी प्राधान्य या धोरणाप्रमाणे बाजार समितीत विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात बाजार समितीची रॅकिंग वाढण्यास मदत होईल. तसेच उपबाजार आवारांचा विकास करुन त्या ठिकाणी शेतीमाल लिलाव सुरु करण्यात येणार आहे.”