कांदा निर्यात बंदी उठविणे बाबत व द्राक्ष कस्टमड्युटी रद्द करणे यासह इ मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून द्यावी यासाठी चांदवड येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन :
संजय जाधव यांच्या सह शेतकऱ्यांची मागणी
चांदवड तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने चांदवड उप विभागाचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना संजय दगुजी जाधव (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती) यांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
भारत सरकारचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी हे दि. 12/01/2024 रोजी नाशिक येथे दौ-यावर येत आहे. त्यानुसार भारत सरकारने कांदा शेतीमालावर निर्यात बंदी व द्राक्ष शेतीमालावर कस्टमड्युटी लावलेली असुन याबाबत मा. पंतप्रधान सो., यांना भेटुन निवेदन द्यावयाचे आहे. त्याकामी कांदा उत्पादक व द्राक्ष उत्पादक यांच्या भावना त्यांच्या पर्यंत पोहचविणे व चर्चा करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आपण प्रशासकीय अधिकारी या नात्याने आम्हांला वेळ मिळवुन देणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी राजावर निसर्ग कोपला व सरकार झोपले असुन कांदा उत्पादक व द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जात शेतकरी आपला उदरनिर्वाह व कुटूंबांचे पालन पोषण करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुर्णपणे कर्जाबाजारी झालेला आहे. बाजारभावातील चढ-उतार, केंद्र शासनाची शेतीमाल विरोधी धोरणे यामुळे शेती तोट्यात करावी लागणार हे, शेतक-यास माहिती असतांनाही तो कर्ज काढुन शेती पिकवितो व देशाला अन्न धान्य, भाजीपाल्याची कमतरता पडू देत नाही. मात्र त्याला देखील मर्यादा आहे. नेहमीच शेतक-यांनीच तोटा का सहन करावा ? तसेच कर्जबाजारी पणामुळे चांदवड व देवळा तालुक्यात देखील आत्महत्येसारखे प्रकार घडायला लागले आहेत. त्यामुळे मरणानंतर शेतक-यास मदत करण्यापेक्षा जीवंत पणीच शेतक-यांना मदत करा. आज शेतक-याला कुटूंबियांचा उदरनिर्वाह, मुला-मुलीचे शिक्षण, लग्न, कर्ज परतफेड इ. समस्या सतावत आहे.
मात्र शासन केवळ शेतक-यांच्या जखमेवर मीट चोळण्याचे काम करत आहे. मागच्या वर्षी कांद्यास कवडीमोल बाजारभाव मिळत होते, तेव्हा शासनाने कांद्यास प्रति क्विंटल 350/- रुपये अनुदान मंजुर केले. त्यापैकी फक्त दोन वेळेस 10 हजारांचे हप्ते देवून शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. कांदा अनुदानाची घोषणा करुन आज 1 वर्ष पुर्ण झालेला आहे. अद्याप सर्वच शेतक-यांना कांदा अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. सरकार केवळ वेळ काढुपणा करीत आहे. शेतक-यांनी पिकांचा विमा काढलेला आहे. ते विमाचे पैसे त्वरीत मिळावे
वरीलप्रमाणे सर्व समस्या शेतक-यास दैनंदिन सतावत आहे, त्यात शेतकरी वर्गाचा संयम सुटत चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या व्यथा नरेंद्रजी मोदी साहेब यांचेकडे मांडणेसाठी व कांदा निर्यात बंदी उठरविणे, द्राक्ष कस्टमडुटी रद्द करणे इ. मागण्यांबाबत त्यांची भेट घडवून द्यावी. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सो., यांची भेट होणार नसेल तर आम्हांला मा.पंतप्रधान यांना काळे झेंडे दाखविणेकामी परवानगी मिळावी. हि विनंती. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाद्वारे मागणी करणाऱ्यामध्ये श्री. संजय दगुजी जाधव, (सभापती कृउबास ), विलास रमेश भवर, राहुल शिरिषकुमार कोतवाल, भिमराव जेजुरे, समाधान जामदार, शिवाजी कासव, दिपांशु जाधव, बाळासाहेब बाबुराव शिंदे,श्री. घमाजी सोनवणे ,पप्पु कोतवाल, नंदु कोतवाल, सागर निकम, मयुर ठोंबरे, बापु अर्जुन शिंदे यांचा समावेश आहे.

