[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद मुख्य बातमी लेख विशेष लेख स्थानिक बातम्या

काळाच्या भाळावरील ‘आदोर’ ( कवी काळूदास कनोजे यांच्या नजरेतून )

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

काळाच्या भाळावरील ‘आदोर’

आदिवासी साहित्यक्षेत्रात एक सृजनशील कवी म्हणून जे आज नावारूपाला येत आहेत त्यातील एक नाव म्हणजे.. कवी डॅा. मधुचंद्र भुसारे.त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील कोटंबी या गावी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा, कोटंबी इथे झाले तर माध्यमिक शिक्षण करंजाळी इथे झाले.पदवीचे शिक्षण दादासाहेब बिडकर महाविद्यालय, पेठ येथे तर पदव्युत्तर शिक्षण एच.पी. टी. कॅालेज नाशिक इथे पूर्ण केले. प्रारंभी पासूनच अत्यंत हलाखीत जीवन जगावे लागलेल्या डॅा.मधुचंद्र भुसारे यांनी कुटुंबाला आपल्याकडून काही हातभार लागावा म्हणून विटभट्टी कामगार, कधी नाशिक मार्केटमध्ये हमाल,गवंड्याच्या हाताखाली मजूर तर कधी सरगम बँजोपार्टीमध्ये डफ वादकाची कामेही करावी लागली.आज ते दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा या ठिकाणी मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन, लेखनाची आवड असणाऱ्या डॅा.भुसारे यांचे आतापर्यंत नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समधून ५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना मागील दोन वर्षांपूर्वी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे “कोकणा जमातीच्या बोलीचा अभ्यास” या विषयावर पीएच. डी. मिळाली.वाचन व लेखनीचा व्यासंग असणारे डॅा.भुसारे यांची आतापर्यंत दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यात १५ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचा ‘आदोर’ हा पहिला काव्यसंग्रह मेधा पब्लिशिंग हाऊस अमरावती यांच्यातर्फे प्रकाशित झाला.त्याविषयी थोडक्यात..
“आदोर” म्हणजे पालापाचोळा शेतात पसरवून त्यावर शेणखत टाकून, सृजनशील जमीन भाजणे.मग या भाजलेल्या राखेत अगदी धुळवाफेत भाताच्या धानाची पेरणी केली जाते.पाऊस पडला की, या भाजलेल्या जमिनीतून निरागस बाळरोप उगवतात पण हे सारं करीत असतांना उन्हातान्हात उपाशीपोटी कष्ट करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला किती दुःख आणि वेदना येतात याचे वर्णन कवीने आपल्या काव्यसुमनांनी ‘आदोर’ या काव्यसंग्रहातून वर्णन केले आहे.
गढूळ पाण्याचा गडू
सोबत शिळी भाकर
स्वप्नातल्या पुर्या बघून
दिला तृप्ततेचा ढेकर…
डॅा.भुसारे त्यांच्या ‘ढेकर’ या कवितेतून सांगतात की, निसर्गाच्या सानिध्यात अठराविश्व दारिद्र्याचे जीवन जगणारा आदिवासी, शेतमजूर पोटाची आग विझवण्यासाठी आजही शिब्यातील एकदोन दिवसाची कोरडी भाकर व घशाचा शोष भागवण्यासाठी शुध्द पाण्याऐवजी ओढ्याच्या गढूळ पाण्याचा आसरा घेतो.कदाचित त्यालाही वाटत असावं की,इथल्या पुढारलेल्या नागरसंस्कृतीतील माणसासारखं आपणही कधी सणासुदीला चांगलं पोटभर जेवण करावं.. पण ते त्याच्या नशिबी नसते. ते केवळ त्याच्या वास्तव जीवनातील एक मृगजळच असते.
तर कवी त्यांच्या ‘वाट’ कवितेत म्हणतात.
पाऊले चालती
‘देशावरची’ वाट!
जन्मोजन्मीची वहिवाट
पोटासाठी!!
डोंगरदरीतील ग्रामीण आदिवासी समाज बांधव निसर्ग सानिध्यात वास्तव्य करतांना त्याला आस्मानी, सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागतो. एकदा का पावसाळ्याचे चार महिने संपले आणि पिकांची कापणी, मळणी झाली की, त्याच्या हाताला काही काम नसते.घरात सततची गरीबी. त्यात म्हाताऱ्या माणसांचं आजारपण.कुटुंबातील लहानथोरांच्या गरजा भागवण्यासाठी तर घरातील कर्त्या माणसाला अक्षरश: तारेवरची मोठी कसरत करावी लागते.अगदी आजही दिवाळी संपली की आपली आर्थिक निकड भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेठ, हरसुल, सुरगाणा या परिसरातील गरिब आदिवासी बांधवांचे बायका मुलांसह तांडेच्या तांडे नाशिक शहर परिसरातील द्राक्षांच्या मळ्यामध्ये तर काही गोदाघाट परिसरात रात्रीच्या जीवघेण्या थंडीत कुडकुडतांना आढळतात. कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचे एक विदारक सत्य जगासमोर मांडतांना दिसतात.
तर..कवी आपल्या ‘आरोळी’ कवितेतू समग्र विश्वातील मानवजातीलाच आरोळी देऊन निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देताना ते म्हणतात,
पाखरांचे मंजूळ स्वर
धाकानं भूमीगत झाले,
ते उजाड ललाट बघून
ना मेघ दाटून आले.
वर्षानुवर्षे होणाऱ्या बेसूमार वृक्षतोडीमुळे आज निसर्गाचा ऱ्हास होत आहे व दिवसागणिक ऋतूमानही बदलत आहे.इथल्या सृष्टी सौंदर्यावरती केवळ मानवजातीचीच मक्तेदारी नाही तर निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या सर्व पशूपक्ष्यांचाही तितकाच हक्क आहे, याची आठवण करुन देतात.पण आज इथल्या बुध्दीजीवी मानव जातीने केवळ आपल्या स्वार्थापायी निसर्गाने विश्वातील तमाम प्राणीमात्रासाठी बहाल केलेली हिरवाईची खाण दिवसेंदिवस नष्ट केली आहे.आज आपल्या सभोवती असणारे डोंगर तर अगदी उजाड आणि भकास दिसत आहेत.वनातील श्वापदे अन्नाच्या शोधापायी मानवी वस्तीकडे अतिक्रमण करीत आहेत.पक्षी पाण्याच्या थेंबावाचून तडफडून मरत आहेत. कवी आपल्या ‘आरोळी’ कवितेतून सबंध मानवजातीला एक प्रकारे आव्हान करतात..! निसर्ग वाचला.. तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व टिकेल.अन्यथा भविष्यात या सृष्टीतील सर्व सजीवांचे अस्तित्वच धोक्यात येईल.
किती पावलांच्या खुणा
या वाटेनं टिपल्या,
काही वाऱ्यांनं पुसल्या
बाकी उन्हात रापल्या.
‘शेताची वाट’ या कवितेतून शेतकरी आणि त्याला सांजसंध्या शेतात जातांना वेड्यावाकड्या वळणाची ही नेहमीच साथ देते. त्याच्या जीवाभावाच्या पाऊलवाटेचे वर्णन करतांना कवी डॅा. मधुचंद्र भुसारे वाचकांना काव्याच्या माध्यमातून पाऊलवाटेची परिक्रमा घडवून आणतात.दैनंदिन जीवनात सुख दु:खांना आपल्या कवेत घेऊन दररोज हीच पाऊलवाट त्याच्या सोबत असते.दगडधोंड्याची अन खाचखळग्याची ही पाऊलवाट कधी हिरवाईचा शालू नेसून नववधू सारखी सजलेली असते तर भर उन्हाळ्यात धुळमातीने तापलेल्या फुफाट्यावरुन अनवाणी पायांनी चालतांना रापलेल्या पायांना गरिबीची जाणीव करून देते.
काळ्याकुट्ट जमिनीत
बैलं ओढती नांगर,
मागं मागं धावत
किड्या मुंग्या वेचती पाखरं.
कवी ‘आदोर’ या कवितेतून आदिवासी शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन करतांना सांगतात, शेतात पालापाचोळा भाजून तयार केलेल्या आदरात वरुन राजाच्या आगमनाअगोदर शेतकरी बांधव भाताच्या धानाची पेरणी करतो.जेव्हा नांगराला बैलं जुंपून तो भाजलेल्या काळ्याकुट्ट आदराची नांगरणी करतो तेव्हा जमिनीच्या उदरात आपल्या अस्तित्वासाठी दडी मारून बसलेले कृमी, कीटक नांगराच्या फाळाच्या आघाताने बाहेर पडतात.जस-जसे हे नांगर पुढे जाते, तसे तसे या कृमी कीटकांवर आपला उदरनिर्वाह भागवणारी रानपाखरं त्यांना टिपण्यासाठी नांगरलेल्या तासातून पुढे पुढे जातात.कवीने आपल्या कवितेतून निसर्गातील अन्नसाखळीचे थोडक्यात वर्णन केले आहे.पण हे अन्न प्रत्येक सजिवाला अगदी सहजासहजी मिळत नसते.त्यासाठी कष्टाला संघर्षाचीही जोड असावी लागते.
जव्हा फुटतं तांबडं,कोंबडं आरवतं,
तव्हा मला ऐकू येतं,आई तुझं ओवीगीत,
जात्याची घरघर,तुझं मग्न गाणं
तुलाच कशी मिळालं गं ही दैवी देणं
‘आई’ या कवितेतून कवी आयुष्यभर अनंत अडचणींचा सामना करीत आपल्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या अडानी माईचे वर्णन आपल्या काव्यातून अगदी चपखलतेने मांडले आहे.आपल्या लेकरांसाठी अहोरात्र शेतात राबणारी माय कितीही दमली भागली तरी पहाटे कोंबड्याने बांग दिली की कुशीत झोपलेल्या बाळाला अलगद झोळीत घालून घरातील जात्यावर दळण दळत असते.झोप लागू नये म्हणून ती मुखाने ओवी गाते.पहाटेच्या निरवं शातंतेला भंग करणारा आईच्या नादमाधुर्य आवाजाने कवीला प्रश्न पडतो..!की हे माय..आम्हा लेकरांसाठी दिवसभर काबाडकष्ट करूनही तुझ्या मनातील व्यथा आणि वेदना बाजूला सारून इतक्या मधूर आवाजात पहाटवेळी ओवी गातेस.कदाचित हे दुःख पचवण्याची क्षमता आणि हा गोड गळा ही कदाचित निसर्गरुपी तुला मिळालेली दैवी देणगीच नाही का?
वाळू,ईटा भरून भरुन
हाताला गेल्या चिरा,
बसून दु:ख टोकरीत
येतो दुर्दैवाचा फेरा
‘फेरा’ या कवितेमधून कवी आपल्या वास्तव जीवनात विटभट्टीवर उन्हातान्हात कष्ट उपसतांना त्यांच्या मनाची होणारी घालमेल आपल्या काव्यातून विषद करतात.नदीपात्रातून जड, ओली वाळू आपल्या डोईवरच्या टोपलीत घेऊन अनवाणी पायांनी तापलेल्या खडकावरून चालतांना पोळणारे पाय तर कधी विटभट्टीवरुन तापलेल्या विटा उचलतांना तळहाताला येणारे फोड त्यातून होणाऱ्या शाररिक यातना कवी आपल्या ‘फेरा’ या कवितेतून मांडतात.
एकंदरीत’आदोर’हा कवितासंग्रह वाचतांना कवीने आपल्या वास्तव जीवनात त्यांना आलेल्या अनुभवांचे हुबेहुब वर्णन आपल्या अलवार शब्दकळांनी कवितांमधून मांडले आहेत.तसेच निसर्ग व आदिवासी समाज यांचे किती अतूट व घनिष्ट नाते आहे, हे संपूर्ण कवितासंग्रह वाचल्यावर लगेच लक्षात येते. कवीने निसर्ग व मानवी जीवन यातील बारीकसारीक गोष्टीचे वर्णन यथोचित केले असून ‘आदोर’ हा काव्यसंग्रह वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल यात शंका नाही.कवी डॅा. मधुचंद्र भुसारे यांना पुढील लेखनासाठी अनंत शुभेच्छा..!

कवी काळूदास कनोजे
साहित्यिक, निसर्ग व आदिवासी समाज संस्कृती अभ्यासक

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या