‘आदिवासी कोकणा जमातीच्या जीवनातील बोलीचा सामाजिक व सांस्कृतिक आविष्कार : धूनीवरल्या गोठी’- डॉ. भुसारे
आदिवासी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, आत्मचरित्र असे अनेक साहित्य प्रकार हाताळले गेले आहेत परंतु ललित साहित्य प्रकार हा आदिवासी साहित्यामध्ये दुर्मिळच. असे असताना आदिवासी कोकणा अस्सल बोलीभाषेत लिहिलेले प्राध्यापिका गंगा गवळी- पवार यांचे ‘धूनीवरल्या गोठी’ हा पहिला ललित गद्य संग्रह नुकताच प्रकाशित झाला.
बोलीभाषा लुप्त होण्याच्या काळात अस्सल बोली भाषेत लिहिलेले हे ललित गद्य नक्कीच आदिवासी साहित्यात मैलाचा दगड ठरले आहे. ‘धूनीवरल्या गोठी’ या ललित गद्यामध्ये एकूण ०९ ललित लेखांचा समावेश असून मुखपृष्ठ अत्यंत बोलके व लक्षवेधक आहे. कोकणा जमातीची अस्सल रसाळ बोली वाचकांचे मन वेधून घेते व निरागस, निर्मळ, साध्या-सोप्या भाषेत अवतीभवतीचा निसर्ग, समाज, संस्कृती अगदी सहजतेने वाचकांच्या समोर आविष्कृत करून हुबेहूब उभी करण्याचे सामर्थ्य व चित्रमयशैली ललित लेखिका प्राध्यापिका गंगा गवळी-पवार यांच्या लेखणीत असल्याचे जाणवते. हे ललित गद्य हाती घेतल्यानंतर शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते.ओघवती निवेदन शैली हे ललित लेख संग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. १
‘मिरगाची घाय’ या ललित लेखांमध्ये आदिवासी भागात मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाळ्याची चाहूल लागते. त्यावेळेस आदिवासी भागातील माणसे जीवनावश्यक वस्तू, जनावरांसाठी चारापाणी तसेच पूर्ण पावसाळाभर पुरतील अशा अनेक वस्तूंची जमवाजमव सुरू करतात. याचे वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘पावसाळा सुरू होयेची आदि जनाहून पाहला, तनाहून मुंग्यांची रय लागेल दिसं… धान्याचा येक येक कण गोळावून, वारुळात नेऊन ठेवाये त्येंची घाय चालं….मुंग्या दिसभर भंगत होव्या का नाय, पण त्या धान्याचा येक येक कण गोळावत…. तसाच मिरीग सुरू झाल्येवर जेथवडचे कामांची लोकांची धांदल उडं….(पृ.१७) अशाप्रकारे मिरीग नक्षत्राच्या आगमनाच्या प्रसंगी आदिवासी माणसांच्या होणाऱ्या अत्यंत घाई गडबडीचे वास्तव व हुबेहूब चित्रण केले आहे. गोवऱ्या भरणे, तनस भरणे, दाढ पेरणे, दाढी पेरताना करावयाचा विधी, पाऊस सुरू झाल्यावर कौलारू घरातून गळणारे पाणी, पान घोंगड्यांची तयारी, चिंचेखाली हिंदोळा घेऊन चिंचेचा कोवळा पाला खाणे, तनस भरताना मौज मजा करणे, भात व दळण भरडणे, बायांचे डाळी साळी तयार करणे, हळद ,मिरची तयार करणे, तेल मिठाची तयारी करणे, अचानक पावसाचे वादळी वातावरण तयार होऊन आकाशात धुरळा उडणे, विजा चमकणे, जोरात पावसाचे सुरू होणे, विजांच्या आवाजाने लेखिकेचे घाबरणे, पावसामुळे फुलांचे जमिनीवर पसरणे, पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध, पाऊस पडून गेल्यानंतर पोरांचे विविध खेळ खेळणे या सर्व बाबी चित्रपटासारख्या नजरेसमोरून उलगडत जातात. मिरगाच्या पहिल्या पावसाच्या थेंबाचे त्यानंतर मातीच्या येणाऱ्या सुगंधाचे वर्णन करताना लेखिका म्हणते, ‘मिरगाचे पयले पावसात मातील जो सुवास येतोय, त्येची सर जगातले कनच्येच माहागीचे आत्तरालाही येणार नाय…(पृ.३०) मातीच्या सुगंधाचे मोजक्या शब्दात केलेले वर्णन शब्द वैभवाची साक्ष देते. आदिवासी जगण्याचे अत्यंत वास्तव व नेमके चित्रण लेखिकेने या लेखात केले आहे. २
‘नदी’ या ललित लेखांमध्ये लेखिकेने गावाजवळील पाथरटखंडी आणि चोंडी नदीचे वर्णन केले आहे. नदी म्हणजे जीवनदायिनी. लेखिकेचे या नदीशी जन्म-जन्मोंतरीचे नाते जडले आहे. नदीच्या सानिध्यात ती आपली भोळे-भाबडे रूप न्याहाळते. नदी तिला स्वतःचा निर्मळ चेहरा दाखविणे, सतत वाहत राहून इतरांची तृष्णा भागविणाऱ्या या गावच्या दोन नद्या लेखिकेच्या जणू मैत्रिणीच आहेत. सुट्टीच्या दिवशी लेखिकेला या नद्यांना भेटायची आंतरिक ओढ लागते. आदिवासी माणसांना निसर्ग, शेती, नदी, नाले, डोंगर, दऱ्या-खोऱ्या याविषयी अत्यंत प्रेम आहे. हेच प्रेम लेखिकेच्या या लेखात आपसूकच आलेले दिसते. बाई आणि नदी यांच्यातील स्नेहबंध व साम्यता कुठेतरी या लेखात जाणवते. लेखिका व तिची बहीण पाण्यामध्ये काड्या टाकून खेळ खेळतात. नदीच्या काठावर उभे राहून त्यात आपला चेहरा न्याहाळणे लेखिकाला नेहमीच आवडते. नदीच्या काठावरील वातावरण, थंड पाण्याचे उडणारे शिंतोडे, पाण्यातील उठणारे तरंग, नदीच्या काठावर फुलणारी फुलझाडे व आजूबाजूला विहरणारे विविधरंगी पक्षी यांची अचूक ओळख लेखिकेने या लेखातून करून दिली आहे. नदीवर गावातील सर्वांचे कपडे धुवायला, आंघोळीला येणे, निरमा वाशिंग पावडरचा प्रसंग व निरमा नावाची मुलगी वारल्याने लेखिकेला त्याचे वाईट वाटणे लेखिकेच्या संवेदनशील स्वभावाची जाणीव करून देते. ‘नदीशी मुके भावनांनी चावळायलं, तिच्ये पाण्यात मनाजोगा खेळाये हीच तं संदी रह माजेसाठी….! (पृ.४०). गावातील नद्यांशी लेखिकेचे अत्यंत भावनिक असे नाते जुळलेले आहे. नदीशी संवाद साधण्याची व तिच्यासोबत खेळण्याची संधी लेखिका नेहमी शोधात राहते. त्यामुळेच नदी आणि लेखिका यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटलेले आहे. लेखिका नदीशी पूर्णपणे एकरूप झाल्याची भावनामय दिग्दर्शन केल्याचे आढळते. नदी दुसऱ्यांची तहान भागवते, पशु पक्षांना रानपाखरांना गारवा देते. माणसांच्या अंगाची लाही लाही शांत करते. सर्वांना जीवन देते तसेच स्रीचे देखील आहे. म्हणूनच कदाचित एक आदिवासी स्त्रीला नदी ही आपल्या मैत्रीण, सखी सारखीच भासते. नदी आणि स्री यांच्यातील साम्यतेचा अचूक भाव लेखिकेने या लेखात पकडला आहे. गावाकडील नदीचे रूप आणि आता नोकरी निमित्ताने नाशिक सारख्या शहरात स्थिरावल्यावर तेथील वाहणाऱ्या तशाच कोरड्या ठाक पडलेल्या नदीचे रूप पाहून लेखिकेचे मन विषन्न होते. म्हणूनच ती म्हणते, ‘नितळ, सुंदर आसा तिचा मूळ रूप… पण माणसानी तिची कसीक गत केल्येय…? होडाच नाय, तं जागजागी धरणा बहांदून तिच्ये मोकळे खळाळून वाहण्यावर बंदनाच घातलीय तं… येखुदे येळस मगूनच मनातला समंदा दुःख सहन करत शांत होयेल होवी’(पृ.५०) अशा पद्धतीने नदीचे जणू काही आत्मकथनच लेखिकेने या लेखांमधून प्रतिबिंबित केल्याचे शेवटपर्यंत जाणवते.
३.
‘धुनीवरल्या गोठी’ या ललित लेखांमध्ये आदिवासी भागांमध्ये संध्याकाळी जेवण झाल्यावर लोक शेकोटी पेटवून बसतात. ही शेकोटी म्हणजेच ‘धूनी’. या धूनीच्या आजूबाजूला लहान मोठी, स्रीया, मुले, माणसे, मुली, म्हातारी माणसे सर्वच बसतात व गप्पाटप्पा मारतात. या धूनीवर बसताना हसत खेळत होणारे विनोद, एकमेकांची केली जाणारी टिंगल टवाळी तरीही एकमेकांवर न रागावणे, एकमेकांच्या घरातील सुखदुःखे या धूनीवर वाटून घेतले जातात. एवढी साधी भोळी स्वभावाची आदिवासी माणसे या धूनीवरल्या गोठी या ललित लेखात शेवटपर्यंत दिसतात. धूनीजवळ अनेक सुखदुःखाचे प्रसंग तर चर्चिले जातातच परंतु कोणाच्या घरी काय चालले आहे, सुख,दु:ख, मुला माणसांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, यांच्यावरही मुक्तपणे चर्चा होते, हास्य विनोद होतात. हे आदिवासींचे अवखळ व निखळ जगणे लेखिकेने अचूक शब्दात मांडले आहे. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘धूनीवर शेकता शेकता, जसा काय सुकाचा चांदणा लोका आपआपल्येत वाटून घियेची….आन मनातला संमदा दुःख त्यात चावळता चावळता येकमेकांखल मन मोकळा करून धूनीचे आगीत जसा काय जाळून टाकत…(पृ.५४) ही धूनी म्हणजे आदिवासींच्या करमणुकीचे साधन. इथे अनेक वेळा अंगावर काटा उभा करणाऱ्या भुताखेतांच्या रहस्यमय कथा म्हातारी माणसे लहान मुला, माणसांना सांगतात. त्यातून करमणूक होते, ज्ञानही मिळते परंतु मनात भीती देखील उभी राहते. आदिवासी भागांमध्ये पूर्वीसारखी करमणुकीची साधने नसल्याने या धूनीवर बसून अशा गप्पा गोष्टी मुक्तपणे व्हायच्या. त्यातून या रहस्यमय कथांचे कथन लोक करायचे व दोन गोष्टी इतरांनाही शिकायला मिळायच्या. लेखिकेचे रेडिओवर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची सुरेल गाणे ऐकणे त्यातून मिळणारा निखळ आनंद प्रदर्शित केला आहे. धूनी पेटवण्यासाठी लागणारे सरपन, काड्यामुड्या माणसे जमा करायची आणि रात्रीच्या वेळी धूनी पेटवून बाया मिसरी जाळायच्या. एकमेकींसाठी ही मिसरी काढून ठेवायच्या. विचारांची होणारी देवघेव सुखदुःखांची होणारी वाटणी, मस्करी व यातून होणारी करमणूक हा आदिवासींच्या जीवनातील आनंद स्वर्ग सुखापेक्षाही कैक पटीने महत्वपूर्ण आणि अनोखा असल्याचे जाणवत राहते. या धूनीवरल्या चर्चेत अमावस्येच्या दिवशी म्हस्याचे निघणे, चारणवाडीत चारनीनचे निघणे, गावातील चिंचेच्या झाडावर भूत दिसणे, बांधावरले फांगुळटेजवळ उभा असलेला खैस दिसणे अशा अनेक गोष्टी ऐकल्यावर लहान मुलांचे आणि लेखिकेचे घाबरणे साहजिकच आहे. या गोष्टी खऱ्या की खोट्या याविषयी लेखिकाला प्रश्न पडतो परंतु आदिवासी माणसांची यातून करमणूक होते.ऐकीव गोष्टी लेखिकेच्या मनात बसल्यानंतर चिंचेचे झाडाखाली, मसनवटीमध्ये किंवा रस्त्यांना चालताना अचानक त्या भुताखेतांच्या गोष्टी मनात येऊन लेखिका अशा ठिकाणापासून दूरच राहते. बसमध्ये घडलेला भुताचा किस्सा अंगावर काटा उभा करतो. मसनवटीत निघालेली अमावस्येच्या दिवशीची भुतावळ असे अनेक किस्से ऐकल्यावर वाचकांची घाबरगुंडी उडेल अशी वर्णने लेखिकेने चितारली आहेत. या सर्व गोष्टी आदिवासी माणसांना ऐकायला भयानक वाटत असल्या तरी पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात कारण गोष्टीविषयी माणसाला पूर्वीपासूनच जिज्ञासा आहे हेही तितकेच खरे आहे. परंतु आज मात्र गावागावाने कात टाकली असून अंगणात पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या म्हणजेच धून्या नाहीशा झाल्यात. एकमेकांच्या बद्दल असणारी आपुलकी, मायेची ऊब ही कमी होत चालले. बोथट झालेल्या माणुसकीच्या खुणा लेखिकेलाही आज जाणवल्यावाचून राहत नाहीत.
४
‘इहीर’ या ललित लेखामध्ये गावातील बनवाडच्या शेजारी असलेली गावकीची विहीर व तिच्या अवतीभवतीचे रेखाटलेले निसर्ग चित्र विलोभनीय व रमणीय असेच आहे. ‘इहीर’ म्हणजे एकमेकींच्या सुखदुःख वाटून घेण्याची जागा. एकमेकींना पाणी भरून लागणे, हांडे उचलून देणे, कपडे धुणे, आंघोळी करणे, पशु-पक्षी, प्राणी,जनावरे यांना मिळणारे थंडगार पाणी यासाठी विहीर एक महत्त्वपूर्ण अशी जागा आहे. लेखिकेचे सुट्टीच्या दिवशी किंवा पाणी भरणारी बाई ज्या दिवशी नसली त्या दिवशी विहिरीवर जाणे होते. विहिरीवर सकाळी सकाळी होणाऱ्या स्त्रियांची लगबग व पाणी भरतानाचे अत्यंत जीवंत चित्र लेखिकेने हुबेहूब रेखाटले आहे. थंडीतही अंगामध्ये कोणत्याही प्रकारचा गरम स्वेटर न घालता स्त्रियांचे पाणी भरायला जाणे इथे आदिवासी स्रीयांची दारिद्र्य अवस्था ठळकपणे दर्शवते. भांडी घासण्याची कोणतीही साधने नसताना चिंचेचा पाला, मीठ, लिंबू, चिंच, चुलीतील राख अशा मिळेल त्या साधनांनी भांडी घासण्याची कला आदिवासी स्त्रियांनी आत्मसात केली आहे. कोणत्याही प्रकारचा खर्च न करता, कोणत्याही गोष्टीचे अचूक व्यवस्थापन करण्याची कला आदिवासी स्रियामध्ये आहे, हेही यातून जाणवते. एकमेकींचा बाजार करून आणणे, एकमेकींना कामात मदत करणे, संकटामध्ये धावून जाणे, एकमेकींच्या गरजा भागवणे आणि अशी कामे करायला आदिवासी स्त्रियांना खूपच आवडते. हा स्वभाव आदिवासी जमातीच्या स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जाणवतो. लेखिकेचे विहिरीवर पाणी भरायला जाणे आणि तिच्या आईने तिची काळजी करणे हे मातृ वत्सलतेचे मनोहरी चित्रण देखील येते. दुपारच्या वेळेला विहिरीवर मुला-माणसांची अंघोळीसाठी होणारी गर्दी बालपणीच्या आठवणी जाग्या करतात. विहिरीवर होणाऱ्या चर्चांमध्ये एखाद्याच्या घरातील सुनेला होणारा सासुरवास, एखाद्याच्या घरी येणारी माहेरवाशिन, सासूने दिलेला त्रास, सासु-सुनेची झालेली भांडणे, बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा, गावातील जमलेली लग्न अशा अनेक गोष्टी असतात. यातून विचारांची देवाण-घेवाण होते. म्हणूनच लेखिका म्हणते, ‘गावची इहीर मजे, जशी काय गावातल्या गल्लीबोळातल्या खबरा घरुघरी पोहोचवायचा येक सादनच होती तं…! (पृ.८३) गावातील विहिरीवर एकमेकांची आपुलकीने होणारी चर्चा, विचारपूस, एकमेकांना केली जाणारी मदत या सर्वांची साक्षीदार लेखिका आणि इहीर आहे. आज विहिरीवर गेल्यानंतर लेखिकेला गतकाळ आठवतो परंतु आज पहिल्यासारखे वातावरण विहिरीजवळ दिसत नाही. गावात पाणी आले. घरोघरी नळ आले त्यामुळे विहीर ओस पडल्याची जाणीव लेखिकेला पावलोपावली होती. कुणीही कुणाला समजून घेण्यासारखे राहिले नाही व पूर्वीसारखी एकमेकांबद्दलची आत्यंतिक ओढही राहिली नसल्याची खंत लेखिका या लेखाच्या शेवटी व्यक्त करताना दिसते. ५
‘खळ्यावरली मळणी’ हा ललित लेख आदिवासी भागांमध्ये पिकांची केली जाणारी मळणी व तिचे जीवंत चित्रण लेखिकेने या लेखात केले आहे. आदिवासी भागात भात, नागली, उडीद, वरी या पिकांची मळणी केली जाते. या पिकांची मळणी करताना करावी लागणारी खळ्याची तयारी, खळे सारवणे, त्याच्या मध्यभागी खीरबड टाकणे अशा बाबी पार पाडाव्या लागतात. खळे सारविण्यासाठी लेखिका आणि तिच्या बहिणी नदीवरून पाणी वाहतात. वडील व बहिणी यांचे उन्हातानात कष्ट करणे आणि वडिलांच्या अंगातून घामाचे टप टप गळणे हे आदिवासींच्या कष्टाचे अत्यंत वास्तव व मार्मिक चित्र उभे केले आहे. या लेखात प्रतिमा, प्रतीके, रूपके यांचा लेखिकेने अत्यंत मार्मिकपणे वापर केला आहे. खळ्यासाठी ‘येखुदे आवूनी शिंगार करून कुकवाचा गोल ठसठशीत टिळा कपाळावर कहाडावांना तसाच शेताचे शिवारात त्या खळा उठून दिसं…(पृ.९०) ही प्रतिमा समर्पक अशीच रेखाटली आहे. नागलीची होणारी मळणी, मळणी करणाऱ्यांची चालणारी चेष्टा-मस्करी, लेखिकेचे भोंगीत(झोपडीत) बसून मळणीचे दृश्य बघणे, खळ्यावर भाकरी घेऊन जाणे, खळ्याच्या अवतीभवती फिरणे, मातीवर उमटलेल्या पाखरांच्या पाऊलखुणा पाहून हरवून जाणे, जंगलात आढळणारे विविध पक्षी त्यांच्या हालचाली पाहण्यात मग्न होणे आणि निसर्गाच्या सहवासात जेवण करायला येणारी मजा या गोष्टी रसभरीतपणे लेखिकेने रेखाटल्या आहेत. मळणी करणाऱ्या आदिवासी माणसांची पाखरे पकडण्याची कला अचूकपणे टिपली आहे. मळणी करून धान्याची पोती घरी घेऊन आल्यावर धान्याची केली जाणारी पूजा व आई-वडिलांच्या चेहऱ्यावर भरपूर धान्य पिकल्याने झळकणारे समाधान लेखिकेने नेमकेपणे टिपले आहे.
६
‘सांज’ या ललित लेखामध्ये गावाकडच्या मावळतीचे वातावरण तसेच संध्याकाळाच्या स्थितीचे विलोभनीय चित्र रेखाटले आहे. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये संध्याकाळी सूर्य मावळताना आकाशाचा बदलणारा रंग, ढगांचे बदलणारे आकार, गुराढोरांचे घरी येणे, बगळ्यांची गावातील चिंचेच्या झाडावर बसणे, पक्षांचा होणारा कलकलाट, गजबजलेला गाव, खेळणाऱ्या मुलांचा आवाज साऱ्याची सरमिसळ असलेल्या आवाजाने आदिवासी भागातील गावाची संध्याकाळ गजबजून जाते. झाडावर बसणारे बगळे व त्यांना उडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्या या खेळांमध्ये लेखिका मग्न होऊन जाते. यानिमित्ताने ‘बगळ्या बगळ्या कवडी दे, हरणगावची नवरी ने हरणगाव जळाला नवरी घेऊन पळाला’
हे आदिवासी भागात म्हटल्या जाणाऱ्या गाण्याचा उल्लेख येतो. या गाण्याचा करविता कोण? हे गाणे कसे सुचले असेल? याविषयीचे प्रश्न लेखिकेला पडतात. या लेखात आट्यापाट्या, हत्याची सोंड, येलदऱ्या,लपादपी, निंगोरश्या, डोंगराला आग लागली पळा पळा अशा आदिवासी भागातील अनेक खेळांचे वर्णन केले आहे. वाऱ्याच्या झुळकेने घमघमणारा मोगरा व त्याचा सुगंध साऱ्या घरात, साऱ्या गावात दरवळत राहायचा. शांत मोगरा सगळ्या गावाला मोहून टाके. संध्याकाळ झाल्यावर दिवाबत्तीची झालेली वेळ, लेखिकेच्या आईचे दिव्यात आणि कंदिलात रॉकेल भरणे, कंदील स्वच्छ करणे, तो करताना बघणे लेखिकेला अप्रूप वाटते. देवळातील वाजणारी घंटा, तिथे जळणारा दिवा लेखिकेच्या मनात उत्साह निर्माण करतो. संध्याकाळ संपल्यावर गुराढोरांचे हंबरणे बंद होते. पक्षांचा कलकलाट बंद होतो. दिवे बंद होतात. कष्टकरी बैल विसावतात त्यावेळी बाहेरगावी गेलेली माणसे त्यांची वाट पाहून विरह सहन करणारी घरातील माणसे काळजीत गढून जातात. लेखिका शहरात राहत असून तिथे रस्त्यांवर झगमगणारे दिवे आणि त्या दिव्यांनी उजळून निघणारी शहरातील सांजवेळ आणि गावाकडील सांजवेळीसारखी अजिबात भासत नाही. शहरातील टीव्हीवरील, रेडिओवरील कार्यक्रम पाहून ऐकून, मालिका बघून, वाचन करून, गाणे ऐकून लेखिकेचे मन प्रसन्न होत नाही परंतु घरापुढील सडकेवर खेळणाऱ्या मुलांना पाहून तिला गावाकडच्या सांजवेळीची निश्चितच आठवण होते.
७
‘वनरायची लगन घाय’ या लेखांमध्ये आदिवासी भागातील जंगलामध्ये फुलणारे, बहरणारे फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली यांच्या सुंदर करामतीचे चित्र केले आहे. झाडांच्या खाली गळून पडलेली पाने व वाऱ्याच्या झुळकेने आकाशात उडणारे पाणी साऱ्यांनी वातावरण बदलून जाते. उघडी बोडके निष्पर्ण वृक्ष पाहून लेखिकेचे मन उदास होते. लेखिकेला निसर्गाविषयी अत्यंत प्रेम आहे हे प्रकर्षाने जाणवत राहते. हळूहळू निसर्गात बदल होतो आणि झाडांवर हिरवा रंगाची पालवी फुटते व सादडा, पळस, पंगारा, सावर, आंबा, करुंदी, धायटी अशा झाडांवर छोटी छोटी पाने हिरवा रंग धारण करू लागतात. आंब्याचा मोहोर घमघमू लागतो. मोहफुल बहरू लागतात. पांढऱ्या फुलांनी भरलेल्या मोहाला दिलेली फॉरेनच्या मुलीची उपमा अत्यंत साजेशी आहे. फॉरेनच्या मुलींनी गावात भेट देण्यासाठी आल्यावर त्यांना आवडलेली शिऱ्याची डिश आणि ‘व्हॉट इज धिस? ‘धिस इज शिरा’ या वाक्याने लेखिकेला फुटलेले हसू विनोदी वातावरण निर्माण करते. पांढऱ्या फुलांनी बहरलेली नेवाळी, पिवळ्या धम्म फुलांचा मांडव घेऊन सजलेला बाहवा, साऱ्या रानाला रानभूल पाडणारा फुललेला पळस, पंगारा व सावरीची फुले मन मोहून टाकतात. या जंगलात तरुण जवानाप्रमाणे फिरणारा तपकिरी रंगाचा काकडकुंभाऱ्या पक्षी, सुंदर आवाजाने सारे रान भारून टाकणारी कोकिळा, पक्ष्यांचे स्वच्छंदी पण पाहून रानपाखरांचा हेवा लेखिकेला वाटतो. धायटीच्या फुलांचे फुललेले घोस, मधाचे लटकलेले पोळे हा सारा सजलेल्या वनराईचा उत्सव पाहून लेखिकेचे मन भरून येते. इथला निसर्ग आणि माणसे देखील जीवन आनंदाने कसे जगावे? हे शिकवतात आणि लेखिका या बदलत्या निसर्गाचे रूप सदैव आपल्या मनात साठवत राहते. भरलेली वनराई पाहून मन उत्साही होते आणि निष्पर्ण झालेली वनराई पाहून लेखिकेला उदास वाटते. तरीही निसर्गाचा नियम लक्षात घेऊन आपण कधीही खचून न जाता जीवन जगावे असा अनमोल सल्ला जणू काही निसर्ग लेखिकेला देतो.
८
‘गवराय’ म्हणजेच आखाजीचा सण. ‘गवराय’ या ललित लेखात आदिवासी भागात साजरा केला जाणारा हा सण, त्याचे उत्साही वातावरण वाचकाचे मन मोहन टाकतो. गवराय पेरण्यासाठी बांबूच्या दुरडीत आणली जाणारी माती, त्यात पेरले जाणारे धान्य व त्यातून उगवणारे कोंब याचा अंदाज लावून येणाऱ्या वर्षी पीक कसे पिकेल? हा अंदाज बांधला जातो. हा एक आदिवासींचा माती परीक्षणाचा महत्त्वपूर्ण प्रयोगच समजला पाहिजे. आदिवासींचा वैज्ञानिक दृष्टिकोन यामागे दडलेला निश्चितच दिसतो. गवराय पेरल्यानंतर दररोज संध्याकाळी घराघरांमध्ये बाहेर बसून गाणे म्हणणाऱ्या मुली व त्यांचे गाणे सुंदररीत्या रेखाटले आहेत. ‘काळे वावरी वली चिकन माती’, वाटवरला महू ठपक्या गळं’, वाटवरला चिचोबा’ अशी अनेक गौराईची गाणी लेखिकेने मांडली आहेत. यावरून लेखिकेला आदिवासी संस्कृतीची, सण उत्सवांची इथंम्भूत माहिती असल्याचे जाणवते. त्याबरोबरच त्यांच्या लेखनात लोकसाहित्याच्या अभ्यासाचे प्रतिबिंब स्पष्टपणे पडलेले आढळते. घरोघरी टिपऱ्या वाजवून गाणे म्हणणाऱ्या आदिवासी मुली, जिखना ओळखण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आदिवासी मुलींच्या जिज्ञासू वृत्तीला व तर्कशक्तीला चालना देणारे हे खेळ खरोखरच उल्लेखनीय असे आहेत. घरोघरी फिरून गौराईच्या सणाच्या दिवशी मिळालेले पैसे एकत्र व समान पद्धतीने वाटून घेऊन त्याचा बिस्किटे घेण्यासाठी केला जाणारा वापर असे अनेक प्रसंग लेखिका सहजपणे कथन करीत जाते. अर्थात ‘आखाजीचा, गौराईचा सण म्हणजे घरातील लक्ष्मीचे पडलेले पहिले पाऊलच होय’ असे लेखिकेला वाटत राहते.
९
‘गाव माझा बेस होता’ या शेवटच्या ललित लेखांमध्ये लेखिकेने गावातील माणसांचे जगणे, माणसातील हितसंबंध, जिव्हाळा, माणुसकी यांचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन घडविले आहे. कुडा मातीची घरे असूनही माणुसकीने श्रीमंत असलेली माणसे या लेखात पावलोपावली भेटतात. एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी एखाद्याच्या घरातूनच सरळ रस्ता असायचा परंतु याचे त्या घरातल्या माणसाला कधीही वाईट वाटायचे नाही अशी समजदार माणसे या लेखात चित्रित केली आहेत. आदिवासी भागात कधीही चोऱ्या होत नाही. एकमेकांना मदत करणे, समजून घेणे, कोणाच्याही बद्दल किंचीतही वाईट न चिंतणे हे आदिवासी जीवनाचे सर्वोच्च मूल्य या लेखात दडलेले आहे. घराजवळ एखादा पाण्याचा मोठा रांजण भरून ठेवला जायचा त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तहान भागते व त्यातून मिळणारे आत्मिक समाधान चेहऱ्यावर झळकायचे. आदिवासी भागातील माणसे भोळी, भाबडी असून कोणतीही वस्तू चोरीला जात नाही. आदिवासी माणसांचा प्रामाणिकपणा, एकमेकावर असलेला विश्वास, कमीत कमी वस्तूंमध्ये भागविल्या जाणाऱ्या गरजा, समंजसपणा, बारीक सारिक वस्तूंची केली जाणारी देवघेव यातून आपापला तोडका मोडका संसार फुलवणाऱ्या आदिवासी माणसांचे जीवन चितारले आहे. ‘कदी कोणाचे घरी येखुदा आजेरी पडला…. त मुगाची डाळ मागाय इयाचा. मग अस्या येक नाय त कित्यिक किरकोळ कारकोळ वस्तूंची उदार उसनवारीनी देवघेव होयेची’.(पृ.१५७) अशा पद्धतीने छोट्या मोठ्या वस्तूंची देवघेव करून कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न बाळगता होणारा हा व्यवहार या विचारांचा आदर्श घ्यावा असाच आहे .म्हणूनच लेखिकेची आई म्हणते,’ आवं पोरग्याहो अडल्या-नढल्या येळस शेजार पाजाऱ्याल आस्या वस्तू दियेलं लागत्याय… त्येचेनी त्यंचीही गरज भागत्येय… आन आडआडचणीचे टायमात त्येचं त कामी येतंय….(पृ.१५८) ही मदतीची भावना आदिवासी भागातील माणसांमध्ये प्रामुख्याने जाणवते. एखाद्याच्या घरी आंबे किंवा इतर फळे पिकली तर ती शेजारीपाजारांना वाटली जातात. वानवळा दिला जातो. घरात आंबे पिकले असतील तर गावातील, गल्लीतील मुलांना बोलवून त्यांना पोटभर खाऊ दिले जातात ही अशी साधी भोळी, निस्वार्थी व परोपकारी वृत्तीची आदिवासी माणसे मूल्याधिष्ठित जीवन जगताना दिसतात. या आदिवासी भागात, गावात होणारी प्रत्येक लग्न आपली समजूनच लोक सहकार्य करतात. गावातील प्रत्येक माणूस या लग्नात उभा राहतो. त्या घरातील नवरी मुलगी म्हणजे आपली मुलगीच आहे असे समजतात. बाया माणसे घरातील कामे आवरतात तर पुरुष माणसे बाहेरील कामे सांभाळून घेतात. लग्न झाल्यावर नवरी मुलगी जेव्हा सासरी जाते, तिची बोळवण करण्यासाठी गावातील स्त्रिया वेशीपर्यंत येतात, तिला धीर देतात आणि जणू काही आपल्या पोटची मुलगी सासरी जात आहे अशी त्यांची अवस्था होते. अशी आदिवासी माणसांची साधी भोळी विचारसरणी साऱ्या जगासमोर आदर्श निर्माण करणारी अशीच आहे. एखादी गावातील गरोदर स्री बाळंतीण व्हायला आली असेल तर त्या गावातील सुयेरीन किंवा बाळंतपण करणारी बाई देखील तिला सोडून कोणत्याही गावी जात नाही ही माणुसकीने भरलेली माणसे आदिवासी समाजात आजही सापडतात. एखादा बाहेर गावावरून आला नसेल तर त्याला घ्यायला जाणारी माणसे, संकटकाळी मदत करणारी माणसे या लेखात पावलोपावली सापडतात. या कुडामातीच्या घरांमध्ये साधी भोळी माणसे राहत असली तरी माणुसकीने भरलेला गाव लेखिकेला हवाहवासा वाटतो. आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणी कोणाच्या घरी जात नाही, दळण कांडण होत नाही. सगळी कामे यंत्रांवर केली जातात. विहिरीवरचे बायांचे बोलणे बंद झाले आहे. कामाशिवाय कोणी कोणाला भेटत नाही. गप्पा टप्पा बंद झाल्या असून लोकांच्या राहणीमानात, वागण्यात बदल झाला आहे म्हणूनच हा झालेला बदल लेखिकेच्या मनात सलत राहतो. आज बऱ्याच गावांमध्ये बारीक सारीक गोष्टीवरून राजकारण होते, हेवेदावे होतात ही गोष्ट लेखिकेच्या मनाला बोचते. लहानपणापासून मोठे होईपर्यंत ज्या गावाच्या कुशीत खेळलो, ज्या गावाने आनंद दिला असे गाव एकमेकांच्या सुख दुःखामध्ये धावून जायचे असा लेखिकेचा गाव अजूनही लेखिकेला हवाहवासा वाटतो परंतु बदललेली गावची परिस्थिती पाहून लेखिका मनातून खंत व्यक्त करते आणि उदास होते.
एकंदरीतच या ‘धुनीवरल्या गोठी’ या ललित संग्रहात ०९ लेख लेखिकेने रेखाटले असून प्रत्येक लेखांमध्ये प्रतिमा, उपमा, प्रतीके, रूपके व अलंकारांची मुक्तपणे उधळण केली आहे. कुठेही ओढून ताणून आणलेले अनुभव दिसत नाही तर अनुभवातून व त्या भागात स्वतः जगण्यातून वेचलेल्या अनुभव विश्वाचे प्रामाणिकपणे केलेले प्रकटीकरण हे या सर्व ललित लेख संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ललित लेखातील सर्वच लेखांना अनुभवाचा साज लेखिकेने चढवला असून नैसर्गिक घटकांची प्रतिमा व प्रतीके म्हणून साऱ्या ललित लेख संग्रहात पखरण केली आहे. लेखिकेचे अनुभव विश्व व्यापक असून अनुभवांचा दृढपणा, सूक्ष्म निरीक्षण, प्रसंगांचा धावता पट सहजतेने उलगडतांना त्या दिसतात. लेखिकेचे आपल्या बोली भाषेवर अत्यंत प्रेम तर आहेच पण आपल्या गावातील आजूबाजूच्या माणसांबद्दल, निसर्गांबद्दल, पशु, पक्षी, प्राणी,नद्या, नाले, डोंगर तसेच माणसांचे जगणे यावर देखील जीवापाड प्रेम आहे. लेखिका सध्या नोकरी निमित्ताने शहरात राहत असली तरी तिची गावाच्या भाषेशी, तिथल्या माणसांशी, निसर्गाशी जोडलेली नाळ अधिकाधिक घट्ट झालेली जाणवते. या ललित लेख संग्रहाची निवेदन शैली प्रथम पुरुषी पद्धतीची असून ललित लेख संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक व बोलके असे आहेत. त्या मुखपृष्ठातून आतील लेखन शैलीचा आभास व्हावा इतके ठाशीव पद्धतीने चितारले आहे. प्रामुख्याने या ललित लेख संग्रहात आदिवासी माणसांचा, संस्कृतीचा, जगण्याचा वास्तव इतिहास लेखिकेने प्रतिबिंबित केला आहे. ‘धुनीवरल्या गोठी’ सर्व रसिक अंतर्मुख होऊन वाचतील व त्याचा आस्वाद घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ‘धुनीवरल्या गोठी’ या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका सौ. गंगा गवळी पवार यांच्या पुस्तकाचे हार्दिक स्वागत करतो व त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद….!
डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
आदिवासी साहित्यिक, कवी व संशोधक मोबा.९८३४४३३२७७२
पुस्तकाचे नाव: धुनी वरल्या गोठी
लेखिका: प्रा.सौ.गंगा गवळी-पवार
प्रकाशक: वैशाली प्रकाशन, पुणे
पृष्ठ संख्या: १६८
किंमत: २५०/-

