आदिवासी गझलकार-प्रा डॅा मधुचंद्र भुसारे
आदिवासी साहित्य विश्वात आज अनेक नामवंत कवी लेखक उदयास येत आहेत,समाजासाठी ही नक्कीच खूप अभिमानास्पद बाब आहे, पण तरीही.. काव्य प्रकाराचा विचार केला तर आजही मुक्तछंद हा काव्यप्रकार सोडला तर छंद आणि वृत्तछंदात काव्यलेखन करणाऱ्या आदिवासी कवींची संख्या अगदीच नगण्य अशीच आहे,आणि त्यातल्या त्यात गझल लेखन हे तर काव्यलेखनातीलअतिशय अवघड असे लेखन जे आता पर्यंत एकाही आदिवासी साहित्यिकाने आपल्या साहित्यकृतीतून समाजासमोर समोर मांडण्याच धाडस केले नाही,ते डॅा भुसारे सरांनी आपल्या “आदिवासी गझल” या त्यांच्या गझल संग्रहातून दाखवून दिले आहे.त्यांचा हा गझलसंग्रह मेधा पब्लिशिंग हाऊस अमरावती यांच्याकडून १६ मे २०१८ रोजी प्रकाशित झाला.
तसे पाहीले तर उर्दूत गझल फार्सीमुळे आली, आणि फार्सीत गझल अरबीमुळे आली, याचाच अर्थ असा की गझलेचे उगमस्थान हे अरब आहे,असे म्हणायला काही हरकत नाही,पण अलिकडे त्यावरही अनेक तर्कवितर्क लावले जातात असो..! माझ्या मते सुफी संप्रदयाचे संस्थापक मोईनुद्दिन चिश्ती यांनी बाराव्या शतकात प्रथम भारतीय भाषात गझलरचना सुरू केली.आणि हळूहळू तिचा मराठी भाषेतही प्रसार झाला,त्याचे श्रेय खरे तर माधव ज्युलियन आणि सुरेश भट यांनाच द्यायला हवे,आज मराठी भाषेत हजारो गझलकार निर्माण झालेत,पण आदिवासी साहित्यात मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आज गझलकार आहेत,त्यातील एक प्रा डॅा.मधुचंद्र भुसारे सर आहेत, कारण गझल लिहतांना गझलकाराला व्याकरणातील अक्षरगणवृत्त,मात्रावृत्त याचा ठोकताळा बघून लगावली अर्थातच (अक्षरातील लघू गुरु)तसेच मतला(पहील्या दोन ओळी)काफीया(उपांत्य यमक) रदीफ(अंत्य यमक)याचा मेळ घालून लिहावी लागते,ती खरी गझल असते,पण गझलेच हे शिवधनुष्य माझे मित्र डॅा.भुसारे सरांनी अगदी सहज पेललं.आणि हो एक गोष्ट मला आज प्राजंळपणे नमुद करावीशी वाटते,गझलेच्या बाबतीत खुप लोकांचा एक गैरसमजही आहे.. गझल ही फक्त प्रेम किंवा विरहावरती लिहली जाते, पण सरांनी आपल्या गझलसंग्रहातून दुःख आणि वेदनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
“आमच्याच वेदनांना हसतात लोक सारे !
आपापल्या बुध्दीने तोडतात तारे!
गझलकार डॅा भुसारे आपल्या “वाट” या गझलेमधूम प्रस्थापितांना एक जाब विचारतात.आजही आमच्या आदिवासी बांधवाकडे बाह्यसमाजाचा बघण्याचा दृष्टीकोण अजून बदलेला नाही,दरीखोरीत वास्तव्य करणाऱ्या आम्हा समाजबांधवाच्या जखमेवर फुंकर घालण्या ऐवजी सतत मीठच चोळले जाते,आम्ही डोंगर झाडीत रहातो म्हणून आमच्या बद्दल खोट्या अफवा पसरवून आम्हाला बदनाम केलं जातयं,
“आमची झोपडी,तुमचे बंगले अंतर यातील मिटेल का रे!
नको विषमतेची वादळे,कधी वाहतील समतेचे वारे!
आपल्या “अंतर”या गझलेमधून गझलकार म्हणतात,आज या देशाने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पार केली,तरीही इथल्या समाजात राव आणि रंक यात भेदाभेद केला जातोय,पूर्वापार पासून सर्वच स्तरावर गरीब आदिवासींची इथे हेळसांड होत आहे,ही हेळसांड आतातरी थांबवा तरच या देशात एकोपा आणि एकात्मता टिकेल.
“कशास बोलू मी आता इथे हे सोसलेले!
कुठे शोधू माझी आसवेही इथे पुसलेले!
“आसवे” या गझलेमधून गझलकार इथल्या समाजव्यवस्थेलाच जाब विचारतात..
जन्मा पासून मी इथल्या समाज व्यवस्थेचा बळी ठरलोय,अन्यायाच्या अनेक शृंखला आजही माझ्या ह्रुदयाच्या एका कप्यात साठवून ठेवल्या आहेत.फक्त समाजात दुही पसरू नये म्हणून मी हे सारे दुःख मनाच्या एका बंदीस्त खोलीत बंद करुन ठेवले आहे.
“आताच आमची मानसे,गाठोडी बांधूनी आले.
कित्येक आदिवासींचे लिलाव सापडून आले!
गझलकार डॅा.भुसारे आपल्या गझलेतून म्हणतात,आयुष्यभर सततच्या गरीबीत रेटलेल्या अनपढ लोकांचा फायदा घेऊन आजही काही उच्चवर्णीय समाजातील दलाल मळ्याथळ्यात कष्ट उपसणाऱ्या निरक्षर आदिवासी समाजाचा आपल्या स्वार्थासाठी अजून किती वर्षे लिलाव करणार..!आणि हे आजच्या लोकशाहीत कितपत योग्य आहे.यावर आजच्या घडीला आमचे राजकीय नेते भाष्य करतील का..?
कवी काळूदास कनोजे

