माती व पीक परिक्षणाचा उत्सव:आदिवासींचा (गौराई अर्थातच आखाजीचा सण)
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, हरसुल आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागामध्ये ‘गौराईचा म्हणजेच आखाजीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण यायच्या आधी ०८ ते ०९ दिवस अगोदर एका बांबूच्या छोट्या टोपलीत (दुरडीत) शेतातील किंवा गावाबाहेरील काळी, कसदार, मुरूम युक्त माती टाकून तिच्यात भात, नागली, ज्वारी, मका, वरई अशी पाच प्रकारची धान्य पेरली जातात व त्यावरून माती टाकून पाण्याने ती माती ओली केली जाते. घराच्या एका कोपऱ्यात मोठया टोपलीखाली ही धान्य पेरलेली छोटी टोपली झाकून ठेवली जाते. त्या धान्य पेरलेल्या टोपलीत दररोज सकाळी व संध्याकाळी नित्यनेमाने पाणी टाकले जाते परंतु त्याला सूर्यप्रकाश दाखविला जात नाही. ०८ ते ०९ दिवसांमध्ये या पेरलेल्या धान्याला मोठे कोंब फुटतात व जवळपास एक ते दीड फुटापर्यंत त्याची वाढ होते. परंतु सूर्यप्रकाश न मिळाल्याने हे धान्याचे कोंब व पाने पिवळसर रंगाचे दिसू लागतात, त्यालाच आदिवासी भागात ‘गौराई’ असे म्हटले जाते. या आठ ते नऊ दिवसाच्या काळात आदिवासी भागात रात्रीच्या वेळी लहान व तरुण मुली, स्त्रीया अंगणात बसून गौराईचे विविध गाणी गातात. ही सर्व गाणी गौराईचे गुणगान गाणारी, सौंदर्य वर्णन करणारी तसेच सांस्कृतिक व पारंपरिकदृष्ट्या अर्थपूर्ण अशा प्रकारची असतात. आदिवासी भागात टोपलीत पेरलेले धान्य अर्थात गौराई जेवढी जोमात व चांगल्या पद्धतीने उगवली असेल त्यावरून त्यावर्षी येणारे पीक कसे पिकेल याचा अंदाज बांधला जातो. टोपलीत धान्य पेरण्यासाठी ज्या मातीचा वापर केला जातो, ती माती खरे तर आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून आणून त्यात टाकायला हवी. जेणेकरून आपल्या शेतातील मातीचा कस, दर्जा व पोत कसा आहे? हे त्या ०८ ते ०९ दिवसाच्या कालावधीमध्ये उगवलेल्या धान्याच्या कोंबावरून समजायला मदत होईल. असे केल्यास आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा पोत व मातीचा दर्जा सेंद्रिय खताने सुधारायला वाव मिळेल. त्यातून उत्पन्न देखील वाढायला मदत होऊ शकते म्हणून या आखाजी उत्सवाकडे पारंपारिकता किंवा धार्मिकता या दृष्टीने न बघता माती व पीक परीक्षणाचा उत्सव म्हणून बघायला हवे तरच आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या पिकाची स्थिती सुधारायला मदत होईल हे आजच्या आदिवासी बांधवांनी समजून घ्यायला हवे. बांबूच्या टोपलीत (दुरडीमध्ये) फक्त भात, नागली, वरई, मक्का आणि ज्वारी इतकीच धान्य का पेरली जातात? इतर अनेक कडधान्य, पीके आदिवासी भागात शेतकरी पिकवतात.मग ते धान्य का पेरले जात नाही? हाही एक महत्त्वपूर्ण प्रश्न मला पडला आहे.तर नागली, भात, ज्वारी, मका, वरई ही पीके आदिवासी लोकांसाठी संजीवनी सारखीच कार्य करतात. ही सर्व धान्य आदिवासींची प्रमुख पीके असल्याने तसेच आरोग्याच्या दृष्टीने भरपूर पौष्टिकता व प्रथिने युक्त त्याचप्रमाणे शरीराची झीज भरून काढणारी आणि आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण अशी आहेत. प्रचंड दुष्काळातही आदिवासी माणसांना जगविण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. त्यांचे उत्पन्न व वाढ पावसाच्या पाण्यावर आणि मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते म्हणूनच गौराईच्या अर्थात आखाजीच्या सणाच्या वेळी आदिवासी भागात टोपलीमध्ये फक्त ही पाचच धान्य पेरली जातात. बाकी धान्य व कडधान्यांना पावसाची हवी तेवढी गरज नसते आणि बरीच धान्य हिवाळा सुरू व्हायच्या आधीपासून पिकायला सुरुवात होतात. त्यांना कमी पाऊस असला अथवा थंडीचे दिवस सुरू झाले तरी त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झालेले असते म्हणून कदाचित ही धान्य गौराईच्या टोपलीमध्ये पेरली जात नसावीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. दुरडी पेरलेल्या धान्याला ०८ ते ०९ दिवस सूर्यप्रकाश दाखविला जात नाही याचा अर्थ असा की, संपूर्ण पावसाळ्यात आकाशात ढग असतात. तीन-चार महिने पिकाला जेमतेम ऊन मिळते. बाकी संपूर्ण आभाळ ढगांनी झाकले जाते. अशावेळी पिकाला अजिबात ऊन मिळत नाही मग या परिस्थितीत पीक कसे उगवते? याचा अंदाज बांधण्यासाठी, त्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी गौराईला ०८ ते ०९ दिवस सूर्यप्रकाश दाखविला जात नाही. आदिवासी भागात कावळ्याने झाडावर खोपा कुठे बांधला आहे? त्यावरूनही पावसाचा अंदाज आदिवासी माणसे बांधतात. कावळ्याने झाडाच्या शेंड्यावर जर आपले घरटे बनवले असेल तर त्यावर्षी पाऊस कमी येतो. कावळ्याने झाडाच्या मध्यभागी घरटे बांधले असेल तर त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो.आज आदिवासी भागातही जंगल संपत्ती नष्ट झाल्याने कावळ्याची घरटी बघायला मिळत नाहीत त्यामुळे पावसाचा आदिवासी शेतकऱ्यांना अंदाज समजून घेणे अडचणीचे जाते आहे. त्याचबरोबर जंगले नष्ट झाल्याने हवामानात प्रचंड बदल घडून येत आहेत हेही दुर्लक्षून चालणार नाही. आदिवासी शेतकऱ्याकडे देखील पर्यावरणपूरक दृष्टी आणि हवामानाचा अंदाज घेण्यासारखा तर्कनिष्ठ दृष्टिकोन आहे. त्यांच्या प्रत्येक सण, उत्सवामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंश दडलेला असतो याचा शोध आणि बोध घेऊन संशोधन केल्यास जगातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नाच्या वाढीस हातभार लागण्यास मदत होईल यात शंका नाही. आखाजी सणानंतर आदिवासी भागात नागली, भात इत्यादी पिकांची लागवड करण्यासाठी दाढी भाजणे व राब भाजणे याची तयारी सुरू होते. ही तयारी आखाजी या सणाच्या आसपास सुरू होते. म्हणून आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी आपण राब किंवा दाढ भाजणार तेथील आणि भात, लागली लावणार त्या भागातील माती आणून तिचा वापर गौराईसाठी पेरलेल्या (टोपलीत) दुरडीमध्ये धान्य पेरण्यासाठी जर केला तर आपल्या शेतातील आपण नागली किंवा भातासाठी लागवड करीत असलेल्या भागातील माती व मातीचा दर्जा, पोत कसा आहे? त्या मातीमध्ये सुपीकता टिकून आहे किंवा मातीचा दर्जा घसरला आहे का? हे समजण्यास मदत होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या शेतातील शेताची सुपीकता कशी वाढवता येईल यासाठी आपल्याच घरातील गाई गुरांच्या शेणाचा कुजलेल्या झाडपाल्यांचा अर्थातच सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची सुपीकता व पोत सुधारण्यास मदत होईल. त्याद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पन्न वाढविण्यासाठी साहजिकच मदत होईल यात शंका नाही. म्हणून या आखाजीच्या अर्थात गौराईच्या सणाकडे आजच्या सुशिक्षित पिढीने पारंपारिक अथवा धार्मिक उत्सव म्हणून न बघता माती आणि पीक निरीक्षणाचा उत्सव म्हणून तर्कनिष्ठ बुद्धीने बघण्याची आणि ही गोष्ट आदिवासी भागातील शेतकऱ्यांना समजून देण्याची नितांत आवश्यकता आहे. आखाजीच्या दिवशी नदीवर जाऊन ही गौराईची टोपली बुडविली जाते, जेणेकरून त्यातील सुपीक माती नदीच्या प्रवाहाबरोबर, पुराबरोबर इतर शेतांमध्ये वाहून जाईल व त्या सुपीक मातीचा स्पर्श इतरही जमिनीला होऊन पीक वाढीस मदत होईल त्याचबरोबर नदीचा काठही त्या अनुषंगाने सुपीक व्हायला मदत होईल, म्हणून ही गौराई आखाजीच्या दिवशी नदी काठावरच बुडवली जाते हे त्यामागील शास्त्र आहे. त्यानंतर गौराईची पिवळी पाने मुली स्त्रिया फूल समजून आनंदाने केसांना माळतात आणि मुले आपल्या कानाला लावतात.या दिवशी संध्याकाळी घरोघरी मुली जाऊन गाणे म्हणतात, त्या बदल्यात त्यांना धान्य पैसे मिळते व काही घरी जिखना (गुप्त वस्तू) अर्थातच गूढ वस्तू ओळखण्यासाठी ठेवली जाते. हा जिखना (गुप्त वस्तू) ओळखली तर त्याबदल्यात त्यांना धान्य किंवा पैसे त्या घरातून मिळतात. म्हणून ती वस्तू ओळखण्यासाठी जिज्ञासू वृत्ती असलेल्या मुली बुद्धीचा कस लावून तर्कनिष्ठ पद्धतीने त्या टोपलीखाली झाकलेल्या वस्तूचा अंदाज बांधतात त्यामुळे आदिवासी मुलींचा या अनुषंगाने जिज्ञासूपणा व तर्कनिष्ठ दृष्टिकोन वाढीस लागायला देखील मदत होते. थोडक्यात गौराईच्या पानांना देखील फूल म्हणून केसातून, कानाद्वारे माळून संपूर्ण दिवसभर आनंदाने फिरतात. उत्तम पीक वाढीचं प्रतीक म्हणून शेतकरी त्या गौराईची पाने शेतात देखील ठेवतात. म्हणून अशा गौराईची पाने व गौराई मिरविण्याचा उत्सव साजरा केला जातो. आदिवासींच्या अनेक धार्मिक उत्सव व परंपरा यामध्येही वैज्ञानिकता प्रचंड प्रमाणात दडलेली आहे, त्यावर संशोधन करून आदिवासी समाजाचे जनजीवन सुखकर करण्यास मदत होईल यात शंका नाही.
*©डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे*
कवी, साहित्यिक व संशोधक
मोबा.९८३४३३२७७२

