पडद्या मागील कवी. गोवर्धन कोहंकीरे
नाशिक जिल्ह्यातील गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या निसर्गरम्य सह्याद्रीच्या गिरीशिखरात वसलेल्या पेठ तालुक्यातील मोहदांड गावात एका गरीब कुटुंबात कवी गोवर्धन कोहंकीरे यांचा जन्म झाला, कोहिंकीरेचे प्राथमिक शिक्षण गावातील जि प च्या शाळेत झाले,माध्यमिक शिक्षण आश्रमशाळा आंबे तर उच्च माध्यमिक व बी. ए पदवी शिक्षण दादासाहेब बिडकर कॅालेज पेठ इथे झाले एम. ए (पदव्युत्तर) शिक्षण एच. पी. टी. कॅालेज नाशिक इथे झाले, बी. एड नाशिक एम. एड रेणुका शिक्षणशास्त्र महाविद्यालय रेणापूर जि.लातूर येथे झाले 2022 मध्ये ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण झाले त्या आधी त्यांनी इशान्यनेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे शिक्षक म्हणून काम पाहिले सध्या ते जमनादास महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करंजाळी ता. पेठ येथे मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत,कवी गोवर्धन कोहंकीरे हे बालपणापासूनच निसर्गाच्या सान्निध्यात रानात भटकंती, शेतात दिवसभराचे काम करत असताना निसर्गाला जीवनात महत्व देत असल्याने त्यांच्या काव्यसुमनात पदोपदी निसर्गाचे दर्शन घडते,२०१२ मध्ये नाशिकच्या हं. प्रा. ठा महाविद्यालयात एम. ए. (पदव्युत्तर) शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या ‘श्राध्द’ या वार्षिक नियतकालीकात त्यांची “वसंत ऋतु” ही कविता पहिल्यांदा छापून आली होती.
ग्रामीण भागातील वाड्या पाड्यात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासी जीवनाचे वास्तव जगणंही त्यांच्या कविता वाचतांना जाणवते.
जेष्ठ कवी मित्र प्रा.अशोक बागवे नेहमी मला म्हणतात,प्रतिभा ही एक निसर्गाची देणगी आहे,ती एखाद्या खोपटातही जन्म घेते किंवा एखाद्या उत्तुंग इमल्यातही जन्म घेते, प्रतिभा ही एखाद्या खाजगी क्लासमधूनही विकत मिळत नसते ती जन्मजात निसर्गानेच त्या कवीला बहाल केलेला अनमोल असा दागीना आहे.अगदी कवी गोवर्धन यांच्या कविता वाचतांना त्यांच्या काव्यातील प्रगल्भ विचार कल्पना,मनाची ओढ,विचार मांडण्याची कल्पकता,थोडक्यात (उत्कट कलात्मक आविष्कार) याची कल्पना आपल्या मनाला जाणिव होते.
कवी आपल्या “उषःकाल” या काव्यातून म्हणतात.
क्षितिजावर सकाळी
आकाश टेकलेले
पांढरे शुभ्र धुके
चोहीकडे दाटलेले.
ग्रामीण वाड्या पाड्यातील सकाळच्या निसर्गाच मनोहरी वर्णन करतांना कवी आपल्या अलवार शब्द सुमनांची गुंफण करुन जणूकाही काव्यात शब्दांची पखरण करतो,कवीला निलअंबर हे दूर क्षितिजावरती टेकल्याचा भास होतो,कारण की त्याच्या अवतीभोवती दुधाळी धुक्याच्या चादरीने संपूर्ण हिरवाई व्यापून टाकलेली आहे,कदाचीत गडद दाट धुक्यामुळे कवीला निळे आभाळ क्षितिजावर टेकल्याचा भास झाला असावा,
“मायेची ऊब” या काव्यातून कवी आईच्या निरागस अन् वात्सल्य प्रेमाची साक्ष देतात.
ऊन दाटलं दाटलं
घाम कपाळी निरपे
कोरड घशाला आईचे
थेंब मातीमधी झिरपे.
कवी आपल्या काव्यातून बालपणात आपल्या लेकरांसाठी माय दरी, खोरी तील शेतात सांजसंध्या किती कष्ट उपसते,त्याचा दाखला देतात,काळी सावळी पण काटक माय भर उन्हातान्हात डोईवर आग ओकणाऱ्या सुर्याची तमा न बाळगता उपाशीपोटी शेतात राबते,भाळावर थबथबलेला घाम एका हाताने पुसून आणि घशाला कोरड पडूनही ती माऊली आपल्या लेकरांसाठी राबत असते.
तर आपल्या “ऋतुराज” या काव्यातून बदलत्या ऋतूंचे वर्णन करतांना म्हणतात,
पर्ण गळून फुटली
नव्या युगाची कोवळी पालवी.
मोहरली आमराई आणिक झाडे
दरवळला सुगंध चोहीकडे.
कवी चैत्र मासातील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करतांना आपल्या शब्द फुलांचा काव्यात अगदी अचूक वापर करतांना म्हणतात,हे ऋतूराजा..! चैत्राच्या पहिल्या प्रहरी जरी पानगळ झाली,तरी हरकत नाही,पण काही दिवसाने निष्पर्ण झाडांना कोवळी फुटली आहे,वनराईतील आम्रवृक्षांना मोहराचे नाजूक धूमारे फुटले आहेत,आणि त्याचा दरवळ अगदी माझ्या खेड्यातल्या पाड्याच्या वेशीपर्यंत आता दरवळतो आहे.
तर कवी गोवर्धन आपल्या “दुष्काळ” या कवितेतून व्यक्त होतांना जलसंपत्तीचे महत्व विषद करतांना त्यांच्या कवी तसेच पाण्याप्रती मनातील तळमळ व्यक्त करतांना म्हणतात.
एक हंडा पाण्यासाठी
रात्रभर जागता.
पेल्यानं पाणी मग
ईहरीतून भरता.
मानवी आयुष्यात पाण्याचे महत्व सांगतांना कवी आपल्या काव्यातून व्यक्त होतात,त्यांच्या मते पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी आपण “पाणी आडवा पाणी जिरवा” या उक्ती प्रमाणे त्या पाण्याचे संवर्धन केले तर आज टिपूसभर पाण्यासाठी वाड्या पाड्यातील माय बहीणींना विहीरीतील पाझरणाऱ्या पाण्यासाठी रात्रभर जागरण करण्याची वेळ आली नसती.कवी गोवर्धन कोहंकीरे यांच्या अनेक कवितेवर लिहावसं वाटतं पण अप्रकाशित कविता असल्यामुळे तूर्तास इतकेच..कवी कोहंकीरे यांच्या सजग लेखनकार्यास खूप खूप शुभेच्छा..!
निसर्ग कवी काळूदास कनोजे

