[masterslider id="2"]
लेख हितगुज

सुरगाणा तालुक्यातील आदिवासींचे श्रध्दास्थान बाफळ्या डोंगर

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

सुरगाणा तालुक्यातील आदिवासींचे श्रध्दास्थान बाफळ्या डोंगर

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेला पावसाचे माहेरघर म्हणून परिचित असलेला सुरगाणा तालुका हा ९८% आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात केम डोंगरासारख्खा अनेक लहान मोठ्या डोंगररांगा आहेत.
सुरगाणा तालुक्यापासून अगदी ३५ की. मी अंतरावर बाफळ्या डोंगर वसलेला आहे. डोंगराच्या पायथ्याशी एका बाजूला वांगण गाव व दुसऱ्या बाजूला गुजरात मधील बाफळ्याचा काफ ही गावं वसलेली आहेत. खाली एक बारमाही पाझर तलाव देखील आहे.
आदिवासी बांधव हे सुरवातीपासून निसर्गप्रेमी व निसर्ग पुजक असल्याने आदिवासींची गाव, झाप आजही डोंगर दऱ्याखोऱ्यात कडे कपारीत वसलेली आहेत बाफळ्या डोंगरात अनेक लहान मोठ्या टेकड्या आहेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धोधो पडणारा पाऊस, हिरवीगार वनराई, थंडगार हवा, त्यातच डोंगराच्या कुशीतून खडक पाझरून दुधाळ,फेसाळून वाहणारे रान झरे, वेगवेगळी रंगिबेरंगी बहरलेली रानफुलं हे निसर्गातील मनमोहक दृश्य आजही आदिवासी बांधवांना, गुराख्खांना, पर्यटकांना नेहमी हर्षित करणारे आहे. म्हणून कितीतरी वर्षांपासून बाफळ्या हे ठिकाण शासनाने ताब्यात घेऊन थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची आजही शासनाकडे मागणी आहे.
बाफळ्या डोंगराच्या उत्तर दिशेला बाफळी नावाचा दुसरा डोंगर आहे बाफळीच्या कुशीत आदिवासींच्या दगडी गुहेत घुंगेश्वर माऊलीचे श्रध्दास्थान स्थान आहे.
बाफळ्या डोंगराच्या कुशीत दगडी गुहेत आदिवासी ग्रामदेवता काजळा कोठारी माऊलीचे श्रध्दास्थान स्थान वसलेले आहे. हा डोंगर सुरवातीपासून नावाजलेला असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वेगवेगळ्या गावातून येऊन डोंगरमाथ्यावर पौष महिन्यात डोंगर माऊलीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याला आदिवासी भागात भाया म्हणतात व डोंगरावर कार्यक्रमासाठी जागरण करणाऱ्या गटाला पोहं म्हणतात.
भायाचे कार्यक्रम डोंगरावर वाजत गाजत चढून रात्रभर घांगळीच्या तालावर भगत मुखातून कथा गायली जाते अचकाय,मेचकाय, बाभळी भसा,रानवा,खैस ग्रामदेवतेच्या नावाने जागरण करतात त्याला सूढ म्हणतात रात्रभर चार सूढ पाडतात लोकांच्या अंगात अग्नी,आग्याळ, अगर खडी देवं येतात मग पीवळ्या बांबुची घोळकाठी हातात घेऊन नाचकाम करतात
सकाळी पुजेसाठी लागणारे साहित्य पाचखादा, दादशीरण, कापुर, दगडी दिवा, मेणबत्ती, अगरबत्ती,शेंदूर,खोबरा, नारळ, देवाला मोठ्या श्रद्धेने वाहतात व नैवेद्य दाखवतात त्या शीवाय कबुल केलेला बकरा, कोंबडा हे सोबत घेऊन नैवेद्य दाखवून साक्ष देतात गावातील ईडा पीडा दूर करून माणसाला,जनावराला,आणि शेतीमध्ये भरभराट होईल असे साकडे घालण्यात येते
बाफळ्या डोंगराच्या कुशीत वेगवेगळ्या औषधी वनस्पती आढळतात रोयच्या गवत हे सुगंध दरवळत असते खरशींग हा वृक्ष जंगलात दुर्मिळ आहे धामोड,साग,शीसव, शीवन,वरीस,मदळ,काकड, रान शेवगा हुंब,अळव,घळघुगर,तोरण, डोंगराची काळी मैना करवंद हा रानमेवा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव चाखायला जातात
सुभाष नारायण कामडी
( संशोधक)

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या