गिरणारेबारीच्या शिकारीनंतर आता दरेगाव शिवारात बिबट्याने बैलांची केली शिकार

चांदवड : – दरेगावजवळील गिरणारे शिवारात बिबट्याने घोडा व शिंगरु फस्त केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता दरेगाव शिवारातील दरेगाव-दुगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या आग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माळरानावर चरण्यासाठी बाधलेला संतोष दादाजी देवरे यांच्या मालकीचा बैल बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याचे आढळून आले आहे. या परिसरात लगोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील पशुपालक व शेतकरी वर्गात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. संतोष देवरे आपली गुरे त्यांच्या आग्या डोंगरालगतच्या माळरानावर
चरण्यासाठी कायमच बांधतात. यापूर्वी रात्री अपरात्री गुरे ढोरे बांधुनही कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र ते सकाळी आपल्या शेतावर गेले असता छिन्नविच्छिन्न अवस्थेतील आपल्या बैलाचे दर्शन झाल्यावर त्यांचे दु:ख अनावर झाले. नशीब ऐवढेच कि दिलासादायक बाब म्हणजे बैलाशेजारी असणाऱ्या गाय व वासरू सुरक्षित राहिले होते. बैल मोठा असल्याने बिबट्याचे बैलांच्या शिकारितच भागले असावे त्यामुळे सुदैवाने त्याने गाय व वासरू यांना ढक्का लावला नसावा असे जाणकारांचे म्हणणे आहे.मात्र बैलांच्या किमती प्रचंड वाढल्या असल्याने व बिबट्याने बैलाची शिकार केल्याने संतोष देवरे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर बिबट्याच्या दहशतीने परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले असून परिसरात पिंजरे लावण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 
तत्पूर्वी सदर प्रकार लक्षात येण्याअगोदर एक दिवस आधी या घटनेपासून एक-दोन कि.मी परिसरात देवळा तालुक्यातील गिरणारे शिवारात व चांदवड तालुक्यातील दरेगाव या गावाजववळील मनमाड-उमराणे या राज्य महामार्गावरिल गिरणारे घाटातुन जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच असलेले दरेगाव रहिवासी शेतकरी विनोद गांगुर्डे यांच्या गिरणारे शिवारातील शेतावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिथे चरत असलेल्या घोडा व एक शिंगरु यांना जीव गमवावा लागला होता . दरेगाव येथील घटनेबाबत चांदवडच्या वनविभागाच्या अधिकार्यांना कळविण्यात आले आहे.

