येवल्यात मराठी कथेचा जागर; ‘जयंत पवार कथालेखन पुरस्कारा’ने युवा प्रतिभांचा गौरव
येवला (नाशिक):
मराठी कथेला नवी परिमाणे प्राप्त करून देणारे दिवंगत ज्येष्ठ कथाकार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ, ‘नव-अनुष्टुभ’ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय जयंत पवार कथालेखन स्पर्धा २०२५’ चा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अत्यंत दिमाखदार आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल वर्मा पॅलेसच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याने मराठी कथासाहित्यातील नव्या प्रयोगांची आणि ऊर्जेची प्रचिती दिली.
मराठी कथासाहित्यात नव्या जाणिवा, आशयसंपन्नता आणि तांत्रिक नाविन्य आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आशिष वरघणे (वर्धा), पुनीत मातकर (यवतमाळ), प्रसेनजीत तेलंग (अमरावती), संतोष विठ्ठल घसिंग (बीड), ज्ञानेश्वर गाटकर (अमरावती) आणि जितेंद्र कुवर (निफाड) या सहा युवा लेखकांना त्यांच्या उत्कृष्ट कथालेखनाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या ओघवत्या भाषेत मार्गदर्शन करताना आसाराम लोमटे यांनी नव्या पिढीच्या लेखकांना आशयातील प्रामाणिकपणा आणि विषयातील नावीन्य जपण्याचा मोलाचा सल्ला दिला. “कथालेखनातील बदलत्या संदर्भांचे भान ठेवून सामाजिक जाणिवांचे प्रकटीकरण समर्थपणे करणे हीच जयंत पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
व्यासपीठावर ज्येष्ठ कथालेखिका नीरजा, जयंत पवार यांच्या पत्नी श्रीमती संध्या पवार, कविवर्य प्रकाश होळकर आणि प्रतिष्ठानचे कार्यवाह सारंग पाटील यांची गौरवपूर्ण उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मराठी कथेची समृद्ध परंपरा आणि वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकला.
केवळ पुरस्कार वितरणच नव्हे, तर विजेत्या लेखकांशी साधलेला संवाद आणि त्यांच्या मुलाखती यामुळे या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्व लेखकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, या सन्मानामुळे साहित्याप्रती असलेली जबाबदारी वाढल्याची जाणीव व्यक्त केली. साहित्यातील हा गौरव नव्या लेखकांच्या वाटचालीसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

