[masterslider id="2"]
क्रीडा जाहिरात मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

मातीच्या वेदना मांडणारा कवितासंग्रह “माती मागतेय पेनकिलर” (रसग्रहण: वृक्षमित्र विष्णू वाघ)

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कवी सागर जाधव ‘जोपुळकर’ यांचा “माती मागतेय पेनकिलर” हा कवितासंग्रह म्हणजे मातीचा जिवंत हुंकार आहे. सुरुवातीला शीर्षकातील आणि कवितांमधील इंग्रजी शब्दांचा भडिमार पाहून मन खटकते, परंतु पूर्ण वाचनानंतर कवीचा खरा उद्देश उमगतो. आजच्या इंग्रजाळलेल्या समाजाचे आणि मराठी भाषेवर होणाऱ्या भाषिक आक्रमणाचे हे एक वास्तववादी चित्रण आहे. ज्याने मातीत राबून कष्ट उपसले आहेत, असा मातीचा माणूसच या वेदना इतक्या प्रखरपणे मांडू शकतो.

या संग्रहात शेतकऱ्याच्या आयुष्यातील विसंगती कवीने समर्थपणे टिपल्या आहेत. ‘शेणाच्या वासाचा शहरी उमाळा’ यातून शहराकडे वळलेल्या शेतकऱ्याची मानसिक ओढ दिसते, तर ‘उणे सबसिडी’मधून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार आणि ‘चिरीमिरी’चे दाहक सत्य समोर येते. निसर्गाची अवकृपा आणि वांझ होत चाललेल्या जमिनीची व्यथा मांडताना कवीची लेखणी थेट काळजाला भिडते. बदललेल्या काळातील भयानक ‘बाराखडी’ समाजातील अराजकतेचे दर्शन घडवते. थोडक्यात, मातीची सहनशक्ती आता संपली असून ती वेदनेने विव्हळत ‘पेनकिलर’ मागत आहे, असा हा अस्वस्थ करणारा संग्रह आहे.

मातीच्या वेदना मांडणारा कवितासंग्रह “माती मागतेय पेनकिलर”
(रसग्रहण: वृक्षमित्र विष्णू वाघ)

चांदवड (नाशिक) येथील कवी सागर जाधव ‘जोपुळकर’ यांचा “माती मागतेय पेनकिलर” हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. या संग्रहाचे शीर्षक वाचले आणि प्रथम मनाला खटकले. ‘मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा इतका प्रचंड वापर कवीला का करावासा वाटला असावा?’ असा प्रश्न पडला. जसजसा पूर्ण कवितासंग्रह वाचला, तसे लक्षात आले की त्यात अनेक इंग्रजी शब्द पेरलेले आहेत. शीर्षकातील ‘पेनकिलर’पासून ते एनर्जी, चार्जिंग, ऑडिट, सबसिडी, ॲम्युनिटी, कलेक्शन, ऑप्शन, डिव्हायडर, फॉर्मुला, इलेक्शन, कस्टमर, सिक्युरिटी, थर्टी, सिक्सटी, नाईंटी, डीलर, चीफ, ‘शेक बिफोर युज’, ‘रेड सिग्नल’ असे असंख्य शब्द कवितांमध्ये येतात.

‘कवी इतके इंग्रजी शब्द मराठी कवितेमध्ये का टाकत आहेत? कवीला मराठी येत नाही की काय?’ असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालू लागले. परंतु, कविता हे समकालीन समाजाचे प्रतिबिंब असते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून एकीकडे साहित्यिक प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अशा शब्दांचा वापर पाहून अस्वस्थता आली. मात्र, पूर्ण कवितासंग्रह वाचून झाल्यावर कवीचा मूळ उद्देश उमगला. यात कवीची चूक नसून तो आजच्या काळाचा आरसा आहे. सध्या समाजात मराठीपेक्षा इंग्रजीचे खूळ अधिक शिरले आहे. प्रत्येक पालकाला आपले मूल इंग्रजी शाळेतच शिकले पाहिजे असे वाटते. आजची पिढी इंग्रजाळलेली आहे आणि त्याचे पडसाद भाषेत उमटत आहेत. मराठीत आज जवळपास २५ टक्के शब्द इंग्रजीचे वापरले जात आहेत. समाजात होत असलेला हा भाषिक बदल आणि मराठीवर होणारे इंग्रजीचे आक्रमण मांडण्यासाठीच कवीने हा अट्टहास केला असावा, असे नंतर जाणवले.

मातीच्या वेदना नेमके कोण मांडू शकतो? जो स्वतः मातीत राबला आहे, ज्याने मातीतील कष्ट भोगले आणि पाहिले आहेत, तोच हात या वेदना समर्थपणे लिहू शकतो. कवी सागर जाधव यांनी मातीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या वेदना अतिशय हृद्यस्पर्शी पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ थेट काळजाला भिडते, कारण मातीच्या वेदना समजून घेण्यासाठी वाचकाची नाळही मातीशी जोडलेली असायला हवी. शेतकऱ्याला मातीतून मोती (पीक) पिकवताना होणारा संघर्ष कवीने प्रभावीपणे टिपला आहे.

“माती मागतेय पेनकिलर” या नावामागचे रहस्य शोधताना ‘शेणाच्या वासाचा शहरी उमाळा’ ही कविता बरेच काही सांगून जाते. गांधीजींनी “खेड्याकडे चला” असा संदेश दिला होता, पण आजचा वास्तववादी शेतकरी शहरात राहून गावाला जाऊन शेती करतो, हे सत्य या ओळींतून दिसते:

दळण धान्य घरचय आमच्या
सेंद्रिय शेतीतून पिकवलेलं
बायकोचं. ऐकतात कॉलनीतल्या बायका
शेणाच्या वासाचा शहरी उमाळा
शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो, सरकार योजना आणते, पण त्यांचा लाभ मिळवण्यासाठी पंचायत समितीत ‘चहापाणी’ आणि ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय काम होत नाही. तिथे मिळालेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असते, हे दाहक सत्य ‘उणे सबसिडी’ या कवितेत येते.
लेखक भास्कर चंदनशिव यांचा ‘लाल चिखल’ हा धडा आजही मनातून जात नाही, कारण शेतकऱ्यांची अवस्था आजही तशीच आहे. तीच घालमेल कवी ‘वावराला पाळ्या देऊन बघितल्या’ या कवितेत व्यक्त करतात:
इतकं सगळं होऊन देखील
वावराला पाळ्या देऊन बघितल्या
पण बाईसारखी नियमित पाळी
या वांझ मातीला आली नाही
अन कांद्याची सुपीक इच्छा,
गाभण काही राहिली नाही !
कोरोनासारख्या महामारीत जग थांबले होते, पण शेती सुरू होती. जर या मातीनेच अन्न पिकवणे बंद केले, तर मानवाचे काय होईल? हा यक्षप्रश्न कवीला सतावतोय. गुरुजींनी शिकवलेली जुनी ‘बाराखडी’ आता बदलली आहे. ‘अ’ अजगराचा राहिला नसून तो ‘अराजकतेचा’ झाला आहे आणि ‘ब’ बदकाचा नसून ‘बंदुकीचा’ झाला आहे, असे भयानक वास्तव कवी मांडतात:
झ झबल्याचा राहिलाच नाही गुरुजी
तो केव्हाच गेलाय फाटून
पोरांच्या मनासारखा
अन केळाच्या सालीसारखा.
थोडक्यात सांगायचे तर, कवीने शेती-मातीच्या भावना मांडताना ‘मातीची सहनशक्ती आता संपली आहे’ याकडे लक्ष वेधले आहे. मातीला होणाऱ्या या प्रचंड वेदनांमुळेच ती आता ‘पेनकिलर’ची मागणी करत आहे. चित्रकार अरविंद शेलार यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि विष्णू थोरे यांची काळजाला भिडणारी चित्रे या संग्रहाची उंची वाढवतात. हा कवितासंग्रह म्हणजे खऱ्या अर्थाने मातीचा हुंकार आहे. कवी सागर जाधव जोपुळकर यांना या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!

✍ वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व वृक्षमित्र साहित्य परिषद, सिन्नर.
७०२०३०३७३८

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या