आ.कांदेनी रेल्वे आधिकार्यांना चांगलेच झापले
राजेंद्र तळेकर / नांदगाव
नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत चांगलेच झोडपून काढल्याने नांदगाव मध्ये तो एक चर्चेचा विषय झाला आहे
नांदगाव रेल्वे सबवे प्रश्नावर मंगळवारी झालेल्या बैठकीत ठोस मार्ग न निघाल्याने आज आमदार सुहास कांदे यांच्या सुचने नुसार उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. ऑनलाईन झालेल्या या बैठकीमध्ये आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. अनेक दिवसांपासून सबवे मध्ये पाणी साचले असल्यामुळे शहराचे दोन भाग झाले आहे. पादचारी, विद्यार्थी, आजारी पेशंट आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होत आहे. तरी देखिल रेल्वेचे प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नाही. याकडे लक्ष देत नाही आणि काहीतरी कारणे सांगून जनतेला फसवण्याचे काम करीत असल्याचे आ.सुहास कांदे म्हणाले. जीएम आणि डीआरएम यांच्याकडे अडचणी मांडतांना निरुपयोगी कमी क्षमतेच्या मोटारी बसवणे, तांत्रिक दृष्ट्या भविष्यातील धोके लक्षात न घेता सबवे बांधण्याची घाई करणे, घाई घाईत रेल्वे गेट बंद करणे, सब वे मध्ये अनेक ठिकाणी लिकेज असणे असे अनेक मुद्दे मांडले. तसेच सबवेतील लीकेज त्वरित दुरुस्त करण्यासाठी सांगितले. आपले अधिकारी खोटे बोलतात, जनतेला आम्हाला उत्तर द्यावे लागते असा आरोप आ.सुहास कांदे यांनी केला.
चांडक प्लॉट परिसराकडील मोठ्या संख्येने असलेली रहिवाशी वसाहत पाहता त्यांना योग्य तो रस्ता तयार करून देणे गरजेचे असल्याने त्यांचा ही विचार करावा लागणार आहे असे आ.सुहास कांदे म्हणाले.
नांदगाव शहरात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला हे मान्य असले तरी इगतपुरी ते भुसावळ दरम्यान कोणता रेल्वे बोगदा यशस्वी झाला ते सांगा असा खडा सवाल आमदारांना डीआरएम यांना विचारला. सब वे चे काम सुरू करतांनाच जर या सर्व बाबींचा विचार केला असता तर ही वेळ आली नसती आता तरी दिरंगाई न करता त्वरित कामास सुरुवात करावी ही विनंती देखील केली.
खासदार भारती पवार यांनी आमदारांनी मांडलेल्या सर्व समस्या लक्षात घेऊन तातडीने सोडविण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर स्थानिक पातळीवर त्वरित बैठक बोलावण्याची ठरले या मध्ये लोक प्रतिनिधी,शासकीय प्रशासन, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन यांनी त्वरित स्थानिक पातळीवर मीटिंग आयोजित करून पुढील योजना ठरवून काम सुरू करावे असे ठरले.
आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे लवकरच शहराच्या भविष्याचा विचार करून ठोस पाऊले उचलली जातील असे चित्र दिसत आहे.
या बैठकीत रेल्वे अधिकारी जीएम सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग चे डीआरएम, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, आमदार सुहास कांदे, डीव्हिजनल इंजिनियर आर.सी वाडेकर, सिनियर इंजिनियर रमेश कुमार मिणा, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, मुख्याधिकारी विवेक धांडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, नांदगाव चे पोलीस निरीक्षक कातकडे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, युवासेना प्रमुख सागर हिरे यांनी सहभाग घेतला

