चांदवड- सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या वडाळीभोई विविध कार्यकारी सोसायटीच्या सन २०२२ ते २७ या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुखदेव जाधव, माजी सरपंच निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री गुरुदत्त पॅनल’ने १२ पैकी १२ जागांवर विजयश्री मिळवीत शिवसेनेचे जिल्हानेते नितीन आहेर, कारभारी आहेर, काँग्रेसचे अशोक जाधव यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’ला पराभवाची धूळ चारली.

वडाळीभोई सोसायटीवर श्री गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता मिळवल्यावर आनंदोत्सव साजरा करताना सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव, दत्तू आहेर, दिलीप आहेर, शिवराम आहेर, अर्जुन जाधव, वसंत जाधव, शिवाजी जाधव, सचिन जाधव, कुसुम आहेर, सुमनबाई जाधव, राजाराम गांगुर्डे, विश्वनाथ झाडे आदी.
वडाळीभोई विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या एकूण तेरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात भटक्या विमुक्त जाती – जमाती या गटातून विश्वनाथ ठकाजी झाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पोपट पाटोळे यांच्याकडे प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तर उर्वरित एकूण बारा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या बारा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कादवाचे संचालक सुखदेव जाधव, वडाळीभोईचे माजी सरपंच निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरु दत्त पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. तर याउलट सोसायटीवर कब्जा मिळविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर, कारभारी आहेर याच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. यामुळे वडाळीभोई सोसायटीची निवडणूक अतिशय चुरशीची व रंगतदार होणार असल्याचे या निवडणुकीत कोण बाजी मारत याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
वडाळीभोई सोसायटीच्या एकूण बारा जागेसाठी बुधवार (दि.२७) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सोसायटीच्या एकूण ९०२ मतदारापैकी ८८३ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. चार वाजता मतदान प्रक्रिया संपल्यावर पाच वाजता मतमोजणी सुरू करण्यात आली. मतमोजणी सुरु असताना कोणत्या उमेदवाराला किती मते पडले हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पोपट पाटोळे यांनी वडाळीभोई सोसायटीच्या बारापैकी बारा जागांवर श्री गुरुदत्त पॅनलचे उमेदवार निवडून आल्याचे घोषित करताच राष्ट्रवादीचे नेते सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे, नवनाथ जाघव यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

वडाळीभोई सोसायटीवर श्री गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता मिळवल्यावर आनंदोत्सव साजरा करताना सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव, दत्तू आहेर, दिलीप आहेर, शिवराम आहेर, अर्जुन जाधव, वसंत जाधव, शिवाजी जाधव, सचिन जाधव, कुसुम आहेर, सुमनबाई जाधव, राजाराम गांगुर्डे, विश्वनाथ झाडे आदी.
श्री गुरुदत्त पॅनलच्या विजयी उमेदवारांचे मते – सर्वसाधारण गटातून – दत्तू आहेर (४२१), दिलीप आहेर (४३५), शिवराम आहेर (४४७), अर्जुन जाधव (४४५), निवृत्ती जाधव (४६०), वसंत जाधव (४६२), शिवाजी जाधव (४७३), सचिन जाधव (४४३); तर महिला राखीव गटातून – कुसुम आहेर (४६६), सुमनबाई जाधव (४६४); तर इतर मागास प्रवर्गातून – सुखदेव जाधव (५०८) तर अनुसुचित जाती जमाती गटातून राजाराम गांगुर्डे (४६६) आदींनी विजयश्री पटकावली.
वीस वर्षापासून गुरुदत्त पॅनलची सत्ता – वडाळीभोई सोसायटीच्या सन २००६ च्या पंचवार्षिक निवडणुकीपासून श्री गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता आहे. दर पंचवार्षिक निवडणुकीत विरोधक सत्ता काबीज करण्यासाठी दंड धोपटून रंणागनाथ उतरतात. मात्र सत्ताधारी गटाने केलेल्या विकास कामांची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा एकदा श्री गुरुदत्त पॅनलच्या पारड्यात मते टाकीत कर्तव्य बजावण्याची संधी दिली आहे.

