चांदवड तालुक्यातील पाच पैकी चार गट राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड पाचही गटांमध्ये महिला आरक्षण निघाल्याने येणार महिलाराज
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत चांदवड तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांचे आरक्षण स्री राखीव करता झाल्याने आता तालुक्यात महिला राज येणार आहे .तसेच वडनेर भैरव वगळता चारही गट राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे उसळले गेले आहे.त्यामुळे अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेची तयारी सुरू केलेल्या तालुक्यातील नेत्यांना आता जिल्हा परिषदेपासून अलिप्त राहावे लागणार आहे .तर काही नेते मात्र आपले नशीब पंचायत समितीत आजमावून पाहू शकतात. जिल्हा परिषद तळेगाव रोही गट व त्या गटातील दोन्हीही गण आरक्षित झाल्याने खुल्या प्रवर्गातील नेत्यांची मात्र मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे.धोडंबे अनुसूचित जमाती स्त्री ,दुगाव अनुसूचित जमाती स्त्री वडनेर भैरव सर्वसाधारण स्त्री ,वडाळीभोई अनुसूचित जमाती स्त्री तळेगावरोही अनुसुचित जाती ( स्त्री ) याप्रमाणे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आरक्षण आहे.
चांदवड तालुक्यातील पाच गटापैकी फक्त वडनेरभैरव गट जनरल झाला आहे. तर ईतर
तळेगांवरोही अनु.जाती,तर दुगाव,वडाळीभोई,धोडंबे अनु.जमातीसाठी राखीव झाला आहे.चांदवड तालुक्यातील पाच पैकी तब्बल चार जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक नेत्यांना निराश व्हावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांचा गट राखीव झाल्याने त्यांनाही जिल्हा परिषदेत जाण्यापासून वंचित राहावे लागेल. तर तळेगाव रोही गटात अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री आरक्षण असल्याने तेथील एससी प्रवर्गातील इच्छुकांचे नशीब मात्र फळफळणार आहे. वडनेर भैरव जिल्हा परिषद गट खुला झाल्याने माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांचा कुटुंबातील महिला रिंगणात उतरू शकते. तर भाजपातर्फे त्यांना शह देण्यासाठी कोणाला रिगणात उतरविले जाते हे हे आगामी काळात स्पष्ट होईल. वडाळी भोई जिल्हा परिषद गटात इच्छुक असणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन दादा आहेर तसेच वडाळीभोई येथील कादवा कारखान्याचे संचालक सुखदेव जाधव यांनाही आता निवडणूक रिंगणात उतरता येणार नाही. धोडांबे गटातून इच्छुक असणारे भाजपाचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे तसेच राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे डॉक्टर श्याम जाधव यांनाही आता जिल्हा परिषदेमध्ये या गटातून उमेदवारी करता येणार नाही .मात्र मंगरूळ गण सर्वसाधारण स्त्री झाल्याने तिथे काही नेते आपले नशीब आजमावू शकतात. तशीच परिस्थिती दुगाव जिल्हा परिषद गटात आहे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आता आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळवू शकतात . मेसनखेडे गण सर्वसाधारण तर दुगाव गण सर्वसाधारण स्त्री झाल्याने तेथे काही मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. धोडंबे व राहुड गणातही नागरिकांचा मागासवर्ग हे आरक्षण असल्याने तेथे अनेक आता मातब्बर निवडणुकीत उतरतील. बहादुरी, वडनेर भैरव हे गण सर्वसाधारण करिता असल्याने तेथेही इच्छुक आपला मोर्चा वळवतील . व निवडणूक रिंगणात उतरतील.वडनेर भैरव गट व गण मध्ये अनेकांना निवडणूक लढवता येणार असल्याने तालुक्याचे लक्ष वडनेर भैरवगट वडनेर भैरव गण बहादुरी गण याकडे लागणार आहे. वाहेगाव , तळेगाव रोही हे दोन्हीही गण अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने तेथेही इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील सर्वात जास्त इच्छुक या गणांमध्ये होते त्यामुळे त्यांना आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट राखीव झाल्याने फक्त एक गट खुला असल्याने इच्छुकांचे मनसुबे मात्र उसळले आहेत हे मात्र निश्चित. चांदवड तालुक्यातील पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण असे . धोडांबे नागरिकांचा मागासवर्ग, राहुड नागरिकांचा मागासवर्ग स्री, दुगाव सर्वसाधारण स्री, मेसनखेडे खुर्द सर्वसाधारण , बहादुरी सर्वसाधारण ,वडनेर भैरव सर्वसाधारण स्री, वडाळीभोई अनुसूचित जाती ,मंगरूळ सर्वसाधारण स्री वाहेगाव साळ अनुसूचित जमाती ,तळेगाव रोही अनुसूचित जमाती स्री याप्रमाणे चांदवड तालुक्यातील पंचायत समितीचे गण आरक्षित झाले आहेत.

