आधार क्रमांकाची माहिती ऐच्छिकपणे होणार संकलित
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार , लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १ ९ ५० मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत . या सुधारणांची अंमलबजावणी दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ०१ एप्रिल २०२३ पावेतो करण्यात येणार आहे . त्यानुसार मतदार यादीतील तपशिल प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलित करण्याकरीता दि . ०४ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे . त्याकरिता आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वा . मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय चांदवड येथे तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष , शहराध्यक्ष , सामाजिक संस्था त्यांचे प्रतिनिधी , व सर्व पत्रकार यांची बैठक पार पाडण्यात आली . या संदर्भात मा . मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य , यांचे पत्रानुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी अर्ज क्रमांक ६ ब तयार करण्यात आला आहे . सदर अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मा . भारत निवडणूक आयोग व मा . मुख्य निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in व www.cco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तसेच दि ०४ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या विशेष मोहिमेचे अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांचेमार्फत घरोघरी भेट देवून आधार क्रमांक संकलित करण्यात येणार आहे . आधार क्रमांक ऑनलाईन जोडणीसाठी BLO यांना Garuda Training App यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे . मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांनी BLO यांना सहकार्य करावे .
मतदारांसाठी आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक असणार आहे . मतदार यादीतील तपशिलाचे प्रमाणीकरण करणे , तसेच एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त मतदार संघात नाव समाविष्ट असणे , त्याच मतदार संघात एकापेक्षा जास्त वेळा नावाची नोंदणी तपासणीकरीता व मतदाराची ओळख प्रस्थापित करणे या उद्देशाने मतदारांकडून आधार क्रमांक संकलित करण्यात येणार आहे . मतदार त्याचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थ असेल तरीही त्याचे मतदार यादीतील नाव वगळण्यात येणार नाही . असे आवाहन मा . श्री . चंद्रशेखर देशमुख , मतदार नोंदणी अधिकारी , १ ९ ८ – चांदवड विधानसभा मतदार संघ व मा . श्री . प्रदीप पाटील तहसिलदार तथा सहा . मतदार नोंदणी अधिकारी , १ ९८ चांदवड विधान मतदार संघ यांनी चांदवड तालुक्यातील मतदारांना केले आहे .

