[masterslider id="2"]
लेख विशेष लेख हितगुज

कोरोना- वेगवान बदलांची बदलती मानसिकता… भाग ३

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

लेखक: रावसाहेब खं. जाधव
(चांदवड)
भाग ३. मो. क्र. ९४२२३२१५९६

भाग ३

कोविड १९ने भाषेलाही सोडले नाही. ज्याचा संबंध नव्हता असे शब्द कोविडसोबत मराठी भाषाही आपल्या अंगाखांद्यावर लीलया खेळवू लागली. जसे- सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन लेव्हल, सोडियम हायपोक्लोराईड, डिजिटल लेझर थर्मामीटर, ऑनलाईन, ऑफलाईन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इत्यादी. त्यातही ‘पॉझिटिव्ह’ शब्दाने आपली सकारात्मकता सोडून दिली आणि त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘निगेटिव्ह’ करून टाकला.  

   कोविडने काही धार्मिक व वैचारिक धारणाही बदलवल्या. देवालये बंद झाले. वारी थांबली. ‘तुझे आहे तुजपाशी’ची जाणीव विस्तारित मूर्तरूप घेऊ लागली. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, पोलिस, समाजसेवक यांच्यातच देव पाहण्याची व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ लागली. येथेही स्वार्थ-परार्थ, विश्वास-अविश्वास, समज-गैरसमज अशा दोन-दोन गटांत विभागलेल्या समजप्रवृत्ती दिसून आल्या. कदाचित याही सहजप्रवृत्ती असाव्यात.   

   मानसिक बदल घडत असताना महामारीच्या सुरुवातीच्या काळात वाटणारे गांभीर्य कमी होत गेले आणि समाजात दोन गट निर्माण झाले. हे गट अनेक क्षेत्रांत तयार झाल्याचे दिसून आले. जसे ऑनलाईनवाले- ऑफलाईनवाले, बदल स्वीकारण्याची इच्छा असणारे- नसणारे, मास्क वापरण्याची इच्छा असणारे- नसणारे, कोविडला भयंकर मानणारे- न मानणारे, कोविडबाबत गंभीरपणे विचार करणारे- न करणारे, इत्यादी.

    समारोप करताना एक प्रसंग कथन करावासा वाटतो. दोन मित्रांचा संवाद चाललेला होता. त्या संवादातील एक वाक्य सहज कानावर पडले, 

“साधी सर्दी होऊ दे रे, तू टेस्ट करायला गेला की, पॉझिटिव्हच येशील…” 

साहजिकच लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ असल्याचे जाणवले. अफवा, अनुभव की गैरसमज? नक्की काय असावं? काहीही असेल, पण वास्तव काय आहे  याबाबत लोकांना आश्वस्त करण्याची गरज मात्र प्रकर्षाने जाणवली.

    कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या एका मित्राने योग्य उपचारानंतर कोरोनावर मात केली. रुग्णालयातून मुक्त होऊन घरी पोहचला. बरेच दिवस संपर्क झाला नव्हता. त्याच्या आशावादीपणाचे कौतुक करावे आणि धीर द्यावा या उद्देशाने त्याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. “स्वत:ची इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी… जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा….” असे बरेच बोलणे झाल्यानंतर जरासा विनोद करण्याच्या उसळून आलेल्या उर्मीमुळे मी त्याला सहज म्हणालो, “मला वाटतं, तू फारच धास्ती घेतली होती. कोरोनाला एवढं घाबरायचं असतं काय…! कोरोना-बिरोना काही नसतं रे…” आणि हसलो.

    तेव्हा तो चताळून बोलला, “तुला होऊ दे, मंग कळंल….” त्यावेळी माझ्या कानाशी असलेला माझा मोबाईल माझ्याच कानाला चावल्यासारखे वाटले.  

                         ………………………………………

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या