[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद विशेष लेख

एखाद्या शब्दासाठी : जीवनाचं शाश्वात सत्य उलगडणार्‍या कविता

यांनी लिहिलेले संजय गोराडे

छंद, वृत्त, अष्टाक्षरी, अभंग इतके सारे विविध साज परिधान करून कवीच्या लेखणीतून बहुरंगी व बहुढंगी कविता कागदावर साकारल्या आहे ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितासंग्रहात एकूण एकोनव्वद कविता आहेत. त्या प्रेमरसासोबत समाजाला संदेश देणार्‍या तर आहेच ; पण जीवनाचं शाश्वात सत्यही उलगडणार्‍या आहे. प्रत्येक कवितेवर विस्ताराने लिहायचे ठरवले तरी दहा-दहा प्रबंध तयार होईल असे वाटते.
– संजय गोराडे
साहित्यकणा फौंडेशन, नाशिक

एखाद्या शब्दासाठी (कवितासंग्रह)
कवी - संतोष वाटपाडे

‘ एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते

एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते….’

                   नुकताच प्रकाशित झालेला संतोष वाटपाडे लिखित ‘एखाद्या शब्दासाठी’ कवितासंग्रहातील वरील काव्यपंक्ती आहे. एखाद्या हिर्‍यातून चकचकत्या तेजाची असंख्य किरणं बाहेर पडावी  तशा संतोष वाटपाडे यांच्या काव्यसंग्रहातील कविता आहेत. वाचक ज्या दृष्टीने त्यांच्या कवितेकडे पाहिल ; तसा त्याला त्या दृष्टीने अर्थबोध होईल, काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितेत कवी म्हणतो, ‘एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते’ एखाद्या हिरव्यागार वटवृक्षाचे एखादे पिवळे निखळून पडावे तसे या माणसांनी भरलेल्या जगात एखादा श्वास म्हणजे एखादा माणूस जग सोडून जातो तरी कुणाच्या खिजगणतीत नसते. क्षणभर दुःख करतात आणि विसरून जातात. ‘एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते….’ एखादा शब्द असा असतो ; ज्याने माणसांच्या स्वप्नांची पुर्तता होते, एखादा शब्द असा असतो ; ज्याने स्वप्नाची राखरांगोळी पण होऊ शकते. एखादा शब्द असा असतो ; ज्याने कवीला सहज कविता सुचते, आणि एखादा शब्द असा असतो ; कवीच्या कवी-मनात कवितेचे बीज रुजते मात्र स्फुरत काहीच नाही. शब्दांची ताकद माहीत असलेला असा हा कवी आपल्या कवितांमधून अफाट काहीतरी सांगू पाहतो आहे असे वाटते.

आयुष्य लाकडी मेणा

मी जन्मोजन्मी भोई

बदलावा खांदा केव्हा

मज अजून कळले नाही

संसाराच्या मोहमायेत अडकलेला माणसाला जीवनाविषयी एवढी आसक्ती निर्माण होते, तो इतका भौतिक सुखात जंजाळात गुरटफत जातो की, कुठं थांबलं पाहिजे हेच त्याला कळत नाही. आपण अडचण आहोत ; कपाळमोक्ष होतो तरी त्याला समजत नाही. तो फक्त धावत असतो. सुरुवातीला मौजेची वाटणारी वाट नंतर जीवघेणी ठरते तरी तो धावत असतो. कवीने आयुष्याला लाकडी मेणा म्हटलेलं आहे. हा लाकडी मेणा खांद्याचं कातडं सोलून काढतो तरी तो खाली ठेवायला तयार होत नाही, फक्त तो धावत असतो. माणसाच्या या आसक्तीवर कवीने ‘मेणा’ कवितेत छान भाष्य केले आहे. अशीच जीवन-मरणाचं गमक सांगणारी ‘जन्म एक ॠचा’ ही अभंग काव्य प्रकारातील रचना आहे, ‘सरणाच्या आत l जळते सरण l तसे रितेपण l लाभो आता ll’ माणसाच्या शरीरात जोवर आत्मा आहे, तोवर त्याला एक नाव आहे, पण आत्मा निघून गेला की लगेच लोकं त्याला बॉडी म्हणतात. ती बॉडी सरणावर ठेवतात, सरण पेटवले जाते, त्या सरणासोबत बॉडी पण जळत असते. आत्मा विरहीत त्या बॉडीला आता कुणाविषयीच लोभ, मोह, माया, मत्सर वाटत नाही. जिवंतपणी अहंमपणाने मिरवणारी ती बॉडी मरणानंतर अगदी रीती होऊन जळते आहे ; तसं रितेपण कवीला जिवंतपणी अपेक्षित आहे.

फाटलेल्या वाकळात म्हातारीची तगमग

थकलेल्या काळजाने किती धरायचा तग

वाकळाच्या गाठोड्यात एक मणाचा पाचोळा

हात चाचपतो काठी पाणी झिरपते डोळा

‘वाकळ’ ही कविता वाचल्यावर आपलाही शेवट उद्या असाच असणार आहे याची अनुभूती वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. वार्धक्याचं जीणं किती भयंकर असतं याचं हुबेहूब चित्रण कवीने या कवितेत केले आहे. कविता वाचताना वार्धक्याचा पट जसाचा तसा डोळ्यासमोर साकारतो. कधीकाळी जिचं वजन पन्नास-साठ किलो असेल ती म्हातारी आता जेमतेम एक मणाच्या पाचोळ्यागत उरली आहे. किती अफाट शब्दसंपदा कवीजवळ आहे. घागर मे सागर दाखवण्याची ताकद कवीच्या ठायी आहे. प्रतिकं आणि प्रतिमाचा वापर कवितासंग्रहातील कवितेत अगदी लीलया केल्याचे आढळते. त्यामुळेच भोवतालचा प्रत्येक घटक किंवा घटना या कवीसाठी कविता बनली आहे. विविध विषय या काव्यसंग्रहात कवीने खूप छान हाताळले आहे.

रघुवंशी राउळे जुनी गोदेच्या काठावरची

रामकुंड स्पर्शण्यास जमते गर्दी घाटावरती

जर्जर अस्थीपंजर काही वाटेवर बसलेले

आयुष्याचे ओझे दिसते त्यांच्या डोक्यावरती

 

मग नाशिक कर्मभूमी असलेल्या कवीच्या नजरेतून ‘नाशिक’ हा विषय कसा सुटेल, नाशिकच्या नुसत्या गोदाकाठाचे वर्णन करायचे म्हटले तरी कमीतकमी एकशे सहा पान लागतील, पण या कवीने एकशे सहा शब्दात वाचकाला आपल्या काव्याद्वारे गोदावारीचे दर्शन घडवले आहे. गोदाकाठची राम मंदिरे, रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर यांचा वेद घेत आजचे वास्तव ‘नाशिक’ या कवितेतून अचूक टिपले आहे. असा प्रतिभासंपन्न कवी एकाच विषयाला चिकटून न राहता अनेक विषयांना अगदी सहज  हाताळताना दिसतो आहे, तरीही कवी स्वतःविषयी लिहितो,

लेखणी कुणाची असते हे मला माहिती नाही

येतात कल्पना कोठुन हेसुद्धा ठाउक नाही

ती जेव्हा हात पकडते कानात बोलते माझ्या

येतात कागदावरती शब्दांच्या रांगा काही

छंद, वृत्त, अष्टाक्षरी, अभंग इतके सारे विविध साज परिधान करून कवीच्या लेखणीतून बहुरंगी व बहुढंगी कविता कागदावर साकारल्या आहे तरी कवी स्वतःला आश्वासकपणे कवी म्हणत नाही. यातूनच कवीची शोधक व अभ्यासक वृत्ती दिसून येते. ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितासंग्रहात एकूण एकोनव्वद कविता आहेत. त्या प्रेमरसासोबत समाजाला संदेश देणार्‍या तर आहेच ; पण जीवनाचं शाश्वात सत्यही उलगडणार्‍या आहे. प्रत्येक कवितेवर विस्ताराने लिहायचे ठरवले तरी दहा-दहा प्रबंध तयार होईल असे वाटते. अशा या कवितासंग्रहाचे प्रकाशक स्वयं प्रकाशन असून त्याचे अंतरंग व बाह्यरंग निलेश गायधनी सजवलेले आहे. ‘ही बाग कुणाची’ संतोष वाटपाडे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहापाठोपाठ आलेला हा दुसरा काव्यसंग्रह ‘एखाद्या शब्दासाठी’ नक्कीच लिहिणार्‍या हातांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकाने त्यांचे कवितासंग्रह अभ्यास म्हणून वाचावेत व संग्रही ठेवावे असं मी आग्रहपूर्वक म्हणेन. अशा या हरहुन्नरी कवीला त्याच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

संजय द. गोराडे (लेखक)

पाथर्डीफाटा नाशिक.

मो. नं – ९८५०६९१२१६

लेखकाबद्दल

संजय गोराडे

एक टिप्पणी द्या