सफर-अंदमानची
सौ. शैलजा जाधव
चांदवड (नाशिक)
फार दिवसापासून मनात असलेल्या अंदमानच्या सहलीचा योग एकदाचा जुळून आला. आणि पहाटे 4 वा. मुंबईहून पोर्टब्लेअरसाठी असलेल्या विमानात बसलो. अंदमानला जाण्याची उत्सुकता खूप असली तरी मनात एक भीती सतत असायची. सावरकरांच्या “माझी जन्मठेप’ मधील वातावरणाचा मनावर इतका परिणाम होता की आजही तिथे तसेच भयावह, रोगट, आजारी पाडणारे वातावरण असेल असे सारखे वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही.
भारताच्या आग्नेयेस असलेला अंदमान-निकोबार हा द्विपसमुह बंगालच्या उपसागरात आहे. एकूण 572 बेटांचा हा समुह आहे. पण फक्त 36 बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात. हा भारताचा केंद्रशासीत प्रदेश असला तरी तो इंडोनेशीयाला अधिक जवळचा म्हणजे फक्त 150 कि.मी. अंतरावर आहे.

सकाळी साडेसात वाजता पोर्टब्लेअर येथे पोहोचलो. पोर्टब्लेअर मधीलच “पाम ग्रोव्ह’ रिसॉर्टवर आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारनंतर पोर्टब्लेअरमध्येच असलेला सेल्यूलर जेल पाहण्यास आम्ही निघणार होतो.
ब्रिटीश काळात अंदमानची ओळख काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी का झाली होती; हे तिथे पोहचताच कळते. समुद्रकिनाऱ्या लगत प्रचंड खडकाला लागूनच सेल्यूलर जेल उभारलेला आहे. कैद्यांसाठी बांधलेल्या लांबच्या लांब कोठड्या त्याही तीन मजली. सावरकरांची कोठडी सर्वात वरच्या मजल्यावर आणि सर्वात शेवटी होती. तिथे पोहचताच सावरकरांच्या आत्मचरित्रात वाचलेले सगळे प्रसंग जीवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहिले. 50 वर्षांची शिक्षा! तिथून परत येण्याची कसलीच आशा नाही. पण फक्त देशप्रेमाखातर त्या भयावह वातावरणात व त्या काळकोठडीत असंख्य यातना सहन करत सावरकर बंधूंनी आपल्या देशप्रेमाची ज्योत जागृत ठेवली हे केवढे मनोधैर्य! याच कोठडीत याच मनौधैर्याच्या जोरावर त्यांनी आत्महत्येच्या विचारांवरही मात केली. इमारतीच्या छतावरुन दिसणारा प्रचंड समुद्र, खडकावर आपटणाऱ्या लाटा पाहून सावरकरांना अकरा वर्षानंतर जहाजाने भारतात आणण्यात आले तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
संध्याकाळी थोडा अंधार पडताच सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिक यांच्यावरचा साउंड शो त्या परिसरात दाखविला जातो. भारतमातेसाठी गायलेले ते सुरुवातीचे गाण्याचे स्वर ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले. तो सर्व इतिहास तो छळ, त्या यातना ऐकतांना डोळ्यातून ज्या अश्रूधारा वाहू लागल्या त्या काही केल्या थांबेनात. प्रसिद्ध हिंदी अभिनेते ओम पुरी यांच्या आवाजात हा सर्व इतिहास ऐकतांना वेळेचे भान हरपून जाते.
अंदमान मधील इतर प्रेक्षणीय स्थळेही कायम लक्षात राहतील अशी आहेत.
दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता “बाराटांग’ या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. एवढ्या लवकर निघण्याचे कारण रस्त्यात लागणाऱ्या “जिराटांग’ येथून सुरु होणाऱ्या जंगलात “जिराका’ ही आदिवासी जमात राहते. त्यांचे आणि प्रवाशांचेही संरक्षण म्हणून दिवसातून ठराविक वेळेत पोलीस बंदोबस्तात सर्व गाड्या एकत्र सोडल्या जातात. पहाटे 5 वाजता वेळेवर आम्ही तेथे पोहोचलो. जंगलात मधून मधून काही नावांचे (की गावांचे) बोर्ड दिसले; पण मनुष्य वस्ती किंवा वावर कोठेही कोणीही दिसले नाही.
सकाळी नऊ वाजता बाराटांग येथून मोठ्या बोटीतून आठ कि.मी.वर समुद्रातच उभारलेल्या एके ठिकाणी पोहोचलो व तेथून “लाइम-स्टोन केव्हज’ पाहण्यासाठी निघालो. स्पीड बोटीतला तो प्रवास रोमहर्षक असाच म्हणावा लागेल. समुद्र-वेली, पाणी यांनी वेढलेल्या एका ठिकाणी उभ्या केलेल्या लाकडी पूलावर उतरुन तेथून पुन्हा दीड-दोन कि.मी. चालल्यावर त्या केव्हज दिसू लागल्या

. कुठेही, वस्ती, दुकाने काही नाही. फक्त समुद्र वेलींचे दाट जंगल, समुद्री क्षारांपासून तयार झालेले विविध भू-आकार त्या गुहेमध्ये आतपर्यंत जाऊन पाहिले. आणि निसर्गाच्या चमत्काराने थक्क झालो. बॅटरीशिवाय आतपर्यंत जाता येत नाही. परत तेवढाच समुद्री प्रवास करुन रात्री मुक्कामावर परत आलो.
आज आम्ही “नॉर्थ बे आयलंड’ पाहणार होतो. अंदमान बेटांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही बेटावर कोणत्याही दिशेला गेलो तरी साधारण 15 ते 16 कि.मी. अंतरावर समुद्र येतो. एका मोठ्या बोटीने प्रवास करुन पुन्हा समुद्रातच एका ठिकाणाहून “डॉल्फीन’ या जहाजाने “कोरल सी’ पाहण्यासाठी निघालो. जहाजावर बसण्याची छान सोय केलेली होती. त्यातच तळभागात जो काचेचा बनवलेला होता त्यातून समुद्राच्या आतला भाग, खडक, मासे, छोटे किटक इ. पाहता आले. याच बेटावर दुसऱ्या एके ठिकाणी सी वॉक, स्कुबा, स्मॉकेलिंग, बनाना राईड इ. समुद्री खेळांची व्यवस्था आहे. वैयक्तिक खर्चाने ते खेळता येतात.त्याच दिवशी पुन्हा मोठ्या बोटीतून प्रवास करुन इंग्रजांची जुनी राजधानी “रॉस आयलॅंड’ येथे पोहोचलो. इंग्रजांनी वास्तव्य केलेल्या पण आता फक्त भींतीच शिल्लक राहिलेल्या इमारतींचे अवशेष, बंकर इ. अगदी समुद्रालगत होते. मोठाले 15-20 फुट उंचीचे बॉयलर त्यात इंधन, पाणी टाकण्याची सोय आणि त्या पाण्याच्या तयार होणाऱ्या वाफेतून पुन्हा पाणी तयार करुन ते पिण्यासाठी वापरणे. ही इंग्रजांची आरोग्याबाबतची जागरुकता त्या काळातही पाहून कौतूक वाटले.

दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानवर ताबा मिळविला होता. या ठिकाणी जे गार्डन व पक्षी प्राणी संग्रहालय आहे. त्याला सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आलेले आहे. “अनुराधा राव’ नावाच्या 60 वर्षे वयाच्या गाईड तिथे आमच्याबरोबर होत्या. इंग्रजांच्या काळातल्या अनेक आठवणी त्या सांगतात. ज्या त्यांना त्यांच्या वाडवडिलांकडून माहित झालेल्या आहेत. त्यांची चौथी पिढी तेथे हे कार्य करीत आहे. सुनामीच्या प्रसंगात या प्राण्यांनीच त्यांना कसे सावध केले हे त्या भरभरुन सांगतात.
पोर्ट-ब्लेअर सीटी टूर साठी आज आम्ही जाणार होतो. आशिया खंडातली सर्वात मोठी सॉ-मिल जी इंग्रजांच्या काळापासून तिथे आहे ती पाहिली. तेथे जवळच असलेल्या दुसऱ्या बेटावर “पडाऊक’ नावाच्या झाडांचे जंगल आहे. ते अतिशय उपयुक्त लाकूड आहे. त्यासाठीच इंग्रजांनी येथे अगोदरच असलेल्या जपान्यांवर बाम्ब हल्ला केला होता. ते ठिकाण, सैनिकांचे बंकर, तिथे तयार होणाऱ्या लाकडी वस्तू हे सगळे पाहण्यास मिळाले.
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात महत्वाचे आहे ते तिथले म्युझियम, अंदमान येथे असलेली मुख्य आदिवासी जमात “जारवा’ व इतर जमाती यांचे सर्व जीवन इतिहास तेथे चित्र व वस्तू रुपाने उभा केला आहे.
सहलीतल्या 5 व्या दिवशी आम्ही आशिया खंडातला सर्वात सुंदर समुद्रकिनारा “राधानगर बीच’ पाहण्यासाठी निघालो. हे ठिकाण “हॅवलॉक आयलॅंड’ बेटावर आहे. पहाटे चार वाजताच निघून अडीच ते तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. हा प्रवास आम्ही एका मोठ्या “क्रूज’ सफारीने केला. सर्व सोयींनी युक्त अशी ती क्रूज सफारी अविस्मरणीय ठरली.

सकाळी खूप लवकर गेल्याने आमच्या ग्रुपशिवाय तेथे कोणीच नव्हते. एखाद्या चित्रात दिसते तसे खरोखरच गर्द निळ्या रंगाचे पाणी असू शकते हे तेथे गेल्यावरच कळले. अतिशय स्वच्छ, पाणी, स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी शुभ्र रेती आणि नारळांचे वन हे सगळे पाहून स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय याचा प्रत्यय आला. सगळ्यांनी समुद्र स्नानाचा मनसोक्त आनंद लुटला. त्या सुंदर स्वर्गीय किनाऱ्यावर आम्ही खूप वैशिष्ट्यपूर्ण दगड, शंख, शिंपले गोळा केले. अत्यंत लालभडक रंगाचे दोन चपटे दगड मला सापडले. ते पाहून बाकीच्या सगळ्याजणी मला हसल्या. कारण ते लाल कौलाचे तुकडे आहेत असे त्यांचे म्हणणे पडले. पण मी मात्र ते ठेवून घेतले. संध्याकाळी पुन्हा क्रूजने तीन तासांचा प्रवास करुन रिसॉर्टवर परतलो.
आज शेवटचा परतीचा दिवस होता. सकाळी सहा वाजताच पोर्ट ब्लेअरच्या एअर-पोर्टवर पोहोचलो. आठ वाजता आमची फ्लाइट होती. आमच्या बॅंगा चेक करतांना एक गंमतच झाली. आदल्या दिवशी आम्ही गोळा केलेले सगळे दगड, शंख, शिंपले आम्हाला बॅगांमधून बाहेर काढण्यास सांगीतले. तिथे अगोदरच दगडांचे मोठाले खोके भरलेले दिसत होते. बहुतेक प्रवासी ते नेऊ पाहतात पण तेथून काही विशिष्ट प्रकारचे दगड नेण्यास परवानगी नाही. आमच्याकडचे काही दगड त्यांनी काढून घेतले. बाकीचे नेण्यास परवानगी दिली. माझ्याकडे असलेल्या दगडातून फक्त ते दोन लालभडक दगड त्यांनी उचलून घेतले. आणि बाकीचे नेण्यास मला परवानगी दिली.
अजूनही ते दोन लाल रंगाचे दगड डोळ्यासमोर येतात. सोन्या-मोत्यांच्या दागिन्यात ज्या लालभडक पोवळ्यांचा आग्रह आम्ही धरतो. त्या पोवळ्यांचा तर तो तुकडा नसेल ना? त्यापासूनच पोवळ्यांचे छोटे मणी बनत असावेत हा विचार मनात येऊन खूप खंत वाटली. पण बरोबरच आहे, निसर्ग असा फुकट थोडेच तुम्हाला काही देईल? त्यासाठी त्याच्या सान्निध्यात रहावे लागते! सतत, कायमचे!
अंदमानचे वर्णन करण्यास कितीही शब्द अपुरेच पडतील.
सौ. शैलजा चंद्रकांत जाधव
चांदवड, ता. चांदवड जि. नाशिक
मोबा. 9552774555



