नद्या-नाले तुडुंब झाल्याने पाण्याची चिंता मिटली असली तरी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

कमी दाबाच्या पट्याचा प्रभाव पुढील48तास राज्यावर दिसणार
चांदवड ( प्रतिनिधी): चांदवड तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडतो आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडतो आहे. गुलाब चक्रीवादळ आंध्रप्रदेश व ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा वेग काहिसा कमी होऊन चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.या कमी दाबाचा प्रभाव पुढंचे 48 तास राज्यावर दिसणार आहे. नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याने सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.
नद्या-नाले तुंडुब भरून वाहताहेत. बहुतांश धरणेही ओव्हरफो्ल्ह झाली आहेत. मात्र पिकांची मोठ्या प्रमाणात वाताहत होऊन नुकसान झाले आहे. विशेषतः चांदवड तालुक्यातील पुर्व भागात शेतातील पिकांमध्ये पाणी वाहत असल्याने नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी चिंताग्रस्त आहे.
या वर्षी चांगला पाऊस पडत आहे. आधीच पाणी चांगल्या प्रमाणात असतानाच आता अचानक गुलाब चक्रीवादळ येऊन धडकले. व पिकांचे होत्याचं – नव्हतं केले आहे.चांदवड परिसरात चांगला पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारनंतर वडनेरभैरव परिसरातील पश्चिम पट्यात पाऊस पडला. सोमवारी रात्री उशिरानंतर चांदवड तालुक्यातील पुर्व भागात पाऊसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तुफान पाऊसाने पिंकाची मात्र वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी सोंगणी केलेल्या बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन पाऊसात भिजल्याने नुकसान झाले आहे. कांदा पिकाचेही वाफ्यांमध्ये पाणी तुंबल्याने हानी झाली असून रब्बी व उन्हाळ कांद्यासाठी टाकलेली रोपे उगवतांनाच नष्ट होत आहे. भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आसमानी संकटाबरोबरच आर्थिक संकटाचाही सामना आता शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

