प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने नांदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत निवेदन
जातेगाव ता, नांदगाव (अरुण हिंगमिरे)
नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने गळ्यात जास्त पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेल्या पिकांच्या माळा घालून तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन पगार यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसील कार्यालय येथे तालुक्यातील सुमारे पन्नास शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत तालुका विनाविलंब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन शासनाने सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यासाठी नायब तहसीलदार रत्नाकर मार्कंड यांना निवेदन दिले.
यात त्यांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच मागील एक महिन्यापासून नांदगाव तालुक्यात सगळीकडेच दररोज कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने
सोयाबीन, कपाशी, तुर, कांदा, कांद्याचे रोप, मका इत्यादी पिकांचे तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने खरीप हंगामातील शेतकरी बांधवांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हेरावुन घेतला असल्याने तालुक्यातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. बर्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील माती देखील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे शेतीमाल मातीमोल भावात विकावा लागला. शेतकरी बांधवांवर ओढावलेल्या या परिस्थितीत शासनाकडून विज बिल माफी, कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा अन्यथा ५ अक्टोबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

