कवी “रावसाहेब जाधव “यांच्या “गरगर मोळ्या “या त्रैभाषिक काव्यसंग्रहातील सर्वच कविता अगदीच अप्रतिम आहेत त्यातली “गीत विराम चिन्हाचे गाऊया” या कवितेविषयी
गीत चिन्हांचे गाऊ या ….
अंगावरती या मातीच्या
विरामचिन्हे लिहू या
चला मुलांनो आता आपण
गीत चिन्हांचे गाऊ या … धृ
पाण्यासोबत पाटामधल्या
ओघ धावतो शब्दांचा
क्रियेनंतर ठेवा ढेकूळ
विराम पूर्ण वाक्याचा
स्वल्पस्या अन विरामाला
फावडे कानुडे ठेवू या …१
अबब! असल्या उद्गारातून
प्रयोग केवळ दिसतो रे
अशा शब्दांच्या पुढ्यात मस्त
शिवळ उभी दिसते रे
अपसारण या चिन्हासाठी
जोखड आडवे ठेवू या …२
येता वाक्य प्रश्न घेऊनी
खुरपे बसते शेवटाला
बैल देतो शिंगे आपली
अवतरणाच्या चिन्हाला
उरली चिन्हे आणू उगवून
जुपून पांभर पेरू या …३
केले लेखन मातीनेही
अवजारांच्या चालीचे
बोलू लागता विरामचिन्हे
शब्द डोलती बोलीचे
घेऊन सोबत अवजारांना
सऱ्या नि ओळी वाचू या …४
– रावसाहेब जाधव
अगदी साध्या सोप्या भाषेत आणि ग्रामीण बाज असलेल्या या कवितेत कवीने शेतीच्या अवजारांच्या आधारे विराम चिन्हांची ओळख करून दिली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना तर सहज समजणारच आहे परंतु त्यासोबत शहरी भागातील मुलांनाही शेतीच्या अवजारांची ओळख नक्कीच होणार आहे. कवी म्हणतात, ” पाटातून वाहणारे पाणी म्हणजे जणू शब्दांची ओळ आणि जिथं ओळ थांबते तिथं आपण पूर्णविराम देतो.तसा पाण्याच्या प्रवाहाला थांबवण्यासाठी ढेकूळचा वापर करून ढेकळाला मग कवी पूर्णविराम कवी म्हणतात.आणि स्वल्पविरामसाठी कवी फावडे आणि कानुडे चा उल्लेख करतात.यात अबब! या उदगारवाचक चिन्हाची ओळख करण्यासाठी कवी शिवळ या साधनाचा उल्लेख करतात. ते बैलाच्या मानेवर जू मध्ये अडकवतात. अपसारण या चिन्हासाठी जोखडचा उल्लेख कवी करतात. प्रश्नचिन्ह यासाठी खुरपेचा तर अवतरण चिन्ह यासाठी बैलाची दोन शिंगे यांचा खूप सुंदर उल्लेख कवीने केला या कवितेत केला आहे. आणी त्या औजारांचा आकार अगदीच त्या विरामचिन्हसारखा आहे त्यामुळे खरंच खुपच सुंदर अशी विरामचिन्हांची ओळख शेतीच्या अवजारांच्या साधना सोबत कवी रावसाहेब जाधव यांनी गरगर मोळ्या या त्रैभाषिक काव्यसंग्रहात करून दिली आहे….
सौ.वंदना गांगुर्डे
नाशिक
पुस्तकाचे नाव : गरगर मोळ्या
( त्रैभाषिक बालकविता संग्रह )
कवी : रावसाहेब जाधव , चांदवड
अनुवादक : राहुल केदारे ( इंग्रजी )
संजय बोरुडे ( हिंदी )
प्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन
किमंत : १३०/-

