बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यूने रायपूर हळहळले

मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चांदवड तालुक्यातील रायपूर येथील भूमिपुत्र आणि भारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले जवान रमेश म्हातारबा गुंजाळ ( ३६ ) यांचे अपघाती निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे .
बुधवारी रायपूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . रमेश यांच्या पश्चात पत्नी सरला , आई हिराबाई , वडील म्हातारबा असा परिवार आहे .
दोन दिवसांपूर्वीच रमेश एक महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते . मनमाड लासलगाव रोडवरील भारतनगर परिसरात मंगळवारी ( दि . १४ ) रात्री चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात झाला . यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . वर्षभरापासून ते घरी आले नसल्याने रमेश यांनी एक महिन्याची सुटी टाकून दोन दिवसांपूर्वीच घरी आले होते . जवानाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी गुंजाळ यांच्या घरी रमेश यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती . बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास संपूर्ण रायपूर गावातून रमेश यांची अंत्ययात्रा काढण्यात आली .
यावेळी गावकऱ्यांनी ‘ जब तक सूरज चांद रहेगा , तब तक रमेश तेरा नाम रहेगा ‘ , ‘ वंदे मातरम ‘ , ‘ भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्याने गाव रमेशमय झाले होते . यावेळी आमदार डॉ . राहुल आहेर , तहसीलदार प्रदीप पाटील , पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली . यावेळी हवेत बंदुकीतून गोळ्या झाडून सलामी देण्यात आली . रमेश यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी , आई , वडील , भाऊ , भावजयी , पुतण्या , पुतणी असा परिवार आहे .

