चांदवड:- राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन आयुष विभागामार्फत आरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत केंद्रस्तरावर योगाचा प्रचार-प्रसार, सामाजिक आरोग्य व योगतून रोगमुक्ती जन-जागृतीसाठी आरोग्य विभाग, पंचायत समिती, चांदवड मार्फत तालुक्यातील ग्रामस्थ, शाळा व विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर योगसत्रांचे आयोजन आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊसवाड, तळेगाव रोही, वडाळीभोई, वडनेर भैरव, काजी सांगवी व त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांच्या परिसरातील ग्रामपंचायत ग्रामस्थ, शाळा व विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी सन २०२१-२२ करिता दिनांक ०१ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत तालुक्यात विविध ठिकाणी अनेक मोफत योगसत्रांचे आयोजन करण्यात आले.
या योग प्रशिक्षण शिबिरांमध्ये योग प्रशिक्षक अंबादास (राहुल) भिला येवला यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम, सुदृढ ठेवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीवाढविण्यासाठी योग व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात धावपळीच्या, स्पर्धेच्या व तणावग्रस्त युगात योग साधनेचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह पटवून दिले व सर्वांकडून प्रात्यक्षिक अभ्यास करून घेतला.
योगाभ्यासात शारीरिक, मानसिक व बौद्धिक कार्यक्षमता तर वाढतेच सोबत रोगप्रतिकारशक्ती देखील खुप चांगली वाढते. तसेच कुठल्याही समस्या व आजारांवर मात करण्याची मनाची तयारी होते. धावपळीच्या व तणावयुक्त जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम, सुदृढ ठेवण्यासाठी तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी तसेच नैराश्यापासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीवाढविण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन योग अध्यापक अंबादास भिला येवला यांनी केले.
सदर योग शिबिरांमध्ये कोविड-१९च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. या योगसत्रात अनेक आरोग्य कमर्चारी, शाळा, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच सरपंच व ग्रामस्थ अशा एकवीस हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
अनेक लाभार्थी योगसाधकांनी आरोग्य विभागाचा हा उपक्रम खूप स्तुत्य व उपयुक्त असून नियमित सुरु ठेवला पाहिजे असे आपल्या मनोगतांमध्ये सांगितले. योगाभ्यासामुळे खूप फायदा झाल्याचे जाणवले व शारीरिक किरकोळ तक्रारी व विकृती कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले व योगसत्रांचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशा राजपूत, डॉ. दीपेश रसाळ, डॉ. रेणुका घोंगे (आढाव), डॉ. उमेश रामोळे, तसेच आरोग्य कमर्चारी, शाळा, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सरपंच व ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे योग विद्या धाम व योगदर्शन फाउंडेशन, चांदवड या सामाजिक संस्थांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे सर्व उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी व आरोग्य सेवक आणि आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

