चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील राजकीय दूष्ट्या महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या निमोण विविध सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक अतिशय चुरशीची झाली. निमोण व डोणगांव या दोन गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग नोंदवल्याने व त्याच दिवशी मतमोजणी असल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.अखेरीस मतमोजणी नंतर निवडणूक झालेल्या १२ जागेंपैकी ११ जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पँनलने स्पष्ट बहुमत मिळविले.
शेतकरी विकास पँनलचे नेतृत्व माजी कुषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव शेळके , निमोण सोसायटीचे माजी चेअरमन कांतीलाल निकम , डॉ. भावराव देवरे आदींनी केले. निमोण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली . ११ जागा जिंकून प्रतिस्पर्धी सहकार पॅनलचा पराभव केला . सहकार पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले . सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता . अनुसूचित जाती गटातून पंडितराव सोनवणे हे अविरोध झाले होते . उर्वरित १२ जागांसाठी शेतकरी विकास व सहकार पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली . रविवारी मतदान होवून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आला . मतदारांनी सहकार पॅनलला नाकारत शेतकरी विकासला संधी दिली आहे . ११ जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलने सोसायटीची सत्ता काबीज केली . निकाल घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किशोर भालेराव यांनी काम पाहिले . सोमवारी सकाळी सोसायटी सभागृहात विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : – रतन एकनाथ आहेर ( ३३४ ) , राघो चेंडू ठाकरे ( २८६ ) , दिलीप विठ्ठल देवरे ( ३१५ ) , वाल्मीक महादू शेळके ( ३० ९ ) , हरिभाऊ पांडुरंग शेळके ( ३३७ ) , दत्तात्रय मुरलीधर सोनवणे ( ३७७ ) , बाबूराव काळू सोनवणे ( ३११ ) , हिरामण कचरू सोमासे ( २८७ ) , गयाबाई कौतिक काळे ( ३६४ ) , वत्सलाबाई हिरामण देवरे ( ३२६ ) , शिवाजी काळू सोनवणे ( ३४५ ) , अशोक बळवंत उगले ( ३८५ ) , पंडितराव सोनवणे ( अविरोध ) .
गड आला , पण सिंह गेला
निमोण सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पँनलचे नेतृत्व करणारे व सोसायटीचे माजी चेअरमन कांतीलाल निकम यांच्या रूपाने एकमेव उमेद्वाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे.निकम हे या पँनलच्या चेअरमन पदाच्या दावेदारांपैकी एक होते. मात्र पँनलने बाजी मारूनही निकम यांना पराभूत व्हावे लागल्याने ‘गड आला , पण सिंह गेला ‘ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या पँनलमध्ये
व्यक्त केल्या जात होत्या. तर यावर प्रतिक्रिया देताना कांतीलाल निकम यांनी सांगितले की, मतदारांनी मला नाकारले नसून सर्वसाधारण गटात मतपत्रिकेवर माझ्या जवळ असणाऱ्या उमेदवारांची निशाणी सनई – तबला असल्याने व माझी निशाणी नारळ असल्याने दोन्ही निशाण्यांमध्ये साध्यर्म दिसत असल्याने मतदारांची गफलत झाल्याने मला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले , असे सांगितले आहे.


ग्राम चैतन्य मासिक खरोखरच नावा प्रमाणेच ग्रामीण भागातील इंतभु बातम्या असतात, पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा