आहुर्ली सोसायटी ची चेअरमन पदाची निवडणूक झाली तहकूब : कोरम अभावी निवड लांबणीवर
ईगतपुरी- (नवनाथ गायकर)-
ईगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या आहुर्ली आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवडणूक अखेर कोरमच्या पुर्ततेअभावी तहकूब झाली आहे. दरम्यान ही निवड आता लांबणीवर पडली असुन पुढील पंधरा दिवसाच्या आत पुन्हा या उपरोक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सहकार विभागाचे वतीने देण्यात आली आहे.
आहुर्ली, वांजोळे व नांदडगाव या तीन गावची ही एकत्रित सहकारी सोसायटी असुन या सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची अटितटीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.
यात नऊ पैकी सहा जागा बिनविरोध झालेल्या असुन तीन जागासाठी निवडणूक होऊन निकाल लागला आहे.
मात्र या नऊ पैकी चार नवनिर्वाचित संचालकानीं निवडणूक आटोपल्यानंतर तात्काळ आपले लेखी राजीनामे सादर केल्याची जोरदार चर्चा आहे.
यात गंमत म्हंणजे संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच सदर चार संचालकानीं राजीनामे दिले असले तरी हे राजीनामे मंजूर वा नामंजूर करण्यासाठी संचालक मंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. संचालक मंडळच कार्यारुढ न झाल्याने हे राजीनामे मंजूर तरी कोण करणार ? असा पेच या निमित्ताने पडला आहे.
दरम्यान आहुर्ली सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीत नऊ पैकी केवळ पाचच संचालक हजर राहिल्याने कोरम पुर्ण होत नसल्याचे कारण देत ही निवड प्रक्रिया तहकूब झाली आहे.
दरम्यान सभा तहकूबीमुळे चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया खोळंबली असुन लांबणीवर पडली आहे.
येत्या पंधरा दिवसाच्या आत पुन्हा चेअरमन, व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान पुढील बैठकीत तरी कोरम पुर्ण होईल का ?
चेअरमन, व्हा.चेअरमन निवड होईल का ? कि पुन्हा कोरम अभावी सभा तहकूब होईल ? तसे झाले तर संचालक मंडळ बरखास्त होईल का ? सोसायटीवर प्रशासक नेमला जाईल का ? आदी विविध शंका कुशंका विचारल्या जात असुन याबाबत रंगतदार चर्चा झडते आहे.
दरम्यान या विलक्षण राजकीय घडामोडी मुळे आहुर्ली सोसायटी व सोसायटीचे राजकारण याची तालुका भर चर्चा होताना दिसत आहे.
या शक्यताबाबत सहकार विभागाशी चर्चा करुन आधिक माहिती घेतली असता सहकार विभागानेही सहकार कायदयातील तरतुदी व नियमावलीचा अभ्यास सुरू असून पुढे रितसर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे म्हटले आहे.

