चांदवड तालुक्यामध्ये भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सुवर्णसंधी !
चांदवड : संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी, तसेच पशूसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.प्रत्येक गावामध्ये / तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव-तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव व धरणे आहेत. बऱ्याच ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचतच असतो. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. जर आपल्या गावाला ‘जल-आत्मनिर्भर’ करावयाचे असेल, तर या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे, त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन करणे नितांत आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनामार्फत जलयुक्त शिवार व गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या राज्य शासनाच्या, तसेच प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजना व अटल भूजल योजना या केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून वरील सर्व कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जावा व आपले गाव ‘जल-आत्मनिर्भर’ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘मागणी अर्ज’ मागविण्यात येत आहेत. चला तर मग दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वरील केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या तलावातील गाळ काढूया व आपले गाव ‘जल-आत्मनिर्भर’ बनवूया असे आवाहन भारतीय जैन सकल संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. यावेळी चांदवड शहरातील नगरपरिषद हद्दीमध्ये देखील या प्रकारे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आलेल्या रथाचे उद्घाटन चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल तसेच सुरेश दादा जाधव, मोहन शर्मा, सचिन निकम,विनोद पाटणी, काका देवरे, मयूर फुलफगर, संजय क्षत्रिय, किशोर शत्रिय,कासिफ खान, बाळा पाडवी, विठ्ठल आवारे, शरद बोराडे, आदी नागरिक उपस्थित होते. 
अर्ज करण्याची पद्धत :
मोबाईल अप / लिंक: https://bjsindia.org/mwsd. ही लिंक मागणी अर्ज करण्यासाठी आहे, त्यानुसार फॉर्म मधील संपूर्ण माहिती भरावी. सरपंच / ग्रामसेवक यांच्या सही व शिक्कासहित ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर तो अर्ज पूर्णपणे भरून वर दिलेल्या लिंकनुसार त्याची फोटोकॉपी अपलोड करावी.
शुध्द स्वच्छ पाण्याने सुरक्षित करू जनजीवन एकजुटीने यशस्वी करू जल जीवन मिशन.
• जल जीवन मिशनच्या माध्यमातून होणार जलक्रांती.
• योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावाचा लोकसहभाग.
• पाणीपट्टी निर्धारण व वेळेत नियमित वसुली.
• पाणी पुरवठा योजनांची वेळोवेळी नियमित देखभाल दुरुस्ती.
• गावाला शाश्वत पाणी पुरवठा.
• विविध योजनांचा कृतीसंगम.
• प्रत्येक गाव/वाडी/वस्ती/तांड्यावर मुबलक पाणी पुरवठा.
• प्रत्येक घरात घरगुती कार्यात्मक नळजोडणी.
• दररोज दरडोई ५५ लिटर प्रमाणे शुध्द पाणी पुरवठा.
• पाणी पुरवठा साधनांचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती.
• उपलब्ध पाणी पुरवठा स्त्रोतांचे बळकटीकरण व जल पुनर्भरण.
• सर्व घटकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा.
• स्वयंसहाय्यता गटातील महिलांद्वारे गावपातळीवर पाणी तपासणी.
• गावपातळीवरील सर्व शासकीय कार्यालयांना (ग्रामपंचायत, शाळा,
अंगणवाडी, बँक, पोस्ट ऑफिस इ.) कार्यात्मक नळ जोडणी.
• ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, स्वयंसहाय्यता गटातील महिला व पाणी पुरवठा कर्मचारी यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी.

