“विचारलढा” आदिवासी मनोभुमिचे वैचारिक दर्शन
ग्रामीण आदिवासी साहित्यक्षेत्रात आज अनेक नामवंत साहित्यिक उदयास येत आहेत,त्यात काही पडद्याबाहेर आहेत तर काही पडद्याआड आहेत,कोणी मुळनिसर्ग संस्कृतीपासून दुरावले, तर काही आपल्या निसर्गसंस्कृतीची नाळ घट्ट पकडून खंबीरपणे उभे आहेत,त्यातीलच एका निसर्गसंस्कृतीची नाळ घट्ट बांधून ठेवणाऱ्या साहित्यिकाचा आज मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो,ते म्हणजे जव्हार तालुक्यातील माझे परममित्र कवी रवी बुधर अतिशय शांत आणि सोज्वळ मनाच्या कवी रवी बुधर यांचा जन्म जव्हार तालुक्यातील न्याहाळे या गावातील एका गरीब कुटुंबात झाला,बालपणापासूनच गरीबीचे असह्य चटके सोसलेल्या कवी रवी बुधर हे त्यांच्या मनातील भावभावनेच्या हिंदोळ्यांचा हेलकावा आपल्या काव्यातून व्यक्त करतांना दिसतात, त्याचा प्रत्येय मला त्यांचा “विचारलढा” हा काव्यसंग्रह वाचतांना मला पदोपदी जाणवला,म्हणून त्यांचा काव्यसंग्रह वाचतांना अगदी सहजपणे माझ्या तोंडून शब्द निघाले”खरचं मित्रा तू तर खरा कवी मनाचा रवी आहेस..!
आपल्या प्रगल्भ लेखनीच्या जोरावर ते आज कोकण मराठी साहित्य परिषद जव्हार शाखेचे अध्यक्ष आहेत,तर सरांना २०१२ ला जव्हार तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार ,२०२२ महाराष्ट्रयुवा आदर्शशिक्षक पुरस्कार,२०२३ पालघर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार,मिळाले आहेत,
प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेता विसेन्ट अलिक्सांद्रा(स्पेन)म्हणतात की कवीचे कवीपण हे त्याच्या मुखातून प्रसवत असते,त्याच्या जमातीची,पंरपरेची भावस्थिती तो आपल्या लेखनीतून परखडपणे मांडत असतो,पण त्यासाठी तो आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा राहतो,तेव्हाच त्याच्या पायाच्या तळव्याखाली एक वैचारिक प्रवाह तिव्र होऊन तो झपाटलेल्या लेखनीतून प्रकटतो..!त्यांचा “विचारलढा” हा काव्यसंग्रह २०१९ साली मेधा पब्लिशिंग हाऊस अमरावती इथून प्रकाशित झाला.आपल्या विचारलढा या काव्यसंग्रहातील “आई” या कवितेत कवी म्हणतात,
वेदना पलिकडील वेदना,सोशिल्या आई मजसाठी
मोहात धुंद होऊनी अंध,आज नावही तुझे ना मज ओठी.
कवी आपल्या आई या कवितेमधून व्यक्त होतांना म्हणतात.. हे माय मला जन्मास घालतांना तुला किती अनंत यातनांचा सामना करावा लागला गं.. अक्षरक्ष तू मृत्यूच्या दारातून परतून मला हे विश्व दाखवलेस पण इथल्या क्षणभंगूर मायावी जगताच्या मोहापाशात अडकून तुझे ऋण आज मी पार विसरून गेलो,आणि आजच्या वास्तव जीवनात हे अगदी तंतोतंत खरे आहे, आज आपल्या भोवतालच्या नश्वर दुनियेत पदोपदी हे दृश्य तुम्हाआम्हांला बघायला मिळते.
“प्रकृती नियमानं लाभला स्री जन्म
चिंता ग्रासे तिला हुंडासक्तीची.
मिरविती मर्द उरी स्वाभीमान
लालची भावना अंतरीची.
कवी “कलंक या कवीतेतून आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृतीवरती ताशेरे ओढतांना म्हणतात,की खरचं स्री जन्म तिच्या नशिबी कलंकच आहे का?आईवडिलांच्या घरात लाडालोभात वाढलेली मुलगी लग्नानंतर जेव्हा सासरी जाते,तेव्हा हुंड्यापायी तिचा छळ केला जातो,हुंडा नाही म्हणून अनेक मुलींची लग्न मोडली जातात,कवी हाच प्रश्न आपल्या कवितेतून समाजासमोर मांडतांना दिसतात.
तर आपल्या “जीवन”या काव्यातून व्यक्त होतांना ते म्हणतात
जीवन एक विलक्षण कोडं
कधी कोणासही ना सुटायचं.
क्षणिक सुख-दुःख अनंत
तरीही साऱ्यांनी जगायचं..
खरेच..मानवी आयुष्य जगतांना आपल्याला सुख दुःखाचे अगणित असे अनेक पैलू उलगडतात.. कधी सुखाची सावली तर कधी दुःखाचे डोंगर कवी रवी बुधर म्हणतात क्षणिक सुखाच्या मृगजळाचा पाठलाग करण्यापेक्षा माणसाने आहे त्यात सुख मानले तरच तो अधीक समाधानाने आपले आयुष्य जगू शकेल,थोडक्यात मोह,माया,प्रसिध्दीचा हव्यास हा माणसाला एका अनामिक दुःखाच्या खाईत घेऊन जातो.
कवी त्यांच्या “रोपटे” या कवितेत म्हणतात.
इवलेसे नाजूक रोपटे
कुशीतून भू च्या उगवते.
संगोपन देती आधार
मिळूनी पंच महाभूते..
निसर्गावर निस्सिम प्रेम करणारा कवी आपल्या काव्यातून व्यक्त होतांना म्हणतो.काट्याकुट्याच्या रानावनात रानवाऱ्याने वाहून आणलेल्या एखाद्या झाडाच बीज पावसाच्या पहील्या सरींनी भू मातेच्या उदरातून बाहेर डोकावतं.पण त्या अनाथ अश्रित अंकुरालाही इथल्या विश्वातील पंचमहाभूते आधार देऊन वाढवतात,थोडक्यात कवीला आपल्या काव्यातून हेच सांगायचं आहे,तुमच्यात गुणवत्ता आणि टिकण्याची हिम्मत असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही.कारण तुमच्यापाठी निसर्ग सदैव उभा आहे.
“संतुलन निसर्गाचं”या कवितेतून कवी म्हणतात
हिरवळीचा झाला र्हास
पर्वत डोंगर दिसे उदास.
झाली दुर्मिळ ती फुलं
या निसर्गाच संतुलन ढळलं.
खरे तर आज स्वार्थी अन राक्षसी महत्वकांक्षेपोटी मानवाकडून चै्ाफेर निसर्गावरती आक्रमन होत आहे,त्याची परिणिती आज आपण बघतोयचं.. पृथ्वीवरील वाढते प्रदूषण,वर्षानुवर्षेतापमानात होणारी वाढ,घटत जाणारे मानवी आयुर्मान,नव नवीन येणारे साथीचे आजार,ऋतुमानात झालेला बदल,त्यातून येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती(दुष्काळ,अतिवृष्टी,त्सुनामी,भूकंप,चक्रीयवादळ,हिमवादळ,ज्वालामुखी,भूजलपातळीचा खालावलेला स्तर)हे कशाचे द्योतक म्हणावे,कवी बुधर आपल्या “संतुलन निसर्गाचं”) या काव्यातून आपली आगतिकता व्यक्त करतांना सांगतात,की अरे मानवा आता तरी जागा हो,वृक्षतोड थांबवून हिरवाईच संगोपण कर हिरवाई टिकली तरच तू टिकणार,अन्यथा तुझे अस्तित्व मिटणार.
कवी रवी बुधर यांच्या “विचारलढा” या काव्यसंग्रहातील सर्वच कविता या वैचारिक असून मानवी मनाला विचार करायला भाग पाडतात,पुढील लेखनकार्यासाठी त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा..!
कवी काळूदास कनोजे

