[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आदिवासींच्या विकासाच्या आड येणारा ऑक्टोपस : संजय दोबाडे

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासींच्या विकासाच्या आड येणारा ऑक्टोपस
संजय दोबाडे

(सत्यशोधक बहुजन आघाडी आयोजित पहिल्या आदिवासी कातकरी कला सांस्कृतिक संमेलनाच्या समेलनाध्यक्ष म्हणून केलेले मनोगत)
आजच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या माझ्या आदिवासी बंधू-भगिनींनो, आपकी जय, सेवा जोहार आणि जय आदिवासी. पहिल्या आदिवासी कातकरी महोत्सावाचं अध्यक्षपद् मला दिल्याबद्दल मी आपला आणि संयोजकांचा खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे मला भाषण करता येत नाही.
लोकबाबू यांच्या बस्तर बस्तर या कादंबरीत एका पात्राच्या तोंड़ी एक संवाद आहे मामा, हम जंगल के लोग है, हमारी जबान छोटी है. ज्यादा बोल नाही पाते. मगर आँखे बहुत तेज है, वही बोल-बता देती है. खरं म्हणजे आता वेळ आली आहे. डोळ्यांची भाषा बोलणं बंद करून आपण तोंडाने बोलायला पाहिजे. आपण आज नाही तर कधी बोलणार? मणीपूरमध्ये आपल्या मायबहिणीची नग्न धिंड काढण्यात आली, आपण काहीच बोललो नाही. मध्यप्रदेशमध्ये एका उच्चवर्णीय माणसाने आदिवासी माणसाच्या अंगावर लघवी केली तुरीही आपण गप्पच. एक आदिवासी स्त्री आज या देशाची राष्ट्रपती आहे आणि तरीही आदिवासी माणसांवर होणारे अत्याचार कमी होत नाहीत. कारण आपण बोलत नाही.
आपण बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेतला जातो. आपण आपला इतिहास, त्यांना सांगत नाही म्हणून ते आपल्याला नरभक्षी राक्षस म्हणतात. आपण आपल्या चांगल्या चालीरिती समजावून सांगत नाही म्हणून ते आपल्याला मागासलेले म्हणतात. आपल्याकडे नवरीकडून हुंडा दिला जात नाही, स्त्री भ्रूणहत्या आपण करत नाही. हे आपण त्यांना पटवून देत नाहीत म्हणून तो आपल्याला दारुडे म्हणतात. आदिवासी म्हणजे कोण तर लंगोटी लावून फिरणारे असं लोकांना वाटतं. पण भारताचे संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असणारे आणि हॉकीचं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे डाक्टर जयपाल मुंड तसेच पायलट असणारे राजे महेंद्रसिंह मुकणे आपण त्यांना सांगत नाहीत.
आदिवासी सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेत. महाराष्ट्रात आदिवासींच्या पंचेचाळीस जमाती आहेत. संपूर्ण भारतभर असंख्य आदिवासी जमाती आहेत. आदिवासी जसे भारतात आहेत तुसे भारताबाहेरही आहेत. ऑस्ट्रेलियातील अॅबओररिजनल, अमेरिकेतील रेड इंडियन, सुदानमधील हक्कीपक्की आणि आफ्रिकेतील हिम्बा हे सगळे आदिवासीच आहेत. रामायणात आदिवासी होते, महाभारतातही आदिवासी होते, शिवाजी महाराजांच्या बरोबरीने लढणारे आदिवासी होते आणि आजही आदिवासी आहेतच. भारतात सातशेपेक्षा जास्त आदिवासी गट आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, भारत सरकार आदिवासींना आदिवासी म्हणायला तयार नाही. संयुक्त राष्ट्रसभेने मागवलेल्या अहवालात भारत सरकारने सांगून टाकलं आहे की, भारतात आदिवासी नाहीत.
आपल्या आदिवासींबद्दल सगळ्या जगात अनेक गैरसमज पसरले आहेत. काही अजाणतेपणी पसरवलेले आहेत आणि काही जाणीवपूर्वक, एक कट करून पसरवलेले आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आदिवासी काळी जादू करतात. आमूचा एक शिक्षक मित्र गैरआदिवासी भागात राहणारा हरसूलसारख्या अत्यतं दुर्गम भागात नोकरीला लागला. गावकऱ्यांनी त्याला समजावलं, आदिवासी भागात जातोस, जरा जपुन रहा, ते लोक काळी जादू करतात. त्याच्या वाट्याला गेलास तर तुला बेडूक नाहीतर माकड़ करून करून टाकतील. तुम्हाला सांगतो भावांनो, दहा वर्षे त्याने एकाच शाळेवर काम केलं माणूस म्हणूनच अजूनही तो माणूसच आहे आणि आदिवासी पाड्यावरच नोकरी करतोय. त्याला माकड़, बेडूक कोणी केल, नाही बरं का! उलट त्याला काही झालं, आजारी पडला तर गावच्या आदिवासी लोकांनीच त्याला सांभाळलं. आदिवासी म्हणजे टारझनच्या सिनेमात झाडपाला अंगाला गुंडाळून हिरो-हिराईनला त्रास देणारा काळाकुट्ट माणूस एवढंच काही लोकांना माहीत आहे.
जगाच्या तुलनेत आदिवासी मागे का राहिला याचं आपणच विश्लेषण केलं पाहिजे.
बाहुबली सिनेमातून करोडो रुपये मिळवणारा राजामौळी नावाचा एक निर्माता दिग्दर्शक, आपल्या आदिवासी क्रांतीकारक कोमाराम भीम आणि अल्लूरी सिताराम राजू यांच्या जीवनावर सिनेमा बनवतो हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवतो. पण ते नायक आदिवासी आहेत हे मुद्दाम सांगत नाही. अजून एक चलाखी तो गुपचूप करून टाकतो हिरोला तो जाणवं घालून लढाई करताना दाखवतो म्हणजे या लढाईचा आदिवासींशी काहीही संबंध नाही हेँ घोषितच करून टाकतो. एक ऋषभ शेट्टी येतो. पंधरा कोटी खर्च करून पाचशे कोटी कमावतो. पण हा सिनेमा आदिवासी संस्कृतीवर आधारलेला आहे असं कुठेही म्हणत नाही. जयभीम, कर्णान, असुरन असे काही दाक्षिणात्य सिनरेगा आदिवासीच्या संस्कृतीचं योग्य मूल्यमापन करतात, पण त्याची संख्या खूप थोडी आहे.
आदिवासी मागे का राहिला? याचं मी माझ्यापुरतं उत्तर शोधलं आहे ते म्हणजे ऑक्टोपस. ऑक्टोपस हा एक समुद्रातला आठ पायांचा पाणी आहे, त्या ऑक्टोपसचा आणि या ऑक्टोपसचा अर्थाअर्थी काहीही सबंध नाही. थोडक्यात काय तर आदिवासीच्या मागास राहण्याची आठ कारणे आहेत. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, दारु, इतिहासाची आठवण नाही, व्यवहारज्ञान नाही, परकियांवर डोळे झाकून विश्वास, आपण आपले मित्र आणि शत्रू ओळखू शकत नाही.
आपण थोडक्यात एक एक कारण पाहू. आदिवासीच्या मागासलेपणाचं पहिलं कारण आहे, अज्ञान. आता तुम्ही म्हणाल, आदिवासी अडाणी आहेत म्हणजे आदिवासी मूर्ख आहेत का? तसं अजिबात नाही. जंगलांबद्दल आणि औषधाबद्दल आदिवासींना जेवढं ज्ञान आहे ना तेवढं जगातल्या कोणत्याचं समाजाकडे नाही. औषधी वनस्पतीबद्दल एवढं ज्ञान असुनही आजारपणामुळे दरवर्षी जेवढे आदिवासी मरतात तेवढे कोणत्याच समाजातील लोक मरत नसतील, पण जगाच्या तुलनेत आपलं ज्ञान कमी पडतंय. चालू घडीला जगाशी स्पर्धा करण्यासाठी जे ज्ञान आपल्याला हवं आहे ते घेण्यात आपण कमी पडतोय. आपलं ज्ञान आपण अपडेट करत नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना काही अडचणी येतात. त्या आपण दूर करत नाही. आपली मूल मोठ्या कष्टाने दहावी-बारावीपर्यंत पोहचतात आणि त्याच्यापुढे जाऊन नोकरीधंद्याला लागतात त्यांची संख्या फार थोडी आहे. नोकरीला लागणारे आपण पांढरपेशे लोक इतरांच्या समस्येकडे डोळेझाक करतो, त्यामुळे शिक्षणात अडचणी येतात.
आदिवासीच्या मागासलेपणाला अजून एक महत्त्वाचं कारण आहे, तो म्हणजे अंधश्रद्धा. साप चावलेल्या माणसाला शिकले-सवरलेले लोक दवाखान्यात घेऊन जातात आणि आपण काय करतो? भगताकडे नेतो. भगताकडे सर्व सापांच्या विषावर एकूच औषध असतं अंगारा देणे. माणूस आजारी पडला, लग्न जुळत नसलं, पोरबाळं होत नसलं, पोरगं जगत नसलं तरी भगताकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग भगत काय करतो? दाणे पाहतो आणि आपल्यावर कोणीतरी करणी केली आहे, असं सांगतो. करणी करणाऱ्या माणसाचं तो प्रत्यक्ष नाव सांगत नाही. तो आपल्याच घराजवळच्या खाणाखुणा सांगतो आणि आपण ठरवून टाकतो आपला अमुक तमुक शेजारी भुताळपण कुरतो, मग आपल्या आपल्यातच भांडण सुरू होते.
पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे दारू जगातले निम्यापेक्षा जास्त लोक दारू पितात. पण बदनाम कोण होतो आदिवासीच. कारण का? तर आदिवासी माणूस पितो पन्नास-शंभराची पण दाखवतो हुजाराची, लाखाची दारू पिणाऱ्याचे हाल आपण सांगायला पाहिजे का? शंभर जणांमध्ये तो उठून दिसतो. दारूमुळे कुटुंब बरबाद झाल्याची अनेक उदाहरणे कथा-कादंबरी आणि सिनेमात पहायला मिळतात. कोणी नाटकाचा शौकीन असेल तर तो पटकन सांगू शकेल दारूवरचं सगळ्यात गाजलेलं नाटक कोणतं? बरोबर एकच प्याला. हा एकच प्याला प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. नाटकामध्ये सुधाकरही पितो आणि तळीरामही पितो. दारूमुळे संसार कोणाचा उध्वस्त झाला तर सुधाकराचा. पण बदनाम कोण? तळीराम, पेपरवाले एकदम भारी बातम्या देतात. पोलिसांची तळीरामांवर कारवाई, तळीरामांच्या अड्ड्यावर धाड. इतके इतके तळीराम गजाआड. अरे बाबांनो रोज एवढ्या तळीरामांवर कारवाई करता, कधीतरी एखाद्या सुधाकरावर कुरा ना कारवाई! आता मी तुम्हाला म्हणणार नाही दारू पिऊ नका. कारण चांगला सल्ला देणाऱ्याला दारुड्या लगेच बोलतो मी काय तुझ्या बापाच्या पैशाची पितो? मोहाच्या झाडाचे कितीतरी उपयोग सांगता येतील. पण मोह म्हटलं की लोकांना फक्त मोहाची दिसते.
आता तुम्ही म्हणाल, या माणसाला आपण एवढा मोठा मान दिला, संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आणि हा आपलेच दोष दाखवायला लागला आहे. पण भावांनो, मी तुम्हाला दोष दाखवत नाही. एक साधसुध निरीक्षण सांगतोय. आपणच आपल परीक्षण केलं पाहिजे. समजा आपल्या गालाला काहीतरी काळ लागलं आहे. येणारे-जाणारे आपल्याकडे पाहून हसताहेत. एखादा आपला हितचिंतक जवळ येतो आणि हळूच सांगतो. गालाला काळं लागलंय पूस. आपण पुसायला लागतो. तो गालातल्या गालात हसतो. थोडं खाली. थोडं वर, थोड़ं इकड़ं, थोडं तिकडं. तो सांगत राहतो आपण पुसत राहतो. आपलं सगळं तोंड कधी काळं होऊन जातं कळत पण नाही. हे का घडतं? कारण आपल्याकड़े आरसा नसतो. आपल्या चुका सुधारण्यासाठी आपल्याकडे एक आरसा पाहिजे तो म्हणजे आत्मपरीक्षणाचा. ज्याच्यामुळे आपण आपल्या चुका दुरुस्त करू शकतो. आपल्या मागासलेपणाचे मी तीन (मुद्दे सांगितले. आता बाकीच्या मुद्याचं विश्लेषण आपण स्वतः करावं. कदाचित ह्या ऑक्टोपसचे आठपेक्षा जास्त पाय आपल्याला दिसतील. ते पाय छाटण्याचं काम आपल्यासारख्या चळवळीच्या लोकांनी करावं. आम्ही साहित्यिक आपल्यासोबत असू याची मी ग्वाही देतो.
आता चालू घडीचा एक गाजणारा मुद्दा आहे आरक्षणाचा कायद्याच्या चौकटीत राहुन त मिळेल नाही मिळेल हा आपला मुद्दा नाही. परंतु आपल्या म्हणजे एसटी, एससी आणि ओबीसीचं आरक्षण सगळ्यांच्या डोळ्यांत खुपतंय. आरक्षण म्हणजे, भीक, आरक्षण म्हणजे खैरात असंच काहींना वाटतंय. संविधानाने आपल्याला आरक्षण का दिलंय हे कोणी समजून घेत नाही. मुळात त्यांना तो समजून घ्यायचंच नसतं. आरक्षणाला विरोध करणारे म्हणतात, मिलिट्रीमध्येपण आरक्षण पाहिजे. मरण्यासाठी सगळ्यात पुढे एससीचे लोक ठेवायला पाहिजेत. त्यानंतर एसटीचे आणि मग ओबीसीचे. पण त्यांना हे माहीत नाही, जेव्हा उरीमध्ये आतंकवादी हल्ला झाला होता त्यात पंचवीस सैनिक मारलेगेले होते. आणि त्या मरणाऱ्यांमध्ये एकोणीस जवान आदिवासी होते. आपण आरक्षण न घेता जरी एखादी जागा मिळवली तरी ते आपली उपेक्षाच करतात. २०१९ च्या महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मोना मेश्राम नावाच्या आदिवासी मुलीची निवड झाली होती. तिथे तर जातीवर आधारित आरक्षण नव्हतं. पण झाले काय? भारतीय संघ फायनलपर्यंत खेळला आणि मोनाला एकही मॅच न खेळता परत आणलं. ती काय तिथे इतर खेळाडूच्या बॅगा सांभाळायला गेली होती का? आरक्षण म्हणजे कवचकुंडल असं काल परवापर्यंत आपण म्हणू शकत होतो. पण आज तसं म्हणू शकत नाही. एकतर सरकारी नोकरभरती करत नाही. खाजगीकरण केलं तर आरक्षणाचा प्रश्नच निकाली निघतो. १९८० पासून २००० पर्यंत जी नोकरभरती झाली त्यात हजारो बोगस आदिवासींनी मूळ आदिवासींच्या जागा बळकावल्या. खर तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे पण सरकार म्हणतं त्यांनी इतकी वर्षे सेवा केली त्यांना आता काढता येणार नाही गुन्ह्यालाही सेवा म्हूटलं जातंच मग आपलं आरक्षण आपण कसं टिकवणार?
आरक्षणवाले आणि बिगर आरक्षणवाले यांच्या मार्कात फक्त पाच टक्क्यांचा फरक असतो पण विरोध करणारे म्हणतात, ९९ टक्केवाले घरी पडून आहेत आणि ४० टक्क्यावाला बसून खातोय. आता ४० टक्क्यावाले त्यानी दाखवून द्यावेत.
एक किस्सा सांगतो. माझ्या एका मित्राचा नातवाईक बारावीला ७० टक्क्याच्या आसपास मार्क होते. फॉरेस्टच्या जागा निघाल्या. त्यान अर्ज केला एसटी राखीव मधून. पण झालं काय पासष्ट मार्कवाला जनरलचा उमेद्वार निवडला गेला आणि सत्तर टक्केवाला एसटी राखीव आहे घरी बसून. आता तुम्हीच सांगा इथे गुणवत्ता कोणाची जास्त आहे?
राजकीय आरक्षण हा एक वेगळाच मुद्दा आहे बरं का! आरक्षण आहे म्हणून आपल्याला ग्रामपंचायत नगरपालिकामध्ये वगैरे संस्थांमध्ये स्थान आहे. नाही तर कोणी उभं पण केलं नसतं. मागच्या पंचवार्षिकला आमच्या नगरपालिकेची निवडणूक झाली. एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्याने मला विचारलं, आम्ही अमुक तमुक माणसाला उभं करतोय. तो कसा आहे? मी म्हटलं, बरा आहे, पण त्याला राजकारणातलं काही कळत नाही. तो म्हणाला, आपल्याला अशीच माणसं पाहिजेत.
आपल्या लक्षात येतंय का? त्यांना अशीच माणस पाहिजेत. ज्यांना राजकारणातलं काही कळत नाही. जे आपल्या वरीष्टांना प्रश्न विचारणार नाहीत. फक्त हो ला हो करतील आणि त्यांचे सगळे निर्णय निमुटपणे ऐकून घेतील. राजकारण्यांना हुशार आदिवासी उमेद्वार अजिबात नकोय. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे त्या पक्षाच्या नेत्याने नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा फॉर्म भरून ऐनवेळी माघार घेतली. आता माघारीसाठी त्याने किती लाख मागितले ते मी अजिबात सांगणार नाही आणि तुम्हीही विचारायचं नाही.
आपल्या आदिवासींमध्ये आता साहित्यिकांची संख्या वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण ज्याच्यासाठी ते लिहीत आहेत. लिहिण्याची धडपड़ करत आहेत त्या वाचकांची संख्यापण वाढायला पाहिजे. पण तसं घडत नाही. साहित्यिकांची धडपड एवढ्या साठी की ते का लिहित आहेत आणि काय लिहीत आहेत याचं मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. आमुचा एक शिक्षक मित्र नव्याने कविता लिहायला लागला. आमच्या तालुक्यात शिक्षकांचे पगार फार उशिरा व्हायचे. सगळ्यांचे पगार झाल्यावर आठ दिवसांनी त्याने त्या पगाराला होणाऱ्या उशिराबद्दल कविता लिहिली. त्याला मी म्हटलं, एवढ्या किरकोळ गोष्टीवर कविता नका लिहू पगार झाल्या झाल्या शिक्षक तुझी कविता विसरून जातील. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण जे काही लिहितो ते चिरकाल, टिकणारं पाहिजे.
आदिवासींच्या विकासासाठी झटणाऱ्या फारच संस्था आणि चळवळी आहेत साहित्विक, आणि चळवळ याच्यामध्ये सामंजस्य पाहिजे. साहित्यिकानी चळवळींना पोषक वातावरण निर्माण करून दिल पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. माझ्या ओळखीचं एक मासिक होतं. त्याचे संपादक आणि शाहिराचं काही घरगुती भांडण झालं. मग ही गोष्ट पण त्याने आपल्या मासिकात छापावी का? पण त्याने छापली आणि त्याचा परिणाम काय झाला? वाचकांना ही गोष्ट खटकली. मासिकांचे वर्गणीदार निम्म्याने कमी झाले.
सध्या आदिवासींच्या घरवापसीसाठी एक संस्था खूपच आक्रमकपणे काम करत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, आदिवासी हे हिंदूच आहेत आणि मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात गेलेल्या आदिवासींना हिंदू आदिवासींना जे लाभ मिळतात तो मिळायला नाही पाहिजे. मागच्याच महिन्यात नाशिकमध्ये एकू परिषद झाली डी लिस्टिंग. त्यातही हेच मुद्दे होते. पण आदिवासी हे ना हिंदू आहेत ना मुस्लिम् ना ख्रिश्चन. आदिवासी हे फक्त आदिवासीच आहेत. दुसऱ्या कुठल्याच धर्माचं लेबल त्यांना चिटकवलं नाही पाहिजे. आदिवासींना आता त्यांनी एक फारच गोंडस नाव दिल आहे, वनवासी. पण आदिवासींना वनवासी म्हटल्यानं त्याची ओळखच पुसली जाईल. वनात राहणाऱ्यांनाच आदिवासी म्हटलं तर मग फारच घोटाळा होईल. रामायणातला राम चौदा वर्षे आणि महाभारतातले पांडव बारा वर्षे वनवासात राहिले होते. त्यांनाही आदिवासी म्हणावे लागेल. आदिवासी म्हणजे वनवासी नाहीत. भारताबाहेरच्या एन‌जीओनी पाठवलेला पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यासाठी आणि आदिवासींमध्ये फूट पाडण्यासाठी वनवासी कुल्याण आश्रमची स्थापना झाली आहे. आपण त्यांचे षड्यंत्र हाणून पाडलं पाहिजे. आदिवासींचं आदिवासीत्व जपलं पाहिजे.
आदिवासींचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर सर्व आदिवासींनी एकत्र यायला पाहिजे. परंत दुर्दैवानं असं घडत नाही. मध्यंतरी एक बातमी वाचली. पुण्यात आदिवासी महानायक बिरसा मुंडाचा पुतळा उभारला जात आहे. खरं तर सगळ्या भारतातल्या आदिवासींना अभिमान वाटावा अशी ही घटना. परंतु काही आदिवासी संघटनांनी या पुतळ्याला विरोध केला. भारतातील कुठल्याही महापुरुषाचा पुतळा जगात कुठेही बसवला जात असेल तर कोणीही त्याला विरोध करत नाहीत. मग आदिवासींना आपल्या नायकांचा एवढा राग का? खरं तर आदिवासींमध्ये फूट पाडण्याचं हे कारस्थान आदिवासी विरोधकांचं आहे. त्याला आपल्या संघटनांनी बळी पड़ता कामा नये. मी कातकरी, मी कोकणा, मी भिल्ल, मी मावची, मी तडवी, मी गोंड, मी आंध असं न म्हणता मी आदिवासी म्हणणं या घडीला जास्त गरजेचं आहे.
सत्यशोधक बहुजन आघाडीने आज आयोजित केलेला, हा उपक्रम खरच खूप चांगला आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहचली पाहिजे. त्यांनी केवळ एकाच आदिवासी समुहावर काम् न करता आदिवासींच्या इतरही मागास घटकांसाठी काम करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त कुरतो. मा. सचिन बगाडे, मा. नागेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो.

श्री. संजय दोबाडे
( आदिवासी साहित्यिक)
भोर, पुणे २९/०१/२०२४

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या