भाग २
सामाजिक रीतीरिवाज, रूढी, परंपरा नवी रूपे धारण करू लागल्या. समाजजीवनातील सर्वात जिव्हाळ्याचे व हजार बाराशेच्या उपस्थितीत साजरे होणारे उत्सव पाचपन्नासच्या उपस्थितीत संपन्न होऊ लागले. त्यात लग्नसमारंभ असो वा जन्म वा मृत्युच्या अनुषंगाने साजरे होणारे कार्यक्रम कमीत कमी उपस्थितीत साजरे होऊ लागले. अर्थात त्यातही कायद्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत लपूनछपून अधिक उपस्थितीत काहींचे कार्यक्रम पार पडतही आहेत. कदाचित समाजातली ती एक सहजप्रवृत्ती असावी. काही जणांना भावनिक गुंत्यामुळे सामाजिक अंतराचे नियम पाळणे कठीण जाऊ लागले, काही जण परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता किंवा सूचनापालनाच्या उलट वागण्याच्या प्रवृत्तीमुळे नियम मोडतानाही दिसू लागले, तर काही जण अत्यंत कठोरपणे स्वयंशिस्तीच्या अंगाने नियमांचे पालन करू लागले.
एकीकडे समोर येणाऱ्या आपल्याच सख्यासोबत्यांकडे, नातेवाईकांकडे, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडे जड अंत:करणाने संशयास्पदपणे पाहण्याची वेळ आल्याची सल सोबत घेऊन समाजजीवन पुढे सरकू लागले; तर दुसरीकडे काही जण समोरच्याचा आपल्याविषयी गैरसमज होईल, त्याच्या भावना दुखावल्या जातील याची भीती मनात कोंडू लागल्याच्या जाणिवेने भावनेच्या आहारी जाऊन जणू लादल्या सारख्या वाटणाऱ्या अंतरालाच दूर ढकलून देऊ लागले.
सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, अनेक कारखाने बंद झाल्याने हवेचे, पाण्याचे प्रदूषण कमी झाले. पृथ्वीने मोकळा श्वास घेतला. ज्याप्रमाणे स्वच्छ हवेचा स्तर सुधारला त्याप्रमाणेच स्वत:ला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या मानवाच्या डोक्यातील अहंतेचा स्तर देखील सुधारू लागल्याचे जाणवू लागले.

काहींचे व्यवसाय ठप्प झाले. काहींचे संसार गप्प झाले. काहींच्या हातातली कामे गेली. काहींनी नवी कामे शोधली. काही पूर्णत: बेरोजगार झाले. काहींनी हालअपेष्ठा सहन करत शहरे सोडून आपापल्या गावांकडे प्रयाण केले. काहींनी आपले जुने व्यवसाय बदलले. कालपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या लहानसान व्यावसायिकांनी जीवनावश्यक वस्तूंची किंवा शेतमालाची खरेदी-विक्री करण्यास सुरुवात केली. त्यात काही यशस्वी झाले. काही थांबले. काही मागे फिरले तर काहींना थांबावेही लागले. त्यातल्या त्यात काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही महागही.
ते काहीही असले तरी सामन्य खरेदीदार मात्र घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंकडे ‘संसर्गास कारण तर ठरणार नाही ना’ अशा शंकास्पद नजरेने पाहू लागला. जीव लावून वस्तू गोंजारण्याचे मनसुबे मात्र त्यामुळे त्याचे मनातच विरू लागले. काहीजण येणारी प्रत्येक वस्तू निर्जंतुक करण्यासाठी धडपडू लागले तर काही जण तसले ते कृत्य ‘निरर्थक’ असल्याचे सांगत त्यांची खिल्लीही उडवू लागले…
सामाजिक जाणिवांनी भरलेले अत:करण सोबत असणाऱ्या काही जणांनी आपले समाजभान जागृत ठेवून सामाजिक बांधिलकीच्या आपल्या भावनांना समाजसेवेचे मूर्त रूप दिले. काहींनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. काहींनी निर्व्याज मनाने मदत म्हणून गरजूंना वस्तूंचे व अन्नाचे वाटप सुरु केले. ज्याप्रमाणे येथेही समाजातील खरे गरजू व खोटे गरजू असे दोन गट दिसून आले; त्याप्रमाणेच समाजसेवकांचेही दिसणारे आणि न दिसता सेवा करणारे असे गट दिसले.
डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांचे महत्त्व अधोरेखित झाले. समाजात या घटकांबद्दल आदर वाढला. काहींना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला तर काहींना अविश्वासही.
(क्रमश: पुढील भागात…)

