(विक्रम देवरे)
चांदवड (प्रतिनिधी ) : चांदवड तालुक्यातील हरसुल येथील
युुवा शेतकरी अमोल खैरे यांनी नाशिक येथील खाजगी नोकरी सोडून परंपरागत व्यवसाय असलेल्या शेतीकडे लक्ष देत आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळवले. विशेषता भाजीपाल्याच्या क्षेत्रात त्यांनी विशेष यश संपादन केले. सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा चांदवड तालुक्यातील पूर्व भाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. या वर्षी
पाऊस चांगला असला तरी, दरवर्षी तो राहीलच असे नाही. कितीही पाऊस झाला तरी उन्हाळ्यात पाणी मात्र टिकत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी शेतात शेततळे बांधून पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून कमी पाण्यात भरघोस उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांना त्यात चांगल्या प्रकारे यश मिळाले आहे.
पारंपरिक कांदा पिकाबरोबरच काहीतरी वेगळे करावे, या ध्यासाने अमोल खैरे
यांना पछाडले. त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले. जमिनीच्या मशागतीपासून तर पीक काढणीपर्यंत योग्य नियोजन करण्यात आले. पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून त्यांनी शेतात काकडी व वांगी पिकाची लागवड केली. नेटाफिम ॲग्रीकल्चर प्रायव्हेट फायनान्स च्या आर्थिक सहकार्यातून सुमारे 70 लाख रुपये खर्चून पॉलिहाऊस तयार केले. इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित ऑटो मायग्रेशन उभे केले. शेतीला जोडधंदा म्हणून पुष्पा हायटेक नर्सरी या नावाने रोपवाटिका सुरू केली व त्यातून दर्जेदार भाजीपाला रोपांची निर्मिती करून त्यातूनही आर्थिक उत्पन्न वाढले. तसेच इतर फा डी या जातीची काकडी व बार टॉक काळे वांगे लावली आहे. काकडी तिसऱ्या दिवशी एक एकर क्षेत्रातून तीनशे ते साडेतीनशे कॅरेट प्रमाणे दहा टन माल निघतो. त्यास नाशिक मार्केट येथे 16 ते 17 रुपये प्रति किलो दर मिळतात.
वांगी एक एकरात केले असून पाचव्या दिवशी दोनशे-तीनशे कॅरेट निघतात, त्यास प्रति किलो पन्नास रुपये पर्यंत भाव मिळत आहे. तसेच पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून 115 × 130 फूट या आकाराचे शेततळे उभे केले आहे. त्यातून दीड ते दोन कोटी लिटर पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.
दुष्काळी भागात अमोल खैरे यांनी भाजीपाल्याच्या माध्यमातून फुलवले नंदनवन
खाजगी नोकरी ला सोडून शेतीला अत्याधुनिक प्रयोगाद्वारे, उत्तम पीक व्यवस्थापन करून, भरघोस उत्पन्न घेऊन काही लाखात कमाई झाल्याने समृद्ध शेती द्वारे माझ्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करता आली. शेतीचे नंदनवन करीत एक वेगळा आदर्श उभा करता आला..
– युवा शेतकरी अमोल खैरे

