[masterslider id="2"]
कविता काव्यरसास्वाद विशेष लेख

बळीची व्यथा अधोरेखित करणारी कविता

यांनी लिहिलेले संजय गोराडे

‘विठूमाउली की विठोबा’ (कवितासंग्रह) कवी – गणेश भाकरे

काव्यरसास्वाद -१

अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या चरणावर कवितासंग्रह रूपी शब्दफुले वाहत व वाली नसलेल्या समस्त शेतकरी वर्गाच्या दुःखाची त्यात मांडणी करत कवी गणेश भाकरे यांनी ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रहात शेतकऱ्याचा सुपुत्र या नात्याने अनेक प्रश्नांना समर्पक वाचा फोडली आहे.

शेतकऱ्यांच्या पाचवीला बाराही मास अठरा विश्वे दारिद्र्य पुजलेले असते, ते शेतकऱ्यांचे दुःख विठ्ठलाला दिसत नाही का ? शेतकरी विठूमाउली म्हणतो, तर माउली या नात्याने त्याला लेकराचे दुःख कळायला हवे.

कुठे अति कुठे माती कसा खेळतो रे खेळ

कुणब्याच्या डोईवर नित्य दुःखाचं आभाळ

‘करू नको पांडुरंगा’ या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे कुठे इतके अति करतो की, तेथे उपभोग घेण्यासाठी कोणी नाही, कुठे इतकी आयुष्याची माती केली आहे की, त्यांचं सगळं जीवनच मातीमोल झालं आहे, जसे कुणब्याच्या डोईवर तर नित्य दुःखाचेच आभाळ असते, असा कुणब्यासंगे नित्य खेळ खेळत असलेला हा आपपरभाव बरा नाही, कोणतीच माउली मुलाच्या जीवनात इतकं दुःख पाहून स्वस्त बसत नाही, याउलट कवी अभिमानाने स्वतःच्या जन्मदात्री माउलीचे उदाहरण देत म्हणतो,

माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून

मायला समजतं माझ्या आयुष्यातलं दुःख

अशी माझी मायमाउली…

तिला सारं कळतं न सांगता,

पण तुला कसं कळतं नाही विठोबा…

लहानपणी सतत मायेच्या छत्रछायेखाली कवी असायचे, तेव्हा तर मायेला मुलाचं दुःख सहज  कळायचं, पण आता कामानिमित्त ते शहरवासी आहे, ते जेव्हा कधी गावी गेले तर कवीच्या आईला त्यांच्या चेहऱ्यावरील नुसत्या हावाभावावरून त्याच्या वर्तमान जीवनातलं सुखदुःख लगेच कळतं असं कवी विनम्रपूर्वक सांगतो, तसं शेतकऱ्यांसाठी विठ्ठल माउलीच्या ठिकाणी आहे, तेव्हा माउलीला लेकरांचे दुःख लगेच कळायला हवे, पण आजच्या घडीला शेतकऱ्याच्या जीवनाचे फक्त मातेरे झाले आहे, तो कधीकाळी जगाचा पोशिंदा होता, त्यालाच आता एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे, हा जगण्यातला दुजाभाव पाहून कवी हळहळ व्यक्त करतो आहे, दरवर्षी आषाढी कार्तिकीला शेतकरी पंढरीला पायी चालत वारीसाठी जातो, पण विठोबा तुला लेकराच्या चेहऱ्यावरचे दुःख कधीच का दिसत नाही ! खरंच, तू शेतकऱ्यांची ‘विठूमाउली आहे का ? की फक्त विठोबा !’ असा थेट प्रश्न विठ्ठलालाच विचारत कवीने कवितासंग्रहालाच शीर्षक दिले आहे, ‘विठूमाउली की विठोबा’

शेतकऱ्यांची हालापेष्टा पाहून कवीच्या मनात विठ्ठलाविषयी नकळत शंका उपस्थितीत झाल्याने संग्रहातील प्रत्येक रचना बळीची व्यथा अधोरेखित करते आहे, मनाला शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न सतावत असल्याने त्यांनी कवितासंग्रहाला असे उद्गारवाचक शीर्षक दिलेले दिसते आहे, ‘विठूमाउली की विठोबा’. या कवितासंग्रहात शेतकऱ्यांच्या दुःखांबरोबर आजच्या सामाजिक प्रश्नांवरही बोट ठेवले आहे, आजच्या तयार झालेल्या विषमतेचेही विविध रचनातून रास्त वाभाडे काढले आहे, यातील सर्व कविता कवीच्या जगण्यातून आल्या आहे, जगण्याची जेव्हा कविता होते ; तेव्हा ती नक्कीच वाचकाच्या काळजाचा ठाव घेणारी ठरते.

वेदनांचे फक्त l आम्हा घरी पेव l

म्हणूनिया देव l शोधतोय ll

कुणब्याने असे काय पाप केले की, त्याच्या नशिबी फक्त दारिद्र्यच आहे, ‘कसाबाला मिळे l बिर्याणीचे ताट l तुला मात्र वाट l मरणाची ll’ हा फरक स्पष्ट करत कवीने आजच्या राजकार्त्यांचा नाकर्तेपणाही कौशल्याने खोडून काढला आहे. अभंग काव्यप्रकार अचूक हाताळत आजच्या समाज व्यवस्थेला खूप गंमतीशीर चिमटे काढले आहेत.

कवीने कवितासंग्रहात मुक्तछंद, अष्टाक्षरी, अभंग अशा काव्यप्रकारात लेखन करत आपल्या प्रतिभेचे मार्मिक असे दर्शन घडवले आहे, कवी कामगार असले तरी ते मुळचे शेतकरी आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिले आहे नव्हे तो स्वतः शेतकऱ्याचे जिणे जगले आहे, त्यामुळे या संग्रहातील कविता वास्तवाचा लेखाजोखा सांगणाऱ्या कविता आहे, सोबत मलपृष्ठावरची ‘विश्वास’ कविता आजच्या साहित्यिकांचे खरे रूप उघड करणारी आहे,

मी नसेल इथं तिथं

त्यावेळेस सांगतील जगाला माझं

अन माझ्या कवितेचं महत्त्व

इतका कवी गणेश भाकरे यांना आपल्या लेखनावर गाढ विश्वास आहे, भले आज कवीच्या लेखणीची ताकद काहीजण जाणूनबुजून दुर्लक्षित करत असतील, पण ते ओळखून आहे संग्रहातील कवितामधील शब्दांची ताकद व महात्म्य. एक दिवस नक्की कवीच्या लेखनाला अव्हेर करणारे कौतुक करतील, इतका त्यांनी ‘विश्वास’ कवितेत सकारात्मक विश्वास मांडला आहे,

असा हा ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रह शब्ददीप प्रकाशनाने प्रकाशित केला आहे, पुस्तकाचे बाह्यरंग म्हणजे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे, पुस्तकाचे अंतरंग व मांडणी खूप आकर्षक आहे, वाचक नक्कीच ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रहाचे स्वागत करतील अशी आशा आहे, कवी गणेश भाकरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा….

****

संजय गोराडे (नाशिक)

मो. ९८५०६९१२१६

लेखकाबद्दल

संजय गोराडे

2 टिप्पण्या

एक टिप्पणी द्या