आखाजी सनाचे थोडक्यात महत्त्व
हिंदवी नववर्षातला गुढीपाडव्याच्या नंतर येणारा सण म्हणजे आखाजी हिंदवी संस्कृतीला अगदीच पुरातन काळापासून एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे वर्षांचे बाराही महिने त्यात येणारे सहा उप ऋतुंमध्ये साजरे केले जाणारे सण उत्सव हे नेहमीच आरोग्य, संस्कार, शेतकरी जीवनाशी निगडित असतात, आखाजी हा सण महत्वाचा सण त्याचे आदिवासी भागात वेगवेगळे अंतरंग उलगडून साजरा केला जातो त्यामुळे समाजात वावरताना आपुलकी, सहानुभूती निर्माण होऊन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संदेश निर्माण होतो त्यानिमित्ताने घेतलेला थोडक्यात संक्षिप्त आढावा.
आदिवासी भागांमध्ये आखाजी सण जवळ यायला सात दिवस बाकी असले की महिला घरातील एका कोपऱ्यात टोपलीत माती टाकून मका , ज्वारी व बाजरी ही धान पेरुन गौराई घालून दररोज सकाळी , संध्याकाळी पाणी शीपतात सुर्य प्रकाशाचे कोणतेही किरण या टोपलीत वाढणाऱ्या रोपाला लागु देत नसल्याने ही गौराई रोप पीवळसर रंगाची होतात ही रोपांना जसजशी दिवसागणिक वाढत पानं येतील तसतशी संस्कृतीला अनुसरून जागृती करण्यासाठी बाया गीत गातात हे संस्कृती, संस्कार, शेतकरी जीवन,शेतीवाडी, आणि अध्यात्मिक भाव ह्या संबंधित असतात.
आनाव नांगर खेडाव
बुया बाई खेडावं बुया.
आनाव येळु सेळु पेरावं धान बाई
पेरावं धानं
आनाव गंगा पाणी शीपावं
धान बाई शीपावं धान
तेही धानाला एकच पान बाई
एकच पान
तेही धानाला दोनच पान बाई
दोनच पान नंतर एक पाना पासून सोळावे पानांपर्यत गाणे वर्णत नेत पुढे
तोही धान खाल्ला मोंडे गायीनी बाई
मोंडे गायीनी
मोंडे गायीचा पहिला एक बाई
पहिला एक
मोंडे गायीचा दुसरा एक बाई दुसरा एक असे म्हणत सोळा पर्यंत जाऊन गीतातुन पहिल्यांदा गौराई बरोबर शेत पीकाला देखील उजाळा दिला आहे
एवढेच नाही तर संसारातील प्रापंचिक जीवनातील संघर्षमय स्थान गीतातुन साकारलेले आहे ते असे.
मणभर गहु निसायला
मणभर गहु निसायला
निसता निसता रात्र गेली
निसता निसता रात्र गेली
गेली सासूच्या माहली
गेली सासूच्या माहली
हाका मारीते आत्याजी
हाका मारीते आत्याजी
उघडा उघडा तुमची दारं
उघडा उघडा तुमची दारं
तुमची दारं कवाडाची
कुलपा जोडं नानायाची
तिथुन गौराई जोर केली
अशा पध्दतीने हे गीत वर्णतच पुढे
सासरा,देर,नंद, यांनाही अनुसरून गाऊन संसारातील प्रापंचिक नात्याला उजाळा दिला आहे
अध्यात्मिक भाव वृत्तीने गीतं गायलं जाते
काळा ऊस कांकारु गं
कांकारु कांकारु
मारुती देवळात झेंडा फडकला
गौराई तुझा भरतारा गं भरतारा
असं वर्णतच पुढे भवानी, गणपती, ह्यांना उद्देशून अध्यात्मिक भाव वृत्तीने गीतं गायलं जातं ही गाणी बाया सात दिवस गावातील पाड्या पाड्यावर
घरासमोरील अंगणात बसून गातात आखाजी सणाचे दिवशी मात्र सर्वत्र आनंदाचे वातावरणात बाया सकाळी उठून अंघोळ वैगरे करून गौराईला शेवटचे पाणी घालतात नंतर घरातील प्रमुख व्यक्ती प्रथम गावातील मंदिरात जाऊन देवाच्या मूर्तीची पुजा अर्चा करून पाणी सोडुन गौराई ठेवतात मंदिरात गौराई ठेवल्या नंतरच स्रीयांनी ती केसाला वेनीमध्ये माळायची असते असा नियम आहे अशी प्रतिक्रिया शहाणी माणसं देत असतात नंतर घरातील कुलदैवत देवाधीकांच्या फोटोची पुजा करुन पळसाच्या पानावर नैवेद्य दाखवून एक नैवेद्य गवरावर कावळ्यासाठी ठेवले जाते याचं दिवसी आदिवासी भागात मृत व्यक्तीच्या नावाने चुलीमध्ये होम तयार करून मंत्र विधीच्या साह्याने अग्यारी पाडली जाते.घराघरामध्ये या दिवशी माश्याचे कालवन तसेच गोडधोड पदार्थ बनवतात सर्वांना एकत्र वाढुन जेवन करुन झाल्यावर गावातील बाया प्रत्येक घरातील गौराई एकत्र करून त्याची ढोलगी किंवा डफ वाद्यावर गाणं गात गावात गौराई डोक्यावर घेऊन नाचत मिरवणूक काढली जाते ही गाणी बाया मनसोक्त आनंदाने मनत सण साजरा करतात शेवटी ही मिरवणूक एखादी छोटी छोटी विहीर किंवा तळ्याच्या ठिकाणी नेऊन गानं गाऊन प्रथम मानाच्या गौराईचे गावातील कोतवालाच्या हस्ते विसर्जन करतात नंतर नगारा वाद्य वाजवून इतर गौराईचे विसर्जन केले जाते नंतर बाया अंघोळ किंवा हात पाय धुवून घरी येण्यासाठी परतीला लागतात ह्या सणाचे महत्व मोठे आहे.
टिप : ही आखाती(गौराई) सणाबद्दल प्राथमिक माहिती आहे सविस्तर नाही याची नोंद घ्यावी
सुभाष नारायण कामडी
(संशोधक)

