[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद लेख विशेष लेख हितगुज

“नीलमोहर” : प्रीतीचे झुंबर लावणारी कविता ( रसग्रहण : वंदना गांगुर्डे)

यांनी लिहिलेले वंदना गांगुर्डे

 

कवयित्री “जयश्री वाघ” यांच्या “नीलमोहर” या काव्यसंग्रहातील ही एक सुंदर कविता…..

‘तुझ्या जाणिवांचे, मनी गाव जागे,
तुझ्या आठवांचे, मनी काजवे
अशा या अवेळी, आता सांजवेळी..
निघाले कुठे पारव्यांचे थवे?

चुडे-काकणाला तुझी आस लागें
मुखी मेखलेच्या तुझी आर्जवें
खुळ्या राधिकेचे मनी कूळ नांदें
वृथा नांदते मी अनंगासवें

तुझा नाद हृदयी सुन्या राऊळाच्या
जुन्या घंटिकेच्या निनादापरीं..
असा श्वास नाही, कधी घेतला की
तुझी नाममुद्रा नसे त्यावरीं…

मनाच्या महालीं तुझ्या आसनाला
जडावेत मोती हिरे पोवळें
तुझे स्वप्न कि, सत्य आभास आहे
जीवाला अजुनी कळे ना कळें

कुण्या मोगऱ्याने मधुमालतीला
सुगंधीत हे घातले साकडें
आता पर्वताच्या कुशीतून वेडी
नदी धाव घेई समुद्राकडे

किती शुष्क होते मरुद्यान माझे
कुणी निर्मिले सप्तरंगी तळे?
मिटू पाहणाऱ्या विरागी कळ्यांची
फुलू लागली कोमलांगी दळे

तुझ्या भोवताली उन्हाळा तिथे
अन् इथे लागती या जीवाला झळा
तुझ्या वेदनेच्या जरा चाहुलीने
किती लागती काळजाला कळा!

कधी चौकटी या कधी चार भिंती
कधी आड येती मला उंबरें
कशी सांग येऊ कशी सांग लावू
छताला तुझ्या प्रितीची झुंबरें?

– जयश्री वाघ, नाशिक


प्रेम विरह अन संयम यांची वेगळी प्रतिमा प्रतीके घेऊन जाणारी कविता कधी इंदिरा संतांची आठवण करून देते तर कधी मिरेशी नातं सांगते. त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी “ती” पण काही मर्यादा, चौकट, यात ती अडकली गेली आहे. त्यामुळे एकंदरीत तिच्या त्या अवस्थेचे वर्णन करणारी ही कविता आहे….

तिच्या मनात त्याच्या जाणिवांचे गांव जागत असते आणि आठवांचे काजवेही मनात, अशा अवेळी पारव्याचे थवे कुठे बरं निघाले? असं ती म्हणते आहे.
तिच्या हातातल्या चूड्या काकणालाही त्याची आस लागते. त्या वेड्या राधिकेचे कुळच तिच्या मनात नांदते राऊळतल्या जुन्या घंटेच्या निनादाप्रमाणे त्याचा नाद तिच्या हृदयात आहे.
ती म्हणते की असा श्वासही नाही घेतला मी की त्यावर प्रियकराचे नाव नाही म्हणजे श्वासागणिक ती त्याला स्मरत असते. तिच्या मनाच्या महालातल्या त्याच्या आसनाला हिरे मोती पवळे जडावे हे स्वप्न की सत्य याचा उलगडाच अद्याप तिला झालेला नाहीय.
कुण्या मोगऱ्याने मधुमालतीला घातलेले हे सुगंधित साकडे तिला वाटते.
पर्वताच्या कुशीतून वेडी नदी समुद्राकडे धाव घेते जणू.

तिचे मरुद्यान किती शुष्क होते त्यात सप्तरंगी तळे निर्मिले गेले. अन मिटू पाहणाऱ्या त्या विरागी कळयांच्या कोमल त्या अंगात दळेही फुलू लागली.

त्याच्या भोवती उन्हाळा म्हणजे तो दुःखात संकटात असताना इकडे हिलाही किती काळजी वाटते असे सांगताना कवयित्री म्हणतात “तुझ्या भोवताली उन्हाळा तिथे अन इथे लागती या जीवाला झळा
त्याच्या वेदनेच्या जराशा चाहूलीनेही तिच्या काळजाला किती कळा लागतात याचे वर्णन करताना उत्तम उदाहरण कवयित्रीने दिले आहे. चार भिंती चौकटी अन कधी उंबरे मला आड येतात. मग कसे येऊ सांग बरे तुझ्या छताला प्रीतीची झुंबरे लावायला

प्रेम तर खुप आहे तिचे त्याच्यावर पण बऱ्याच मर्यादा किंवा अडचणीही आहेत. खरंच खूप सुंदर अशी ही “जयश्री वाघ” यांची ही कविता आहे…..

सौ वंदना गांगुर्डे
नाशिक

 

 

पुस्तक: नीलमोहर ( काव्यसंग्रह )

कवयित्री: जयश्री वाघ

प्रकाशन : ग्रंथाली 

लेखकाबद्दल

वंदना गांगुर्डे

लेखका , कवयित्री

एक टिप्पणी द्या