आभाळ ओढ
-किरण भावसार
जमिनीत मूळं रुतवून
झाडं जखडून असतात मातीला
म्हणजे जखडलेलीच असतात
असं नाही
उडून येतात ती आभाळभर…
पाखरांच्या पंखांनी
संध्याकाळ झाल्याचं सांगत
फांद्या जेव्हा किलबिलू लागतात
पाखरं पसरवत राहतात
दिवसभरातली
कितीतरी आभाळ गाणी
पानांच्या कानोकानी.
घनघोर अंधारात
पाखरं झोपी जातात
दमून भागून
तेव्हा मात्र झाडं पेलून धरतात
आंधळ्या आभाळाचं ओझं
आपल्या हिरव्या हातांनी.
पहाट वाऱ्यात
बदलू लागतात रंग आभाळाचे
तेव्हा पुन्हा जाग येते झाडांना
पाखरांच्या चोचीत
नवे निरोप पेरून
ती पुन्हा किलबिलू लागतात
आभाळ ओढीने…
(‘मी आपला उगीचच’ या आगामी कवितासंग्रहातून…)
कवी ” किरण भावसार ” यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “मी आपला उगीचच ” या काव्यसंग्रहातील “आभाळ ओढ” ही एक सुंदर कविता….
कवी म्हणतात, “झाडं जरी जमिनीत आपली मुळे कितीही घट्ट रोवून असली तरी अगदीच जखडून मात्र नसतात तर दिवसभर ते पाखरांच्या पंखानी उंच आभाळात मुक्त विहार करुन येतात. आणी संध्याकाळ झाली असं फांदया जणू किलबिलू लागतात तेव्हा पाखरं दिवसभरातली आभाळगाणी पानांच्या कानात गुणगुणतात. रात्रीच्या घनघोर अंधारात जेव्हा पाखरं दमून भागून झाडावर झोपतात तेव्हा मात्र झाड आपल्या हिरव्या हातांनी त्या आंधळ्या आभाळाचं ओझं पेलून धरतात.
पहाटेला तर आभाळाचे रंग बदलू लागतात आणी झाडांनाही पून्हा जाग येते. मग झाडे पाखरांच्या चोचीत आभाळासाठी नवनवीन निरोप देऊन किलबिलतात अन झेपावतात उंच आभाळाच्या ओढीने…..
खरंच खूपच सुंदर अशी ही कवी “किरण भावसार “यांची कविता आहे. झाडांचे जरी अगदी मातीत मूळ घट्ट रोवलेली असली तरी पाखरांच्या रूपाने ते आभाळाला भेटून मुक्त विहरून येतात .झाडं पाखरांच्या चोचीत आभाळासाठी निरोप देतात.
फांदयाना झाडाचे हिरवे हात कवीने म्हटले आहे.”आभाळ ओढ “या कवितेत भुई आणी आभाळ यांना सांधणारा दुवाच भासतात जणू पाखरे.यातून कविची सुंदर कल्पनाशक्तीही दिसते…..
वंदना गांगुर्डे
नाशिक
पुस्तक: मी आपला उगीचच ( काव्यसंग्रह )
कवी: किरण भावसार
प्रकाशन : अक्षरबंध
किमंत : १४०/-

