सुप्रीम कोर्टाने बंदी उठविल्याने चांदवड व नांदगाव तालुक्यातील बैलगाडी मालक व शर्यतींच्या चाहत्यांमध्ये उत्साह
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठ वली आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. २०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर बैलगाडी शर्यतीला पुन्हा सुरू होणार असल्याने बैलगाडी मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निर्णयाचे स्वागत चांदवड व नांदगाव तालुक्यातील तालुक्यातील असंख्य बैलगाड्यांच्या शर्यतीचे प्रेमी यांनी केले असून आनंदोत्सव साजरा केला. ही बंदी उठल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा-जत्रांमध्ये पूर्वीप्रमाणेच पुन्हा या शर्यतींचा थरार पहायला मिळणार आहे. सदर बंदी उठावी अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही वारंवार संसदेत ही बंदी उठावी म्हणून मागणी केली होती.

