[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

न्हनावे येथे आत्मा अंतर्गत कांदा पिकाची शेतीशाळा संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन गट शेती करावी व ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याचे आवाहन कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राचे सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ मंगेश बडगुजर यांनी केले.

तालुक्यातील न्हनावे येथे आत्मा अंतर्गत कांदा पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शेतीशाळेसाठी कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ मंगेश बडगुजर उपस्थितहोते.त्यांनी कांदा पिकावरील समस्या,किड व रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन,ग्रामबीजोत्पादन, इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली.गावातील युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावा व त्या गटातील दोन दोन शेतकरी बांधवांना कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र,पिंपळगाव बसवंत येथे ग्रामबीजोत्पादनातील तज्ञ,किड व रोग यातील तज्ञ,खत व्यवस्थापनातील तज्ञ,काढणीपश्‍चात तंत्रज्ञानातील तज्ञ तयार करून त्यांनी गावातील इतर शेतकरी बांधवांना माहिती द्यावी अशी संकल्पना श्री.बडगुजर यांनी मांडली. त्यानुसार गावातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दर महिन्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीमार्फत किटक शास्त्रज्ञ मंगेश बडगुजर व कृषी सहाय्यक शिरीष पवार यांचा सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील कांदा हे प्रमुख पीक असल्याने कृषि विद्यापीठातील संशोधनाबाबत अद्यावत माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोचविण्यासाठी दर महिन्याला कांदा द्राक्ष संशोधन केंद्र,पिंपळगाव(ब.)येथील शास्त्रज्ञांसोबत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
-शिरीष पवार,कृषि सहाय्यक,न्हनावे

सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच कैलास गुंजाळ,उपसरपंच विठ्ठल ठाकरे,पोलिस पाटील शरद ठाकरे तसेच कांदा उत्पादक शेतकरी बारकू मोगल,प्रशांत ठाकरे,किसन वेताळ,ज्ञानेश्वर ठाकरे, पुंजाराम ठाकरे ,केदु पवार आदि उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या