चांदवड : –
शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी म्हणून त्यांनी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून या पिकाचे बियाणे सरळ वाणाचे आहे,त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही.यासाठी कृषी विभागामार्फत व्यापक प्रमाणात मोहीम स्वरूपात गावागावांत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक तसेच जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक यांचे नियोजन करून अंमलबजावनी चालू आहे.शेतकरी बांधवांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी किती बियाणांचा वापर करावा, याबाबत कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सोयाबीन बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की आयोग्य कसे ओळखाल?
कागद अथवा पोते पाण्याने ओले करून त्यावर १० रांगांमध्ये प्रत्येकी १० बिया याप्रमाणे एकूण १०० बिया ठेवाव्यात व त्याची गुंडाळी करून तीन-चार दिवस त्यावर पाणी शिंपडावे. १०० बियांपैकी ७० सुदृढ व निरोगी बियांना मोड आलेले असल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे.
किमान ७०टक्के अथवा त्यापुढे उगवण क्षमता असेल तर पेरणीसाठी एकरी सरासरी ३० किलो बियाणे वापरावे. यानंतर ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवन झाली असेल तर प्रत्येक १टक्का उगवणक्षमता घट साठी अर्धा किलो जास्तीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. समजा ६९% बियाण्यांची उगवण झाली असेल तर एकरी ३०.५०किलो, ६८% बियाण्यांची उगवण झाली असेल तर ३१किलो याप्रमाणे बियाणे वापरावे.६०टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

