चांदवड कृषि विभागाची निराधार कुटुंबांना मदत
तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी सेवा केंद्र व बायर, हायटेक सीड्स,ऍडवांटा या कंपनीच्या मदतीने कोरोना या आजाराने मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मका व सोयाबीन बियाण्याचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव, विजय धाकराव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबातील सदस्यांची होणारी अवस्था व आर्थिक स्थिती याची जाणीव ठेवून समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी पुढाकार घेऊन ईशान कृषी सेवा केंद्राचे संचालक शरद शिंदे व बायरचे आकाश म्हैधुने यांच्या मदतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांचे आभार मानून सदर उपक्रम हा अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून तालुक्यातील इतरही कृषी सेवा केंद्रांनी सदर बाधित कुटुंबांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. सदर कार्यक्रमात ईशान कृषी सेवा केंद्राचे संचालक शरद शिंदे व बायर कंपनीचे प्रतिनिधी आकाश म्हैधुने यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी अनिल मोकळ, मनीषा जाधव, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण काळे, बाबा कांबळे, शिरीष पवार, भरत वानखेडे, श्याम वाघ, संतोष कडनोर, चंद्रकला पगार, सुवर्णा पवार आदींनी परिश्रम घेतले.

