[masterslider id="2"]
विशेष लेख स्थानिक बातम्या

चंद्रभान भालेराव यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ : सत्यवचनी नेत्याला तालुका मुकला !!

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सत्यवचनी नेत्याला तालुका मुकला !!

चंद्रभान भालेराव यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ

सरपंच ते पंचायत समिती सभापती पर्यंतचा प्रवास थक्क करणारा !!

चांदवड तालुक्यातील वाद वराडी या गावचे सुपुत्र  चंद्रभान भालेराव यांनी वीस वर्ष सरपंच पद भूसविले होते .विशेष म्हणजे अनुसूचित जाती या राखीव जागेवरच नव्हे तर जनरल सर्वसाधारण जागेवरही गावाने त्यांना सरपंच पदाचा मान दिला होता यावरूनच त्यांचे काम किती महत्त्वाचे होते हे कळते. भालेराव साहेब यांनी तालुक्यात अनेक कार्यकर्ते घडवले आहेत, अनेकांना मदतीला धावून जाणारा नेता अशी ख्याती चंद्रभान भालेराव यांची होती. निराधार लोकांना मदत करण्यात अग्रेसर ते सतत असत. तालुक्यातील केवळ ते समाजापुरतेच मर्यादित नेते नव्हते तर मराठा समाज, धनगर समाज माळी समाज ओबीसी वर्गात ते सगळ्यांना आपले हक्काची वाटणारे तालुक्यातील एकमेव आगळे – वेगळे व्यक्तिमत्व म्हणून चंद्रभान भालेराव यांचे नाव इतिहासात सतत घेतले जाईल. भालेराव साहेब यांचा सरपंच ते सभापती पर्यंतचा प्रवास वादवराडीसारख्या छोट्या गावात राहून महत्वपूर्ण झालेला आहे. कोणाच्याही सुख दुःखात धावून जाणारा नेता म्हणून चंद्रभान सावळीराम भालेराव यांची खाती होती. आज चांदवड तालुका एका उत्तुंग नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने सर्व स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगितले जाते की राजकारण हे खोटे बोलणाऱ्यांचे आहे ,पण भालेराव साहेबांनी राजकारणातील सत्यता कशी असते याची प्रचिती त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आलेली आहे. त्यामुळे राजकारणातील सत्यवचनी नेता म्हणून चंद्रभान भालेराव हे ओळखले जातील. चांदवड तालुक्यातील १ ९ ७० च्या आसपास त्यावेळी सुमारे एक हजाराच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या वाद या गावातून पुढे औरंगाबाद येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॉमर्स कॉलेज येथून चंद्रभान भालेराव यांनी बी . कॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याकाळी सहज नोकरी मिळत असतानाही समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करता यावी म्हणून राजकीय क्षेत्राकडे वाटचाल सुरू केली .

वाद वराडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात ते बिनविरोध निवडून आले . त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही . लोक आग्रहास्तव ३० वर्षांपासून ग्रामपंचायतीचे नेतृत्व करून तब्बल चार वेळा २० वर्षापर्यंत सरपंचपद भूषविले . पंचायत समितीच्या शिंगवे गणातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला . त्याच कालावधीत १४ मार्च १ ९९ ८ ते १३ मार्च १ ९९९ पर्यंत सभापतीपद भूषविले . त्यांच्या रुपाने प्रथमच शिंगवे गणाला सभापतीपद मिळाले . सभापती असताना पाच वर्ष दररोज पंचायत समितीत जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते . गणाबरोबरच संपूर्ण तालुक्याची सेवा सभापती म्हणून करत असताना जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचे उत्कृष्ट कार्याबद्दलचे बक्षीस चांदवड पंचायत समितीला मिळाले . उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळातर्फे चांदवड तालुक्यात त्यावेळी सर्वात प्रथम भव्य – दिव्य ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचे काम त्यांनी केले . या काळात के . टी . वेअर बंधारे , सिमेंट प्लग , गावतळे बांधले . त्यांच्या प्रयत्नाने वाद वराडी येथे इण्डो – जर्मन पाणलोट विकास योजनेच्या माध्यमातून सलग समतल चर , वळण बंधारे , सिमेंट प्लग , माती , दगड बंधारे बांधले , गावातील पाणी साठा वाढवण्यास प्रयत्न केला . त्यामुळे आज काही प्रमाणात का होईना या दुष्काळी गावात पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली . २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना दुगाव गटात जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली . त्यात त्यांचा अल्पशः मताने पराभव झाला , मात्र त्यानंतर सहाच महिन्यात झालेल्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोतवाल यांच्या पॅनलमधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळनू ते संचालक झाले . तालुक्याच्या राजकारणात शिरीषकुमार कोतवाल हाच त्यांचा पक्ष राहिला आहे . संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरीय समितीवर असताना त्यांनी गोरगरीब निराधार लोकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .

सभापती असताना त्यांच्या गणात तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते कुंदलगाव येथे प्रादेशिक नाग्यासाग्या ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला होता . तसेच पूर्व भागातील शिंगवे येथे चांदवड बाजार समितीचे उपबाजार आवार सुरू करण्यासाठी तत्कालीन सभापती कोतवाल यांच्या मदतीने प्रयत्न केले व उपबाजार काही दिवस सुरूही केला , वाद वराडी विविध कार्यकारी सोसायटीतही 20 वर्षांपासून आजही ते तीन महिन्यापूर्वी झालेल्या सोसायटी निवडणूक विजयी झाले होते ते विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सौभाग्यवतीही ग्रामपंचायत सदस्य झाल्या होत्या.

राजकारणाबरोबरच त्यांना शेतीचीही आवड होती ते चांगल्या प्रकारे शेतीहीं करीत होते. प्रचंड जनसंपर्क हा त्यांचा होता अशा ह्या उच्चशिक्षित सुस्वभावी उत्कृष्ट शेतकरी, सत्यवचनी राजकारणी अशा संयमी नेत्याला चांदवड तालुका मुकला आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या