[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

रानभाज्यांचे महत्व प्रसारित करण्याकरीता व विपणन साखळी निर्माण करण्याकरीता राज्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

मानवी आरोग्यामध्ये सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.रानातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिक रित्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या,कंद,फळभाज्या यांमध्ये शरिराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात.सदर रानभाज्या या नैसर्गिक रित्या येत असून त्यावर रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत नाही,त्यामुळे या संपूर्णत: नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.या रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मिळावी व विक्री व्यवस्था निर्माण करून शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी संपूर्ण राज्यात रानभाजी महोत्सवाचे दिनांक ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे.

तालुक्यातील बहादुरी,पारेगाव इंदिरानगर,दह्यने या परिसरातील शेतकरी बांधवांनी रानभाजी महोत्सवामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.बहादुरी येथील शेतकरी महिलांनी कृषी सहाय्यक भरत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्यांचे औषधी गुणधर्म तसेच पाक कला याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी रानभाजी उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार करून नाशिक येथे रानभाज्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.या रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी शेतकरी बांधवांना प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख,तहसिलदार प्रदीप पाटील यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमप्रसंगी वैजयंताबाई बांगर, सुनिता पारधी,सुर्वणा निसरड, सीमा शेंडे,अंजना आढार,जिजाबाई पारधी, रंजना भोजने, शंकर बस्ते, रमेश आढार,शेतकरी सल्ला समिति सदस्य,परिसरातील शेतकरी बांधव,कृषि विभागातील अधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या रानभाजी महोत्सवाचे आयोजक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर अहिरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

तालुक्यातील रानभाजी उत्पादक शेतकरी बांधवांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात रानभाजी विक्रीकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येईल.तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी कार्यालयाशी संपर्क साधावा.
विलास सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या