दरेगावला आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित दररोज वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी
चांदवड तालुका प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे आयुर्वेदिक दवाखाना ( आयुष हेल्थ सेंटर) असून या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली आहे. सदर दवाखान्यात कर्मचारी निवासस्थान, वैद्यकीय कक्ष इत्यादी सुविधा सुद्धा आहेत . सुविधा आहे, मात्र सुविधा चालकच नाही अशी दुरावस्था या आयुर्वेदिक दवाखान्याची झाली आहे . येथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी नियमित उपलब्ध नसतो. वारंवार मागणी करूनही येथे दररोज नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाही .सध्या येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणुकीस असलेल्या डॉक्टरांकडे कधी तपासण्या तर कधी अतिरिक्त पदभार इत्यादी कारणास्तव इतरत्र पाठवले जाते असे सांगितले जाते .सध्या गावात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झालेला आहे . अनेक लोक आजारी पडत असतात. शासकीय सुविधा असूनही गोरगरीब रुग्णांना शासकीय दरात उपचार व औषधे उपलब्ध होत नाही. त्यामुळे दवाखाना असूनही सदर दवाखाना वारंवार बंद असल्याने तिथे गेलेल्या रुग्णांच्या पदरी निराशा पडते व परत त्यांना इतरत्र महागड्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागतात. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची नसल्याने त्यांना शासकीय दरात उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे . सदर हक्क मात्र त्यांना शासकीय अनास्थेमुळे मिळत नाही कारण वारंवार सदर दवाखाना बंद असतो. ग्रामसभेत , ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये सदस्य व ग्रामस्थांनी प्रश्न विचारले मात्र या संदर्भात आवाज उठवूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही .सदर ठिकाणी नियमित डॉक्टर उपलब्ध झाला नाही तर लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. सदर ठिकाणी त्वरित नियमित डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य वैशाली विक्रम देवरे , ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती भागवत अहिरे , सोसायटी संचालक दिनेश पगार , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बाबाजी देवरे , सागर अहिरे आदींनी केली आहे. दरम्यान सदर दवाखान्यातील समस्या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांच्याकडे संपर्क साधला असता सदर ठिकाणी आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर राहुल मालसाने यांची नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले आहे तिथे उपचार घेता येतील असेही डॉक्टर ठाकरे यांनी सांगितले मात्र मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या दरेगावसह ईतर गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या उपकेंद्रात शासकीय आरोग्य उपचार वेळेत मिळणे कसे शक्य होणार आहे ? कारण विविध ठिकाणी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना जावे लागत असल्याने दरेगाव आयुर्वेदिक दवाखान्यात कायमस्वरूपी नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी व सदर दवाखाना शासकीय वेळेत पूर्णपणे खुला ठेवावा व रुग्णांना पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून द्यावी तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी मदतनिस व परीचारिकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

