कानिफनाथ महाराजांचा दरेगावला रंगला यात्रोत्सव
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे वर्षानुवर्षाची परंपरा असणारी कानिफनाथ महाराजांची यात्रा रंगपंचमीला व षष्ठीला भव्य मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली .
दरेगाव येथे ऐतिहासिक पुरातन कानिफनाथ महाराज मंदिर आहे .गावात होळी या सणापासूनच कानिफनाथ यात्रेला सुरुवात झाली . यात्रेनिमित्ताने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले . श्रीश्रेत्र मढी देवस्थानाच्या धर्तीवर दरेगाव येथे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दरेगाव गावाला विश्राममढी असेही संबोधण्यात येत असल्याने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षी पंचक्रोशीतील तरुणांनी पुढाकार घेत नवीन धार्मिक विधीला सुरुवात केली. गावातील नागरिकांसह मनमाड व परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.रंगपंचमीला गावातून रथयात्रा काढण्यात आली गावातील प्रत्येक घरातील बैलांची जोडी रथाला जुंपून भाविकांनी पूजन केले .
तसेच बाहेरून आलेल्या गावागावांच्या देवाच्या काठ्या ढफाच्या तालावर मिरवण्यात आल्या .त्याचप्रमाणे युवा वर्गाने रंगपंचमीच्या निमित्ताने डीजेच्या तालावर नृत्य करत मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करीत रंगउत्सवाचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे दोन दिवस लोकनाट्य तमाशा तसेच रंगपंचमीच्या दिवशी रात्री रामायण वर आधारित आखाडी पार पडली. कानिफनाथ मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली .यावेळेस कुस्त्यांची दंगल पार पडली .महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पैलवानांनी कुस्त्यांच्या आखाड्यात भाग घेतला .ग्रामस्थांतर्फे त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आली.. मानाची कुस्ती दरेगाव येथील वैष्णव देवरे यांनी मालेगाव येथील सुशांत या पहीलवानावर बाजी मारत जिंकली. दरेगाव ग्रामस्थ, विविध मंडळे, युवावर्ग, महिला ,वयोवुद्ध व सर्वच स्तरावरील नागरिक उपस्थित होते. तसेच यात्रेनिमित्त दरेगाव येथील नाथकुपा मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार, मनमाड येथील कानिफनाथ भक्त परिवार व दरेगाव ग्रामस्थ यांच्या माध्यमातून भव्य स्वागत कमान उभारण्यात आली .गिरणारे येथील चंद्रकांत देवाजी वाघ यांनी सालाबादाप्रमाणे यावर्षी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केले.

